Saturday, 30 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य सरकार मराठा समाजाच्या हितासाठी सकारात्मक आणि पारदर्शकपणे कार्य करत असून, संविधान, कायदा आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करूनच निर्णय घेतले जातील, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मांडली. कोणत्याही समाजात तेढ निर्माण होईल असा निर्णय सरकार घेणार नाही आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. जरांगे यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आणि काल जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, चर्चेतून समाधान न झाल्याने जरांगे पाटील यांनी उपोषणाचा निर्णय कायम ठेवला.

****

ऑपरेशन सिंदूरने भारताची कोणत्याही चिथावणीखोर कारवाईला अचूक आणि ठाम प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिद्ध केली असून, नव्या सुरक्षा आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी एक नवा मापदंड निर्माण केला आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलं आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या १५० व्या अभ्यासक्रमाच्या पासिंग आऊट परेडला संबोधित करताना आज ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर हे राष्ट्राच्या दृढ इच्छाशक्तीचं प्रतीक असून, तिन्ही सैन्यदलांमधील समन्वयाचं महत्त्व अधोरेखित करत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. पदवीधर कॅडेट्सनी व्यावसायिकता, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची सर्वोच्च मूल्यं जपावीत, असं आवाहन त्यांनी केलं.

****

लातूर जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत असून अनावश्यक इंधनाची अतिरिक्त खरेदी किंवा साठवणूक करू नका असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या इंधन पुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागात सध्या मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा सतत उपलब्ध ठेवण्यात यावा, शेती मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना, तसेच उद्योग-व्यवसाय आणि जलसंधारणाच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणात डिझेल तात्काळ उपलब्ध करून दिले जावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE ने निकालोत्तर फेरतपासणी आणि फेरमूल्यांकनाची प्रक्रिया १ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत अधिक पारदर्शकता मिळावी आणि कोणत्याही शंका दूर करण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. निकालानंतरची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि विनाअडथळा पार पाडण्यासाठी मंडळ पूर्णपणे तयार असल्याचं CBSE ने स्पष्ट केलं आहे. फेरतपासणी, उत्तरपत्रिकांच्या प्रती आणि फेरमूल्यांकनासाठी अर्ज करण्याबाबतची सविस्तर माहिती CBSE च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी निर्धारित वेळापत्रकानुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन मंडळानं केलं आहे.

****

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात मोठी कारवाई करत 7 जिल्ह्यांतील 12 आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर धाड टाकली आहे. या कारवाईत तब्बल 73 लाख 24 हजार 656 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. आक्षेपार्ह आणि भ्रामक जाहिरातींमधून विक्री केली जात असलेली तसेच दिशाभूल करणाऱ्या नावाचं औषध या स्वरूपातील औषधी जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तसेच अवैध औषध उत्पादन आणि विक्रीविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण पद्धतीने राबवली जाईल.

****

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, एक अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांसह हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभाग-CBI कडे सोपवण्यात आला असून, विषारी दारूचा पुरवठा, विक्री आणि यामागील संपूर्ण साखळीचा शोध घेतला जात आहे. या घटनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मिळून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. फुगेवाडी-दापोडी भागात १२ तर हडपसर परिसरात ६ जणांचा मृत्यू झाला. तर काही रुग्णांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

****

म्यांमारचे राष्ट्रपती यू मिन आंग हलाईंग आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी ते बोधगया इथं पोहचले. बोधगया इथं दर्शन घेतल्यानंतर ते नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत.

****

No comments:

Post a Comment