Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 02
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल
आज जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ टक्के लागला असून कोकण विभागाचा
निकाल सर्वाधिक ९४ पूर्णांक १४ टक्के लागला आहे तर, पुणे विभाग ९१ पूर्णांक २५
टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई ९० पूर्णांक ०८ टक्के, नाशिक ९० पूर्णांक
७२ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ६८ टक्के लागला आहे. लातूर विभागाचा
निकाल सर्वात कमी म्हणजे ८४ पूर्णांक १४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यातून
या परीक्षेसाठी एकूण १४ लाख ४४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १२
लाख ८६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
****
बारावीच्या निकालात यंदा मुलींनी
बाजी मारली असून ९३ पुर्णांक १५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ८६ पुर्णांक
८० टक्के मुलं परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना आपला निकाल maharesult.nic.in,
maha hssc board.in, आणि hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर बघता येईल.
गुण पडताळणीसाठी उद्या तीन मे पासून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
****
मतमोजणी पर्यवेक्षक म्हणून
केवळ केंद्र-सरकारी कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये
हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक
तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांची
निवड करण्याचा पूर्ण अधिकार हा आयोगाचाच असल्याचं न्यायालयाने यावेळी म्हटलं. या प्रक्रियेत
पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक टेबलवर एजंट्स आणि निरीक्षकांची उपस्थिती असते, असेही न्यायालयाने
स्पष्ट केले. दरम्यान, मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज ४५ दिवसांपर्यंत
जतन करून ठेवले जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने न्यायालयात दिली आहे. आयोगाच्या
या परिपत्रकाची अंमलबजावणी त्याच्या मूळ उद्देशासह केली जाणे अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने
आपल्या अंतिम आदेशात अधोरेखित केले आहे. तृणमूल काँग्रेसने आयोगाच्या या निर्णयाला
न्यायालयात आव्हान दिले होते.
****
भारताच्या डिजिटल व्यवहार
प्रणालीने एप्रिल महिन्यात नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.' युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस' म्हणजेच 'युपीआय' व्यवहारांमध्ये
वार्षिक आधारावर २५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात एकूण २२ पूर्णांक
३५ अब्ज व्यवहार झाले असून २९ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचं भारतीय राष्ट्रीय
देयके महामंडळ 'एनपीसीआय' ने म्हटलं आहे. 'आयएमपीएस' व्यवहारांमध्येही १३ टक्के वाढ झाली आहे. युपीआय आता भारतापुरतेच
मर्यादित न राहता युएई, सिंगापूर, फ्रान्स, श्रीलंका आणि
मॉरिशससह अनेक देशांमध्ये पोहोचला आहे.
****
जागतिक ऊर्जा संकटाच्या काळात
भारताने आपली ऊर्जा सुरक्षा भक्कम करण्यासाठी कच्च्या तेलाची आयात आता २७ ऐवजी ४१ देशांकडून
करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह
पुरी यांनी दक्षिण गुजरातमध्ये आयोजित एका कार्यक्रमात माहिती दिली. देशातील तेल शुद्धीकरण
केंद्रात एलपीजी उत्पादनात ६० टक्क्यांची वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे उत्पादन
प्रतिदिवस ३६ हजार मेट्रिक टनावरून ५४ हजार मेट्रिक टनावर पोहोचल्याचं पुरी यांनी स्पष्ट
केलं.
****
ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी
होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केलं आहे. कालपासन स्वयं‑नोंदणी सुरु झाली असून नागरिक se.census.gov.in या पोर्टलवर
घरबसल्या किंवा कुठूनही सहज ३३ प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. प्रत्येक सहभागी नागरिकाला
एक युनिक आयडी मिळेल आणि नंतर गणनाकर्ता घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करेल. या मोहीमेचा
दुसरा टप्पा १६ मे ते १४ जून दरम्यान सुरु होईल, ज्यामध्ये अपूर्ण माहिती अद्ययावत
करता येईल.
****
परभणीत चाईल्ड हेल्पलाईन १०९८
वर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महिला आणि बाल विकास विभागाने तातडीने
कारवाई करत शहरात होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळवलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका
अल्पवयीन बालिकेचा विवाह परभणीत होणार होता. माहितीची शहानिशा करण्यासाठी संबंधित बालिकेच्या
गावातील ग्रामपंचायतीकडून जन्मनोंद मागवण्यात आली. त्यानुसार बालिकेचे वय १७ वर्षे
६ महिने असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर परभणी पोलिसांच्या पथकाने कुटुंबियांचं समुपदेशन
करुन हा विवाह थांबवला.
****
महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते काल अठराव्या ‘न्युजमेकर्स अचिव्हर्स अवार्ड्स’
या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, राही भिडे, गायक हरिहरन, अभिनेत्री
सुषमा देशपांडे, समाजसेवक दत्ता बारगाजे आणि अभिनेत्री झीनत अमान यांना गौरवण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment