Monday, 11 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांमुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं पंतप्रधानांचं आवाहन

·      तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळ्ळघमचे विजय यांचा शपथविधी; बहुमत चाचणी येत्या बुधवारी

·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त मुंबईत ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम

·      अशोक खरात प्रकरणी, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी

आणि

·      राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यासंदर्भात बालभारतीकडून परिपत्रक जारी

****

जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांमुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल हैदराबाद इथं जाहिर सभेत बोलत होते. भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगाने आगेकूच करत आहे, मात्र कोविडनंतरच्या परिस्थितीमुळे आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांमुळे अन्नधान्य, इंधन आणि खतांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

देशवासीयांना कर्तव्यभावनेने पुढे येण्याचं आवाहन करत पंतप्रधानांनी, देशभक्ती म्हणजे फक्त बलिदानच नव्हे तर कठीण काळात जबाबदारीने जगणं आणि देशासाठी योगदान देणं असल्याचं सांगितलं.

पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर, परकीय चलनाची बचत करण्यासाठी परदेशी वस्तूंचा मर्यादित वापर, तसंच रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचं त्यांनी आवाहन केलं. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंग्स यावर अधिक भर द्यावा, अनावश्यक परदेश प्रवास, परदेशी सुट्ट्या आणि परदेशी लग्न टाळावेत, देशांतर्गत पर्यटन आणि देशातल्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावं आणि एक वर्ष अनावश्यक सोन्याच्या खरेदीपासून दूर राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं. प्रत्येक नागरिकाने या संकल्पांची अंमलबजावणी केल्यास भारत प्रत्येक संकटावर मात करून अधिक सक्षम बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले:

बाईट  – पंतप्रधान नरेंद्र मोदी

**

या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे नऊ हजार ४०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन झालं. हैदराबाद-पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते महबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग-१६७ च्या चौपदरीकरण प्रकल्पाचं उद्घाटन, पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधु रुग्णालयाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं.

**

तत्पूर्वी, बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ४५व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधान सहभागी झाले होते. स्वच्छ भारत अभियान हे आता लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं असून हे अभियान समाजाच्या शक्तीवर पुढे जात असल्याचं ते यावेळी म्हणाले. पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन करत त्यांनी, सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या भूमिकेचं कौतुक केलं.

****

देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली, तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणतीही मनुष्य हानी होऊ नये, तसंच मालमत्तेचं कमीतकमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. देशभरातल्या पूरनियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा, तसंच महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचा आढावाही त्यांनी या बैठकीत घेतला.

****

तमिळनाडूमध्ये टीव्हीके, अर्थात तमिळगा वेत्री कळघम, या पक्षाचे संस्थापक सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य नऊ मंत्र्यांनीही शपथ घेतली. २३४ सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआय-एम, व्हीसीके, आणि आययूएमएल यांच्या सदस्यांसह १२० आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल आर्लेकर यांनी सांगितलं आहे.

****

लोकशाही बळकट करण्यामध्ये प्रत्येक मतदारानं सहभागी होणं अनिवार्य असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. तिरुपती इथं काल ते पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू इथं झालेल्या यशस्वी आणि शांततापूर्ण निवडणुकांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ज्ञानेशकुमार, सध्या तिरुपतीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून, काल त्यांनी तिरुमला इथल्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात दर्शन घेतलं.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं काल मुंबईत भव्य ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या ड्रोन शोच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवनपट उलगडण्यात आला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

****

मातृदिनानिमित्त काल मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती आणि मातांना पोषण किटचं वितरण खासदार पियूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे. यानंतर गोयल यांनी बोरीवलीत शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच एसआरए जनता दरबारात दीडशे तक्रारी मार्गी लावल्या.

****

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिक मध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात याच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व, या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली.

****

राज्यात इंग्रजी, हिंदी, उर्दू, तमिळसह सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यात आलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने परिपत्रक जारी केलं असून, नवीन शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीचे धडे शिकवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी, मराठीचं ज्ञान वाढावं तसंच स्थानिक संस्कृती आणि परंपरेची ओळख व्हावी, या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे.

****

विज्ञान प्रचार आणि प्रसार, खगोलशास्त्राविषयी जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन तसंच विविध विज्ञानाधारित उपक्रम आणि प्रकल्पांबाबत परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथं काल बैठक पार पडली. ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं घेण्यात आलेल्या बैठकीत जिंतूर तालुक्यात विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे राबवण्यासाठी, विविध समित्याचं गठन आणि प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. भविष्यातील खगोल निरीक्षण शिबिरं, विज्ञान प्रदर्शन आणि वैज्ञानिक जनजागृती मोहीम अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिष्ठातांच्या चार पदांसाठी २४ जणांनी मुलाखती दिल्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी ही माहिती दिली. कुलसचिव पदासाठी येत्या २२ मे रोजी मुलाखत होईल. या पदासाठी एकूण आठ उमेदवार पात्र ठरले आहेत. संवैधानिक अधिकारी प्रवर्गातील नऊ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून, या पदांसाठीच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक आणि कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात आली असून, १२ आणि २२ मे रोजी या मुलाखत होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

****

जालना जिल्ह्यातल्या डोमेगाव परिसरात काल अवकाळी पाऊस पडला.

राज्यात काल सर्वाधिक ४३ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड इथं सरासरी ४२, तर धाराशिव इथं ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment