Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून
टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी. जोसेफ विजय यांनी आज सकाळी शपथ घेतली. हा शपथविधी समारंभ
सकाळच्या सत्रात नेहरू इनडोअर स्टेडियमवर पार पडला. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर
यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबतच आणखी नऊ मंत्र्यांनीही
शपथ ग्रहण केली. या शपथविधी समारंभाला राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील अनेक
नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. २३४ सदस्यांच्या विधानसभेत विजय यांनी १२० नवनिर्वाचित
आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल सी. जोसेफ विजय
यांचं अभिनंदन केलं आणि विजय यांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी ठरावा, यासाठी त्यांना
शुभेच्छा दिल्या. जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार तमिळनाडू सरकारसोबत भागीदारीनं
काम करणं सुरूच ठेवेल, असंही पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात
म्हटलं आहे.
****
“स्पष्ट संकल्प आणि सेवाभावानं
केलेल्या कार्यातून प्रत्येक प्रयत्नाचे सार्थक परिणाम प्राप्त होतात, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळूरु इथल्या अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर
यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं बांधलेल्या
ध्यान मंदिराचं उद्घघाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. आर्ट ऑफ लिव्हिंग हे समाज
आणि शक्तीचं प्रेरणास्थान असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या देशव्यापी
सेवा उपक्रमांचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला. मानसिक आरोग्य, ग्रामीण विकास, निसर्ग संवर्धन
आणि सामाजिक परिवर्तन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या वर्षभर चालणाऱ्या प्रकल्पांचा यामध्ये
समावेश आहे. तत्पुर्वी बंगरुळुत पंतप्रधानांनी एका जाहीर सभेला संबोधितही केलं. पंतप्रधान, मोदी उद्या
गुजरातमध्ये सोमनाथ इथं सोमनाथ मंदीर पुनर्निमाण महोत्सवात सहभागी होणार आहेत.
****
राज्य शासनाच्या महासाधना
सप्ताह उपक्रमात उल्लेखनीय कामगिरीसाठी अकोला जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सन्मानाने
गौरविण्यात आलं आहे. महासाधना सप्ताहांतर्गत शासकीय कर्मचारी क्षमता वाढ प्रशिक्षण, कर्मचारी नोंदणी, डिजिटल प्रशासन, प्रशिक्षणातील
सक्रिय सहभाग आणि प्रभावी अंमलबजावणी या निकषांमध्ये अकोला जिल्हा परिषद राज्यात ठळकपणे
पुढे राहिली. प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सन्मान मिळाला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी
अधिकारी - प्रशासक अनिता मेश्राम यांना यासाठी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं.
****
आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया
रेडिओच्या नव्वदव्या वर्षपूर्ती निमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रातर्फे विविध
कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे 'चांदणे शब्द
स्वरांचे' हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम
प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
आज जागतिक मातृदिन अर्थात
‘मदर्स डे’ साजरा केला जात आहे. जगातील बहुतांश देशांमध्ये दरवर्षी मे महिन्याचा दुसरा
रविवार हा मातृदिन म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. जन्मदात्री आईविषयीचे प्रेम, आदर आणि कृतज्ञता
व्यक्त करण्यासाठीचा हा एक विशेष दिवस मानला जातो. या निमित्ताने आज देशभरात विविध
स्तरांवर आईच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला जात असून, सोशल मीडिया आणि विविध उपक्रमांच्या
माध्यमातून मातांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
****
बीड इथं जिल्हा न्यायालयात
काल आयोजित लोक अदालतमध्ये दीड हजारांहून अधिक प्रकरणं निकाली काढण्यात आली. यातील
एक हजारांहून जास्त प्रकरणं तडजोडीनं निकाली
निघाली. बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचं उद्घघाटन बीडचे जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण अध्यक्ष तसंच प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या
हस्ते झालं.
नांदेड इथं काल महापालिकेत
पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल ७५३ मालमत्ताधारकांनी सहभाग नोंदवत जवळपास
दीड कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला.
छत्रपती संभाजीनगर इथंही जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं काल आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व
अशी एकूण १ हजार ५२४ प्रकरणं तडजोडीनं निकाली निघाली.
****
जालना जिल्ह्यातील डोमेगाव
परिसरात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना
या पावसामुळे दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
****
क्रिकेट - आयपीएलमध्ये, चेन्नई इथं
आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात दुपारी साडेतीन वाजता सामना
सुरू होईल तर दुसरा सामना रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान
सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल.
स्पर्धेत आजच्या गुणतालिकेनुसार
पहिल्या चार संघांमध्ये सनरायजर्स हैदराबाद त्यानंतर गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज
आणि रॉयल चॅलेंजर्स बंगरुळू यांचा समावेश आहे. तर, फलंदाजीच्या ऑरेंज कॅपसाठी
सनरायजर्स हैदराबाद संघाचे ह्येन्रीच क्लासेन आणि अभिषेक शर्मा तर, गोलंदाजीच्या
पर्पल कॅपसाठी गुजरात टायटन्सचा कागिसो रबाडा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगरुळूचा भुवनेश्वर
कुमार यांच्यात चुरस आहे.
****
No comments:
Post a Comment