▼

Tuesday, 5 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 05 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ मे २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर, ते  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. 

****

प्रसार भारतीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी यांनी काल प्रसार भारतीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दोन दिवसापूर्वीच त्यांची या पदावर नियुक्ती केली. प्रख्यात गीतकार, लेखक आणि जाहिरात तज्ज्ञ जोशी यांनी यापूर्वी मुंबईतील केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे.  

****

आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केलं आहे. अमरावतीच्या अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या वतीनं काल झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. आश्रमशाळेच्या कामकाजासाठी मुख्याध्यापक स्तरावर समित्या गठीत कराव्यात, शासनाच्या आदिवासी योजना, उपक्रम यांचा प्रचार करावा, प्रकल्प अधिकाऱ्यांनी वसतीगृहांना नियमित भेट द्यावी, अशा सूचना उईके यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

****

लातूर इथले मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढ्यात अग्रणी भूमिका बजावणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी बापूराव सोनटक्के यांचं काल चाकूर इथं वृद्धापकाळाने निधन झालं. ते १०१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून तसेच बंदुकीच्या एक्केविस फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. 

****

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या संभाव्य पाणी तसंच चारा टंचाईवर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. काल त्यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात परवा तीन मे रोजी, नऊ बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश मिळालं. अहिल्यानगर शहरात ३, तर अकोले, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, नेवासा आणि अहिल्यानगर तालुक्यात प्रत्येकी एक बालविवाह थांबवण्यात आले. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई प्रभावीपणे राबवण्यात आली.

****

पेट्रोल आणि डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. इंधन पुरवठा सुरळीत करावा आणि कृत्रिम टंचाईला आळा घालावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी सादर केलं.

****

इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करण्याचा इशारा लातूरचे प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांनी दिला आहे. जिल्ह्यातल्या काही पेट्रोल पंप चालकांकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही, पेट्रोल पंप बंद ठेवून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. त्या अनुषंगानं मिना यांनी काल जिल्ह्यातील पेट्रोलपंप धारकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेवून याबाबत नियमावली जारी केली.

****

ताश्कंद इथं सुरू असलेल्या १५ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये काल भारताच्या खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १७ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत, यश यादवने ५० किलो वजनी गटात तुर्कमेनिस्तानच्या सुलेमानचा ५-० असा पराभव केला. १५ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत, ४९ किलो वजनी गटात खुशी राणाने तर ४६ किलो वजनी गटात हंसिका अत्रीने विजय मिळवला. १५ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत, समीर बोहराने ४३ किलो वजनी गटात तैपेईच्या हाओ-टिंग चांग याचा ५-० असा पराभव केला.

****

अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो आणि बास्केटबॉल स्पर्धेचं पुण्यात बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आलं आहे. सहा मे ते आठ मे पर्यंत चालणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १० राज्यांतील विविध विद्युत कंपन्यांचे पुरुष आणि महिला गटातील तब्बल ४१ संघांचे सुमारे ५३८ खेळाडू सहभागी होत आहेत.

****

रत्नागिरी इथं झालेल्या ७२व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या आझाद जैनवाल याने मानाचा भारत श्री किताब पटकावला. उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये सामना होणार आहे. दिल्लीत अरूण जेटली मैदानावर सायंकाळी साडे सात वाजता सामना सुरू होईल.

****

राज्यात काल सर्वाधिक ४४ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४० पूर्णांक नऊ, छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक तीन, धाराशिव ४० तर बीड इथं ४० पूर्णांक आठ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. 

****

 

No comments:

Post a Comment