▼

Monday, 4 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ मे २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, प्रत्येक टप्प्यावर भारत निवडणूक आयोगाकडून देखरेख ठेवली जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९३ जागांपैकी ११६ जागांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष ९७ जागांवर, तर सत्तारुढ तृणमूल काँग्रेस ६४ जागांवर आघाडीवर आहे.

आसाममधल्या एकूण १२६ जागांपैकी भाजप ७६, तर काँग्रेस आघाडी २४ जागांवर आघाडीवर आहे.  

केरळ विधानसभेच्या १४० जागांपैकी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यु डी एफ ७७ जागांवर, तर एलडीएफ गट ३२ जागांवर आघाडीवर आहे.

तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी एआयएडीएमके ३२ जागांवर, डीएमके २०, तर इतर २७ जागांवर आघाडीवर आहेत.

पुद्दुचेरी विधानसभेच्या ३० जागांपैकी एआयएनआरसी पाच, तर काँग्रेस आघाडी पाच जागांवर आघाडीवर आहे. 

**

राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे.

बारामतीत चौथ्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ३६ हजार ५९१ मतांनी आघाडीवर आहेत. तर राहुरीत सहाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले २५ हजार ४८६ मतांनी आघाडीवर असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलेक्स आय चं मिशन दृष्टी, भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्त्वपूर्ण यश असल्याचं म्हटलं आहे. त्याचं यशस्वी प्रक्षेपण हे, नाविन्यपूर्ण संशोधन आणि राष्ट्रनिर्मितीप्रती असलेल्या युवा वर्गाच्या ध्येयनिष्ठेचा एक ज्वलंत पुरावा असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशामध्ये म्हणलं आहे. बंगळुरूच्या गॅलेक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्नियातून प्रक्षेपण करण्यात आलं. १९० किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि सिंथेटिक ऍपर्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. त्याच्याद्वारे ऑप्टिकल आणि रडार दोन्ही प्रकारे इमेजिंग होऊ शकते. ढगांच्या पलीकडे आणि रात्री अंधारातही हा उपग्रह स्पष्ट छायाचित्र घेऊ शकतो.

****

पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे काही काळ स्थगित असलेली संयुक्त अरब अमिरातीची भारतातल्या अनेक शहरांसाठीची नियमित विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने हवाई वाहतूक पूर्णपणे सुरू करण्याची घोषणा करत तात्पुरते निर्बंध मागे घेतले. 

****

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं लहान मुलांमधल्या मधुमेहाबाबत काल एक सर्व समावेशक मार्गदर्शक दस्ताऐवज जारी केला. सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणातील सर्वोत्तम कार्यपद्धतींवरील राष्ट्रीय शिखर परिषदेत हा दस्ताऐवज प्रकाशित करण्यात आला. लहान मुलांच्या मधुमेहावरील उपचारांचा सार्वजनिक आरोग्यवस्थेत समावेश करणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बाळ जन्मल्यापासून ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांची सार्वजनिक आणि शालेय पातळीवर तपासणी केली जाणार आहे.

****

नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगानं आणि सखोल पद्धतीनं करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. या पथकात पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, या उद्देशानं हे पथक काम करेल. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून, आयोगानं या घृणास्पद गुन्ह्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

****

जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सामाजिक माध्यमांवर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी स्व–नोंदणी किंवा घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देणं, या दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणं आवश्यक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती न देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून तीन किलो ३४८ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. बेकायदेशीर बाजारातील त्याची अंदाजे किंमत एक कोटी १७ लाख रुपये आहे.

****

 

No comments:

Post a Comment