Tuesday, 19 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नीट पेपरफुटी प्रकरणी रेणुकाई केमिस्ट्री क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक; नऊ दिवसांची सीबीआय कोठडी

·      विधान परिषदेच्या १६ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

·      शिर्डी इथं उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं येत्या शनिवारी राष्ट्रार्पण

·      पालघर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात १३ जणांचा मृत्यू

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद प्लेऑफ मध्ये दाखल

आणि

·      मराठवाडा तसंच विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज

****

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने काल अटक केली. या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांमध्ये मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असून, त्यांनी २३ एप्रिल रोजी संबंधित आरोपींकडून ही प्रश्नपत्रिका मिळवली असल्याचं, सीबीआयने म्हटलं आहे. न्यायालयानं त्यांना नऊ दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकूण दहा आरोपींना अटक केलेली आहे. पाच ठिकाणी शोधमोहीम राबवून अनेक कागदपत्रं, संगणक तसंच मोबाईल फोनही सीबीआयने जप्त केले आहेत.

दरम्यान, मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्यानंतर RCC क्लाससमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी कार्यकत्यांनी घोषणाबाजी करत क्लासच्या फलकावर शाईफेक केली. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य विधान परिषदेच्या १६ जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक काल जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे.

यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्याने त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या २५ तारखेला जारी होईल. एक जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, तर चार जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. यासाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जूनला मतमोजणी होईल. संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे.

****

शिर्डी इथं सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं, येत्या २३ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार आहे. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल. खासगी क्षेत्रात तोफगोळा उत्पादनाचा हा देशातला सर्वांत मोठा प्रकल्प असल्याचं मानलं जात आहे. यासाठीचा संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान तसंच कच्चा माल स्वदेशी असणार आहे. अवघ्या एका वर्षात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या सहा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रं, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी ७२ लाख रूपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. वेरूळ इथल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यासाठी २१० कोटी रुपये तर बीड इथल्या श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ३०१ कोटी ५४ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

****

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या प्रवास दरात तत्काळ भाडेवाढ करणार नसल्याची माहिती, परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरवाढ टाळण्यासाठी ई-बसचा वापर तसंच महसूलवाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

जलसंवर्धनासाठी लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते काल नागपुरात पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त जलक्रांती परिषदेतबोलत होते. “नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं. जलसंवर्धन क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

****

मुंबईअहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकची कंटेनरसोबत धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सुमारे १३ जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. पालघर जिल्ह्यात धानीवरी इथं काल ही दुर्घटना घडली. अपघातातल्या जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलं. कांद्याला २४०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळावा, तसंच बाजार समित्यंमधूनच कांदा खरेदीची मागणी करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्ग जवळील जांबरगाव इथं कांदा उत्पादकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं, पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर सोडून दिलं.

****

हिंगोली इथं काल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांची प्रशिक्षण कार्यशाळा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत पार पडली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदय आणि एकात्म मानववाद हाच आमच्या कार्याचा मुख्य गाभा असल्याचं कराड यावेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.

****

नांदेड इथं काल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. नीट पेपरफुटी आणि इतर प्रकरणी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विविध मागण्याचं निवेदन संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.

****

बीड शहर परिसरातल्या इमामपूर रोड इथल्या रस्ता रूंदीकरणाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी काल आंदोलन केलं. हा रस्ता ६०० मीटर पर्यंत वाढवण्यासंदर्भात वारंवार पत्र व्यवहार करूनही काम न झाल्यामुळे महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुभाष राऊत, यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.

****

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेतर्फे उद्या २० मे रोजी देशव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं खबरदारी घेण्याचं आवाहन सहायक आयुक्त ब. दा. मरेवाड यांनी केलं आहे. नियमित औषधांची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

जालना महानगर पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत काल जुना जालना भागातल्या भाजीमंडी परिसरात सुमारे सत्तर दुकानांसमोरील नाल्यांवरील अतिक्रमणं हटवण्यात आली. नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणं काढून घेण्याचं आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात माजलगाव, वडवणी आणि धारूर या तिन्ही तालुक्यांत सुरु असलेल्या क्रीडा संकुल उभारणीच्या कामाचा काल आमदार प्रकाश सोळंके यांनी आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक सूचनाही केल्या.

****

इंडियन प्रिमियर लीगआयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव करत, सनरायजर्स हैदराबाद चा संघ प्लेऑफ मध्ये दाखल झाला आहे. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघही अंतिम चार मध्ये आहेत.

आज या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायन्ट्स यांच्यात सामना होणार आहे.

****

अकोला जिल्ह्यात पिंपरखेड इथल्या ५० वर्षीय व्यक्तीचा काल उष्माघातामुळे मृत्यू झाला, तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.

अकोला इथं काल राज्यात सर्वाधिक ४६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४५ पूर्णांक दोन, छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक चार, तर धाराशिव इथं सुमारे ४२ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांना आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर नागपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यासह मराठवाड्यात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातही दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातली शासकीय रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांना उष्माघातग्रस्त रुग्णांवर तातडीनं उपचारासाठी सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment