Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ मे २०२६ सायंकाळी
६.१०
****
· राज्यात आजपासून
१२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदी-केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा
· प्रधानमंत्री आवास
योजनेत ५ लाख घरांचं वितरण-पाच वर्षांत राज्य बेघरमुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार
· पेट्रोल आणि डिझेलच्या
दरात प्रत्येकी प्रतिलीटर तीन रुपयांनी वाढ
· ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ-लेखक
डॉ.आनंद नाडकर्णी यांचं मुंबईत निधन
· वैद्यकीय अभ्यासक्रम
प्रवेशासाठीची येत्या २१ जून रोजी नीट यूजी फेरपरीक्षा
आणि
· नैऋत्य मोसमी पावसाचं
यंदा केरळमध्ये २६ मे च्या दरम्यान आगमन होण्याचा अंदाज
****
शेतकऱ्यांच्या हितासाठी
राज्यात आजपासून नाफेडच्या माध्यमातून १२ रुपये ३५ पैसे किलो या दराने कांदा खरेदी
सुरु करत असल्याची घोषणा, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली
आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील ५ लाख घरांचं वितरण, चौहान यांच्या हस्ते
आज साताऱ्यात करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. याठिकाणी सहा लाभार्थ्यांना
प्रतिनिधीक स्वरुपात घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी कांद्यांच्या
मुद्यावर बोलतांना चौहान म्हणाले -
बाईट - केंद्रीय कृषीमंत्री
शिवराजसिंह चौहान
ऊस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत
पुढील आठवड्यात दिल्लीत बैठक आयोजित करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. व्ही
बी जी राम जी योजना एक जुलैपासून कार्यान्वीत होणार असल्याचं ग्रामविकास मंत्री चौहान
यांनी सांगितलं. राज्यातील १ कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्यासाठी सक्रिय राहणार
असल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले -
बाईट - केंद्रीय कृषीमंत्री
शिवराजसिंह चौहान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभुराज
देसाई,
सार्वजनिक
बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या
वर्षभरात ५ लाख घर बांधून पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या
५ वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले -
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
****
विमानाच्या तिकीट दरांमध्ये
सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं
केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणाऱ्या दोन विमान कंपन्या
वेगवेगळे दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक
क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र
नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली आहे, त्यावरच्या सुनावणीदरम्यान
न्यायालयाने हे निर्देश दिले.
दरम्यान, आजपासून हवाई टर्बाइन
इंधनावरील मूल्यवर्धित कर –१८ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी केल्याबद्दल नागरी
हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.
****
जागतिक स्तरावर झालेल्या
इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी
तीन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रती लीटर
१०६ रुपये ६८ पैसे तर डिझेलचा दर प्रती लीटर ९३ रुपये १४ पैसे झाला आहे.
मुंबईत सीएनजीच्या दरातही
प्रतिकिलो २ रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो ८४ रुपये झाला
आहे.
****
ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि
लेखक डॉ.आनंद नाडकर्णी यांचे आज सकाळी मुंबईत एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन
झालं. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीसंदर्भात झालेल्या गुंतागुंतीमुळे
डॉ नाडकर्णी यांचं निधन झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. डॉ नाडकर्णी यांची
अनेक नाटकं तसंच पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना पुरस्काराने
गौरवण्यात आलं आहे.
डॉ. नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त
होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील
व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना
श्रद्धांजली वाहिली.
****
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची
नीट यूजी २०२६ ही परीक्षा
येत्या २१ जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था– NTA ने आज जाहीर केलं.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या
उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार
परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना १४ जून पर्यंत प्रवेशपत्रं दिली जातील असं त्यांनी सांगितलं.
परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या
वर्षीपासून संगणक आधारित - सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे.
****
यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी
पावसाचं आगमन २६ मे च्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. नैऋत्य
मोसमी पाऊस केरळमध्ये साधारणपणे एक जूनच्या दरम्यान पोहोचतो, गेल्या वर्षी तो
२४ मे च्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे
५ दिवस आधी केरळमध्ये पोहोचेल असं हवामानखात्यानं म्हटलं आहे.
येत्या २४ तासात अंदमान समुद्र
तसंच अंदमान आणि निकोबार द्वीप समुहाच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीने
अनुकुल वातावरण तयार होत आहे.
दरम्यान राज्यात आज अकोला
इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक नऊ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती
संभाजीनगर इथं ४३ पूर्णांक चार, परभणी ४३ पूर्णांक नऊ तर धाराशिव इथं ४१ पूर्णांक
सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
****
जनगणना-२०२७ अंतर्गत घर सूचीकरण
प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबवण्यात येणार असून, बीड जिल्ह्यातील नागरिकांनी
या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी
तथा प्रधान जनगणना अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे.
यावेळी नागरिकांनी जनगणनेशी
संबंधित ३३ प्रश्नांची माहिती प्रगणकांना उपलब्ध करून द्यावी. या माहितीद्वारे संबंधित
नागरिकांची नोंद जनगणनेच्या पोर्टलवर करण्यात येणार आहे.
****
१६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू
दिन पाळण्यात येतो. केंद्र शासनाने यंदाही राष्ट्रीय डेंग्यू दिन राज्यात सर्वत्र साजरा
करण्याविषयी आदेशीत केलं आहे. यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांनुसार डेंग्यू विषयी
जनतेमध्ये जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी
विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये नागरिकांचाही सक्रिय सहभाग
असणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा
साहित्य परिषदेतर्फे चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी मोफत बालनाट्य शिबीराचं
आयोजन केलं आहे. १७ ते २४ मे या कालावधीत ना. गो. नांदापूरकर सभागृहात सकाळी आठ ते
अकरा या वेळेत शिबिर होणार असल्याचं, समन्वयक डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले. जास्तीत
जास्त मुलांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन मसापचे अध्यक्ष कौतिकराव
ठाले पाटील,
दादा
गोरे,
आसाराम
लोमटे,
गणेश
मोहिते,
रामचंद्र
तिरुके,
रामचंद्र
काळुंखे,
दीपा
क्षीरसागर यांनी केले आहे.
****
शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील
अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक, जैविक तसंच सेंद्रिय
शेती पद्धतीचा अवलंब करावा, असं आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र
कदम यांनी केलं आहे. भविष्यात रासायनिक खतांची उपलब्धता सुरळीत राहावी आणि खतांचे वाटप
पारदर्शक आणि योग्य पद्धतीने व्हावं, यासाठी शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ या प्रणालीवर आपली
नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
आज पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीने
उपान्त्य फेरीत प्रवेश केला. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामीचा
२१-१२ आणि २१-१३ असा पराभव केला. तर याच स्पर्धेत महिला एकेरीत जागतिक क्रमवारीतेल
१२ व्या स्थानावरील आणि ओलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने जपानच्या अकाने यामागुची
हिचा २१-१९,
१८-२१
आणि १५-२१ अश्या गुणफरकाने पराभव करत उपान्त्यफेरीत प्रवेश केला आहे.
दरम्यान, या स्पर्धेत आज भारताचा
लक्ष्य सेन आणि थायलंडचा कुन्लावुत विदीत्सर्न यांच्यात लढत होत आहे.
****
आयपीएल क्रिकेटमध्ये आज लखनौ
सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना होईल. लखनौमध्ये आज साडेसात वाजता
सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment