Tuesday, 26 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 26 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन आज बारा वर्षं पूर्ण होत आहेत. ही बारा वर्षं म्हणजे भारताची संस्कृती आणि विकासमार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यांसह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांची, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’, ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी या बारा वर्षांच्या काळाला, सुशासन आणि राष्ट्र प्रथम, या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास, असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णत: सक्षम झाल्याचं प्रतिपादन नितीन नबीन यांनी केलं आहे.

****

क्वाड देशांचा समूह म्हणजे समृद्धी आणि विकासासाठी प्रयत्न करणारे खुले समाज असून, लोकशाही देशांच्या नात्याने त्यांनी दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे, असं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी केलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या, क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या बैठकीत सध्याच्या जागतिक स्थितीबाबत क्वाड देशांशी द्विपक्षीय चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. हिंदी आणि प्रशांत महासागर, या सागरी क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत सहमती झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. या बैठकीत भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भाग घेतला.

****

देशात पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली. आजपासून ही वाढ लागू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे ही वाढ करण्यात आली आहे. गेल्या ११ दिवसांत सीएनजीच्या दरात झालेली ही चौथी वाढ आहे.

****

सौदी अरेबियाच्या वार्षिक हज यात्रेत आज अराफातचा दिवस आहे. हा दिवस या यात्रेतला सर्वात पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. या दिवसासाठी जगभरातून पंधरा लाखाहून जास्त मुस्लिम भाविक मिनाहून अराफातला पोहचले. या वर्षी या यात्रेसाठी जाणाऱ्या पावणेदोन लाखांहून अधिक भारतीयांसाठी व्यापक सुविधा तयार ठेवण्यात आल्याची माहिती सौदी अरेबियात उपस्थित असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

शासकीय सेवा सुलभ, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी शासकीय प्रक्रिया पुनर्रचना करण्यात येत आहे. याअंतर्गत शासकीय सेवा आणि योजनांमधले अनावश्यक टप्पे, कागदपत्रे आणि प्रक्रिया कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. सर्व विभागांनी आपल्या सेवांचं पुनरावलोकन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आतापर्यंत एक हजार २२२ सेवांचं पुनरावलोकन करून लोकांना प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या ७२३ सेवा तयार केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून, कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल-डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागांत अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्याने पेट्रोल-डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, असं आवाहन भुजबळ यांनी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल देण्यात यावं, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोलपंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले.

****

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याने राज्यभरात चर्चेला उधाण आलं असून, यामुळे प्रसिद्ध ‘लातूर पॅटर्न’ वरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची खंत काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. मात्र, या संकटातून लातूर नक्कीच बाहेर पडेल आणि विद्यार्थ्यांचं यश पुन्हा एकदा लातूरचं नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते काल लातूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने विविध पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या ३० दिवसांच्या आत जाहीर केले. विद्यार्थ्यांनी आपले निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावेत, असं आवाहन परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी केलं आहे.

****

No comments:

Post a Comment