Tuesday, 19 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 19 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज सुमारे नव्वद पैसे प्रति लिटरची वाढ करण्यात आली आहे. एक आठवड्याहून कमी काळात झालेली ही दुसरी वाढ आहे. यामुळे आता दिल्लीत पेट्रोल ९८ रुपये ६४ पैसे, डिझेल ९१ रुपये ५८ पैसे प्रति लिटर झालं आहे. मुंबईत पेट्रोल १०७ रुपये ५९ पैसे आणि डिझेल ९४ रुपये ८ पैसे प्रति लिटर झालं आहे. चार वर्षांहून अधिक काळानंतर ही दरवाढ झाली आहे. इराणचं युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद होणं, यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जगभर झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी इटलीत रोम इथं पोचणार आहेत. त्यांची ही भेट दोन दिवसांची असून, यामध्ये व्यापार, गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून हा उच्चस्तरीय राजकीय दौरा होत आहे. पंतप्रधानांच्या या भेटीबाबत इटलीतल्या भारतीय समुदायाबरोबरच तिथले स्थानिक लोकही उत्सुक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

देशातल्या अनेक भागात उष्णतेची लाट असून, त्यापासून सावध राहण्यासाठी आयुष मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखणं, टळटळीत उन्हाच्या वेळेत थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क टाळणं, हलक्या सुती कपड्याचा वापर, ॠतुमानानुसार योग्य फळांचं आणि क्षारयुक्त पेयांचं सेवन यावर मंत्रालयाने भर दिला आहे. सुस्ती, डोकेदुखी, मळमळ, मानसिक स्थितीत बदल, शरीराचं उच्च तापमान, शुष्कता, चक्कर अशी लक्षणं दिसली तर धोक्याचा इशारा मानून वेळीच त्याकडे लक्ष देणं, असंही त्यात म्हटलं आहे. उष्माघात ही वैद्यकियदृष्ट्या आपत्कालीन स्थिती असून, त्याकडे ताबडतोब लक्ष देण्याची गरज आहे. तीव्र आघाताच्या बाबतीत १०८ आणि १०२ या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन, मंत्रालयाने केलं आहे.

****

आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेने सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले:

बाईट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

पश्चिम आशियातल्या सध्याच्या भूराजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि तेल विपणन कंपन्यांनी संपूर्ण राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे. तेल उद्योगाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक मिहिर जोशी यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात सध्या संपूर्ण देशभरातील सर्वाधिक म्हणजे सुमारे ४४ लाख पीएनजी जोडण्या आहेत. नागरीकांनी पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी करताना घाईगडबडीने किंवा घाबरुन जाऊन खरेदी करु नये, किंवा त्याची साठेबाजी करु नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

पालघर जिल्ह्यात काल टेम्पोच्या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ही माहिती दिली. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या टेम्पोचा काल एका कंटेनरसोबत अपघात झाला, यात १३ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. पालकमंत्री नाईक यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात नागपूर आणि अकोला इथल्या दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला. अंत्रीकोळी गावखेडा परिसरात झालेल्या या कारवाईत दोन देशी बनावटीचे पिस्तूल, चार मॅगझिन, तब्बल ९२ जिवंत काडतुसं, चाकू आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

****

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने विशेष एकमार्गी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या सुमारे दीड पट भाडेदराने चालवण्यात येणार आहेत. यामध्ये उद्या मंगळवारी तिरुपती नांदेड विशेष रेल्वे, बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस नांदेड, गुरुवारी नांदेड तिरुपती ही रेल्वे चालवली जाणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आली.

****

No comments:

Post a Comment