Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
सर्वोच्च न्यायालयात, मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त
अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या ३३ मध्ये वाढ करून आता ३७ करण्यात आली
आहे. अर्थात आता एकूण न्यायाधीशांची संख्या ३८ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या
संख्या अध्यादेश सुधारणा - २०२६ अंतर्गत राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. यासंदर्भातील १९५६च्या अध्यादेशातली ही सुधारणा
आहे.
****
एक राष्ट्र एक निवडणूक' विधेयका संदर्भातील
संयुक्त संसदीय समितीनं काल कर्नाटकमध्ये बंगळूरु इथं राजकीय पक्ष, कायदेमंडळ
आणि नगरिकांसोबत व्यापक चर्चा केली. समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांनी वार्ताहरांशी
बोलतांना यासंदर्भात कर्नाटकातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मांडलेले मुद्यांबाबत
माहिती दिली.
निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी
काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतरबंदी कायदे, अविश्वास ठराव
आणि राष्ट्रपती राजवटीमुळ निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील.
वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय
हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना
अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या
संबंधित विभागांवरही परिणाम होतो. या अनुषंगानं चर्चा झाल्याचं चौधरी यावेळी बोलताना
म्हणाले.
****
आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ मे रोजी रविवारी
सकाळी अकरा वाजता जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १३४ वा
भाग असणार आहे.
या कार्यक्रमासाठी, नागरिकंना
मोफत दूरध्वनी क्रमांक १८०० -११ – ७८०० यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच, नरेंद्र मोदी
ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरम च्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह १९२२
या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर
एस.एम.एस.वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या
सूचना पाठवता येणार आहेत.
****
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या
माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा
मोठा भाग, अंदमान बेटे आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार
या महिन्याच्या २६ तारखेला केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या तीन
ते चार दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन
भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुडूचेरी, काराईकल, केरळ तसच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा
अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील दोन दिवसांत बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील
आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा
वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश
आणि विदर्भ या भागांत उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता या हवामान विभागानं वर्तवली
आहे.
****
लहान मुलांच्या कलागुणांना
वाव देण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने निःशुल्क बालनाट्य शिबिराचे आयोजन
करण्यात आले आहे. आजपासून सुरू होत असलेले हे शिबिर २४ मे पर्यंत सुरू राहणार आहे.
तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षक या शिबिरात शालेय मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. चौथी ते
नववी पर्यंतच्या मुलांना या शिबिरात प्रवेश देण्यात येणार आहे. मसापच्या डॉ. ना. गो.
नांदापूरकर सभागृहात हे शिबिर सकाळी आठ ते ११ वाजेपर्यंत दररोज असणार आहे.
****
बीड जिल्ह्याच्या माजलगाव
तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची
माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी दिली आहे. परंतु तालुक्यातील काही
ग्रामीण भागात अनेक व्यापारी, संस्था तसेच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना
शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी
कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात परिपत्रक
जाहीर केले आहे.
****
बीड जिल्ह्यात माजलगाव-तेलगाव
रस्त्याच्या कमासाठी ३३ कोटीं रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता गेल्या अनेक
वर्षांपासून खराब झालेला होता. अनेक सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि विविध पक्षांच्या
कार्यकर्त्यांनी वेळोवेळी रास्ता रोको आंदोलन, निवेदने आणि आंदोलनाच्या माध्यमातून
या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.
****
आज जागतिक दूरसंचार आणि माहिती
समाज दिन जगभरात साजरा केला जात आहे. इंटरनेट तसंच अन्य माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान
– आय.सी.टी. वापरामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात, तसेच डिजिटल
कमतरता कशी कमी करता येईल, याबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा उद्देश आहे.
हा दिवस सरकार, उद्योग आणि समुदायांना जगाला चालना देणाऱ्या डिजिटल जीवनरेखा अधिक मजबूत करण्याचे
आवाहन करतो. या वर्षीची संकल्पना आहे - "डिजिटल जीवनरेखा : जोडलेल्या जगात लवचिकता
मजबूत करणं" असा आहे.
****
जागतिक उच्च रक्तदाब दिवसही
आज आहे. याचा उद्देश उच्च रक्तदाबासंदर्भात जागरुकता, ओळख, रोकथाम-नियंत्रण, याला चालना
देण्याचा आहे. नियमित तपासणीद्वारे या रोगाला हरवणं असा यंदाच्या वर्षी या दिवसाच्या
साजरा करण्यामागे आशय आहे.
****
No comments:
Post a Comment