Saturday, 9 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी

·      देशात अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांनी फेटाळला

·      निदा खान प्रकरणी छत्रपती संभाजीनगर मनपाच्या नगरसेवकावर कारवाईची शिवसेनेची मागणी;एमआयएम अध्यक्षांकडून मात्र पाठराखण

आणि

·      वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

****

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानावर झालेल्या भव्य समारंभात राज्यपाल आर.एन. रवी यांनी शुभेंदू अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पाच कॅबिनेट मंत्र्यांनी देखील या वेळी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच भाजप-एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार यांची या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लक्षणीय ठरली.

****

देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रीजीजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता, याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.  पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं २०१३-१४ मध्ये जियो पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजीजू यावेळी म्हणाले.

****

केंद्र सरकारनं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ ची घोषणा केली आहे. यात देशभरातुन निवडलेल्या ४२ पंचायतींना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा ३ जून रोजी नई दिल्ली इथं होणार असल्याचं केंद्र सरकारनं कळवलं आहे.या पुरस्कारांमध्ये कर्ऩाटक सहा पुरस्कारासह पहिल्या तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा प्रत्येकी पाच पुरस्कारासह दुसरा स्थानावर आहेत. हे पुरस्कार दीनदयाल उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार या दोन श्रेणीत दिले जात आहेत.

****

विकसित भारतासाठी शेतकरीही विकसित व्हायला हवा, यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे सौर कृषिपंपांसह विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांनी इतर शेतकऱ्यांनाही सौर पंपांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावं, असं आवाहन केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी केलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं महापारेषणच्या सभागृहात पीएम-कुसुम बी आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधत होते. यावेळी राज्याचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, मंत्री अतुल सावे यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

****

पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे २०० किलो क्षमतेचे ६९ प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्राद्वारे अवगत केलं असून, नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

****

भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ‘मेफेड्रॉन’ या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून १२ लाख ६५ हजार  रुपयांचं ‘मेफेड्रॉन’ जप्त केलं.

****

गडचिरोली जिल्ह्यात एका लग्न समारंभात मृत नक्षली कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणे वाजून डीजेच्या तालावर नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यातील कृष्णार इथल्या ५ आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ६ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील कृष्णार इथं सदरिल प्रकार घडला होता.

****

मुंबईच्या मीरा-भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची कोट्यवधी रुपये किंमतीची सुमारे २५४ एकर जमीन दोन विकासकांना देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेतून आव्हान देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०२६ ही जमीन दी इस्टेट इन्वेस्टमेंट आणि मीरा रियल इस्टेट डेव्हलपर्स या दोन विकासकांना देण्याचा निकाल दिला. ही जमीन राज्य शासनाच्या मालकीची असून, याविरुध्द शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी, राज्य सरकारनं घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी असल्याची टीका केली आहे. मूळची सरकारी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन खासगी विकासकांना देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.

****

निदा खान प्रकरणावरून एमआयएम नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी करत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयात जाऊन निवेदन दिलं. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तांना हे निवेदन दिलं. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर करण्यात आला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना नगरसेवकांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी, आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेतली. निदा खान तसंच मतीन पटेल यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नसून, न्यायालय त्यांना दोषी ठरवत नाहीत, तोवर आपण त्यांच्या पाठिशी असल्याचं, ओवैसी यांनी म्हटलं आहे.

****

भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या २०२४ च्या  अहवालातून समोर आलं आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. या मुद्द्यांवरुन सरकारला विधीमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले.

****

मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. १७ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने संचालक, प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ११ मे पर्यंत  वाढवली असून ऑनलाइन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत १५ मे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित केली आहे.

****

वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती यांच्या निमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उत्सव समितीतर्फे आज सकाळी शहरात भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली. बहुजन आणि इतर मागास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या फेरीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त सिडको इथल्या उद्यानात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील मोरवड इथं प्रेमप्रकरणातून निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर सोशल मीडियावरून मिळणाऱ्या सततच्या धमक्यांना कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस दिलीप घोडके असे या २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचे वडील दिलीप निवृत्ती घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल दरवाजाच्या जतन, दुरुस्तीच्या कामामुळे येत्या ११ मे सोमवारपासून वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले. या संदर्भात साहायक पोलिस निरीक्षक सुनील काळे यांनी याबाबत आदेश जारी केले. सोमवारपासून काम पूर्ण होईपर्यंत भडकल दरवाजातून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.

****

आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूर मधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल.

****

राज्यात आज वाशिम इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं ४० अंशापेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment