Friday, 15 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाचं वेळापत्रक जारी; राज्यात ३० जूनपासून प्रारंभ

·      मृद आणि जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

·      उद्योग विभागाकडून एक लाख १४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार; आठ हजार रोजगाराच्या संधी

·      प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत पाच लाख घरांमध्ये आज गृहप्रवेश

·      नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथून निवृत्त प्राध्यापक सीबीआयच्या ताब्यात

आणि

·      मराठवाड्यात पुढचे दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं १६ राज्यं आणि तीन केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक काल जाहीर केलं. त्यानुसार महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलै दरम्यान बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. पाच ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर तीन ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि सात ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

****

मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, राज्यातल्या आठ हजार ७६७ पदांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामधे ५० टक्के सवलत, संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, आदी निर्णयांवर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं.

****

उद्योग विभाग आणि 'एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड' समवेत एक लाख १४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार काल झाला. या प्रकल्पामुळे राज्यात तब्बल आठ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. याअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशात 'इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क' आणि 'एआय कॉम्प्युटर हब' उभारला जाणार असून, तो अक्षय ऊर्जेवर आधारित असेल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाप्रमाणे राज्य सरकार पुढचे सहा महिने मोठे शासकीय कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले…

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

आयात केलेल्या खाद्य तेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला प्राधान्य दिलं जाणार आहे. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर अनिवार्य आहे.

****

केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून, यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल.

****

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या पाच लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होणार आहे. राज्यात सातारा इथं सैनिकी शाळेच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते सहा लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जाणार आहेत. यामध्ये तीन कोटीवं घर पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे.

****

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा – सीईटीच्या पीसीबी समुहाच्या पेपरमधल्या प्रश्नांवर आणि उत्तरांवर आक्षेप नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ई - मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त प्रश्न आणि उत्तरांसंबंधीचं निवेदन, तक्रारी विचारात घेतल्या जाणार असल्याचं, कळवण्यात आलं आहे.

****

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल लातूरच्या दयानंद महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी याला ताब्यात घेतलं. कुलकर्णी हे नीटच्या रसायनशास्त्र विषयाचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होते, ही माहिती समोर आल्यानंतर सीबीआयनं काल त्याची कसून चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी पुण्यातून एक महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघं करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. याप्रकरणातल्या इतर पाच आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

****

गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॉकिंग नेटवर्क आणि प्रणाली-सीसीटीएनएस अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं.

****

जनगणनेच्या स्वगणना प्रक्रियेचा आज समारोप होत आहे. उद्यापासून प्रगणक घरोघरी जाऊन, स्वगणनेत भरलेली माहिती तपासणार आहेत. ही माहिती पूर्णपणे गोपनीय असून, कोणालाही दिली जाणार नसल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले,

बाईट – जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी

**

दरम्यान, जनगणना प्रगणक प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याप्रकरणी धुळ्यातल्या तीन शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनगणना कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

****

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं जयंतीनिमित्त टीव्ही सेंटर परिसरात संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं होतं.

पैठण इथं २० हजार वह्यांपासून संभाजी महाराजांचं भव्य चित्र साकारण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या रवळगाव वळण रस्त्याच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. नागरिकांची मागणी आणि स्थानिक अडचणी लक्षात घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.

****

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत लातूर जिल्हा परिषदेच्या १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं वितरित करण्याच्या उपक्रमाचा काल शुभारंभ झाला. पाठ्यपुस्तक वितरित करणाऱ्या वाहनाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

****

छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठा योजनेतल्या जलवाहिन्यांची जोडणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. काल यासंदर्भातल्या बैठकीत त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. १२ जूनपूर्वी पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी, अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन कामांना गती द्यावी तसंच शहरातील सर्व जलकुंभांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

****

शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेती समृद्ध करण्यावर भर द्यावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. नायगाव तालुक्यातल्या लालवंडी इथं सगरोळी कृषी विज्ञान केंद्र आणि हवामान अनुकूल शाश्वत विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रसंगी ते बोलत होते. या प्रात्यक्षिकानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या 'खरीप हंगाम पूर्व गाव मोहिमे'ला भेट दिली.

****

हवामान

मराठवाड्यात नांदेड, लातूर, धारशिव मध्ये पुढचे दोन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

लातूर जिल्ह्यात काल पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा आला. मात्र, आंबा उत्पादकांना फटका बसला आहे.

राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक नऊ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४३ पूर्णांक चार, परभणी ४२ पूर्णांक नऊ तर धाराशिव इथं ४१ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment