Friday, 8 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      ऑपरेशन सिंदूर मोहिमेची वर्षपूर्ती; दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      देशभरातल्या ४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात

·      राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल

·      टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातून अटक

·      बीड भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक गजाआड

आणि

·      आज थॅलेसिमिया दिन; छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन

****

ऑपरेशन सिंदूर मोहिमेला काल एक वर्ष पूर्ण झालं. या निमित्तानं देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव केला जात आहे. या मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व यशातून भारतीय सैन्य दलांचं अतुलनीय धैर्य आणि निष्ठा दिसून येते, या शब्दांत तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलाचं कौतुक केलं. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी, या निमित्त दिलेल्या संदेशात भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्व विस्कळीत करण्याच्या प्रयत्नांना, या मोहिमेतून जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं नमूद केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात बोलतांना, दहशतवाद हद्दपार करणं आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन केलं. या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करतो, या कामगिरीतून भारतीय सैन्याची तयारी आणि समन्वय दिसून येत असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवर ऑपरेशन सिंदूरचं बोधचिन्ह असलेला डीपी ठेवला आहे. देशातल्या नागरिकांनीही हा डीपी ठेवावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

ऑपरेशन सिंदूरमुळे देशाच्या शत्रूंना भारताच्या शक्तीचा अंदाज आला, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या मोहिमेच्या दरम्यान तिन्ही सेना दलांनी दाखवलेल्या समन्वयाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कौतुक केलं.

****

देशभरातल्या ४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठीची मोफत वार्षिक आरोग्य तपासणी मोहीम कालपासून सुरू झाली. ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या दवाखान्यात कामगारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत या मोहिमेचं उद्घाटन केलं. याविषयी ते म्हणाले:

बाइट- केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय

****

बिहारमधे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. पाटणा इथल्या गांधी मैदानावर राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी ३० मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पुत्र निशांतकुमार यांचाही समावेश आहे.

****

पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवि यांनी पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली आहे. काल त्यांनी याबाबतचं पत्र जारी करत, सदर विधानसभा तत्काळ प्रभावाने भंग करत असल्याचं म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदावरून पायउतार होण्यास नकार दिला होता, त्यानंतर राज्यपालांनी ही कारवाई केली. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकारचा शपथविधी उद्या नऊ तारखेला होण्याची शक्यता आहे.

****

कुख्यात गुंड सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि त्याचा मदतनीस तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं २२ जणांना निर्दोष ठरवलं आहे. विशेष न्यायालयानं २०१८ मध्ये दिलेल्या निकालात सर्व २२ आरोपींना निर्दोष ठरवलं होतं. या निर्णयाला सोहराबुद्दीनच्या भावांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. हत्येचा कट रचणं आणि त्यात आरोपींचा सहभाग सिद्ध करण्यात अपयश आल्याचं निरीक्षण विशेष न्यायालयानं आपल्या निकालात नोंदवलं होतं.

****

आकाशवाणीच्या ९०व्या स्थापना दिनानिमित्त आज दिल्ली इथं मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आनं आहे. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या ब्रीदवाक्यासह १९३६ पासून आकाशवाणी आजतागायत कार्यरत आहे. देशभरातल्या इतर केंद्रांवरही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ.दिपक माळी यांनी दिली. results.digilocker.gov.in,  maha hssc board.in, ssc result.mkcl.org, आणि maha hssc board.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

****

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी नीदा खान हिला छत्रपती संभाजीनगर इथून काल अटक करण्यात आली. नाशिक पोलिस पथकाने छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. छत्रपती संभाजी नगरातील नारेगाव इथं नीदा खान राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

****

बीड जिल्ह्यात कथित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणी बीड पोलिसांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना काल लातूर इथून अटक केली. बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याअंतर्गत लातूर जिल्हा पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास बीड जिल्हा पोलीसांकडून सुरू आहे.

****

नांदेड इथं ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत ४३ लाख ४८ हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अमेरिका, कोलंबिया तसंच चीनमधून आणलेल्या शस्त्रांसह देशी तलवारी, खंजीर आदी एकूण ४ हजार ७९६ धारदार शस्त्र यावेळी जप्त करण्यात आली.

****

जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आज राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे ‘संकल्प सप्ताहा’ची सांगता आणि थॅलेसेमिया मुक्तीसाठी पुढील वाटचालीसाठी आरोग्य विभागाचा निर्धार, या विषयी आयएमए सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात डॉ अपर्णा डिकोंडवार यांनी अधिक माहिती दिली..

बाइट- डॉ अपर्णा डिकोंडवार

****

ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने ‘सुपर ५० एआय फार्मर्स’ या अभिनव पथदर्शी प्रकल्पाचा जालना जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र कृषी विभाग आणि फाईंडेबिलिटी सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक सक्षम करणं, हा यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवडक शेतकरी तसंच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

****

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या सात पाटबंधारे प्रकल्पांमधला उपलब्ध पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानाची शक्यता आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भात आदेश जारी केले. या सातही प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नसल्यानं अवैध पाणी उपसा होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, धाराशिव जिल्हा प्रशासनानं जलसंधारणासाठी मोठी मोहीम हाती घेतली असुन या अंतर्गत ‘एक लाख जलतारा’चा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी काल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

****

हवामान

राज्यात काल नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दुपारनंतर आलेल्या धुळीच्या वादळाने नागरिक हैराण झाले. याच दरम्यान मुरबाडकडे जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅण्डिंग करावं लागलं.

राज्यात सातारा, सांगली, नागपूर, यवतमाळ आणि नांदेडसह अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

दरम्यान, राज्यात काल वाशिम इथं ४२ पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं ४१ अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर ३९ पूर्णांक पाच दशांश तर धाराशिव इथं ४० पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Post a Comment