Wednesday, 13 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      पंतप्रधान तसंच मुख्यमंत्र्यांकडून आपल्या ताफ्यातल्या वाहन संख्येत कपात

·      नीट पेपरफुटी प्रकरणी पुणे तसंच अहिल्यानगरातून प्रत्येकी एकास अटक

·      सीबीएससीचे १२ वी परीक्षेचे निकाल जाहीर

आणि

·      मराठवाड्यात पुढील काही दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. सूर्यफुलासाठी सर्वाधिक प्रति क्विंटल दरात ६२२ रुपये तर त्याखालोखाल कापसासाठी प्रति क्विंटल ५५७ रुपये आणि तिळासाठी प्रति क्विंटल दरात ५०० रुपयांची वाढ देण्यात आली आहे. ग्रेड एधानासाठी किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल २ हजार ४६१ रुपये, संकरित ज्वारीसाठी ४ हजार २३ रुपये, बाजरीसाठी २ हजार ९०० रुपये आणि तुरीसाठी प्रति क्विंटल ८ हजार ४५० रुपये किमान आधारभूत किंमत असेल.

या हंगामात अंदाजे ८२४ लाख मेट्रिक टनांहून अधिक शेतमालाची खरेदी केली जाईल आणि त्यापोटी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अंदाजे दोन लाख ६० हजार कोटी रुपये दिले जातील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणीसुधारणेला आणि आधुनिकीकरणाला मंजुरी दिली असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. मिहान प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत करत, पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. मुंबईत माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यांसाठीच्या वाहनांच्या ताफ्यात कपात केली आहे. ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित असून सुरक्षा दलातली इतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आपला वाहन ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्याची सूचना केली आहे. आज याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, मंत्री तसंच अधिकाऱ्यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत. मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा नियमित विमानसेवेचा वापर करावा, मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा, आदी सूचना केल्या.

****

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हे बोधचिन्ह, सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी संदेश देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सद्वारे होणारी फसवणूक रोखण्याकरता दीर्घकालीन उपाययोजना सूचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असं मंत्री सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

****

नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी पोलिसांनी आज पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीनंतर या महिलेला केंद्रीय अन्‍वेषण विभाग –सीबीआईच्या ताब्यात देण्यात आल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील माहेगाव महाडुक सेंटर या गावातील धनंजय लोखंडे यालाही सीबीआयनं आज ताब्यात घेतलं. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याची कसून चौकशी सुरु असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणातील नाशिक मधला आरोपी शुभम खैरनार याला केंद्रीय गुप्तचर विभागाने ताब्यात घेतलं आहे. शुभमच्या भावाची तसंच मित्रांचीही चौकशी करण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे २४ संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. या प्रकरणी परिसरातल्या शंभरपेक्षा अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएससीचे १२ वी परीक्षेचे निकाल आज जाहीर झाले. गेल्या १७ फेब्रुवारी ते २० एप्रिल दरम्यान ही परीक्षा झाली होती, देशभरातून १७ लाख ६८ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

****

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० वी ची पुरवणी परीक्षा येत्या जून जुलै मध्ये होणार आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.mahasscboard.in या संकेतस्थळावर २१ मे पर्यंत नियमित शुल्कासह तर २५ मे पर्यंत विलंब शुल्कासह आवेदन पत्र भरता येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

****

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त परभणी इथं संभाजी सेनेतर्फे उद्या आमदार डॉ राहुल पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने जयंतीनिमित्त ५१ गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना बि - बियाणे आणि शंभू गाथा पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकरी पुत्रांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

****

बीड जिल्ह्यातील नवनियुक्त पोलीस पाटीलांसाठी आज बीड इथं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सत्र घेण्यात आलं. सामाजिक सलोखा, शांतता आणि गावातील सुरक्षित वातावरण टिकवून ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी सक्रिय भूमिका बजावावी, कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी यावेळी केलं.

****

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज एक बैठक घेतली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करावे आणि त्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे द्यावी, असं गौडा यांनी यावेळी सांगितलं.

****

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील अकृषी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठाचे सर्व कर्मचारी उद्या काळया फिती लाऊन काम करणार आहेत. उद्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा अधिकृत इशारा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिला आहे. यासंदर्भात डॉ.पाथ्रीकर यांनी काल शिष्टमंडळासह कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांची भेट घेतली. शासनाला वेळोवेळी मागण्यांची निवेदनं देऊन, चर्चा करूनही आतापर्यंत ठोस निर्णय झाले नाहीत, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.

****

हवामान

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. १५ मेपर्यंत कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात आणि निर्जलीकरण होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

धुळे शहर आणि जिल्ह्यात तापमान पुन्हा ४४ अंशावर गेले असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. दुपारी उष्णतेच्या झळांनी जनजीवन विस्कळीत केले असून रस्ते निर्मनुष्य होत असल्याचं माच्या वार्ताहरानं सांगितलं.

बीड जिल्ह्यातील बीड किल्ले धारूर, पाटोदा, केज तसंच अंबाजोगाई तालुक्यातील काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच पाटोदा तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाली.

भंडारा तसंच सातारा जिल्ह्यातही आज पाऊस झाला, पावसामुळे आंबा आणि इतर फळपीकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

****

राज्यात आज अकोला इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं ४४ अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ४३ पूर्णांक सहा, परभणी ४३ पूर्णांक एक तर धाराशिव इथं ४० पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. रायपूर इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments:

Post a Comment