Friday, 22 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      येत्या ३० जूनपासून राज्यात एसआयआर मोहीम-राजकीय पक्षांकडून राज्यभरात एक लाखावर सहायकांची नियुक्ती

·      टेक वीक २०२६ ची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा-बोधचिन्हाचंही अनावरण

·      महागाई तसंच नीट पेपरफुटी संदर्भात विरोधकांची सरकारवर टीका

·      भीतीपोटी इंधनाची अतिरिक्त खरेदी करू नये-मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन

आणि

·      जनगणना २०२७ अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल

****

राष्ट्रीय जनगणनेअंतर्गत राज्यातील घर यादी आणि गृह गणनेचं काम पूर्ण झाल्यानंतर, येत्या ३० जूनपासून मतदारयाद्या विशेष फेरतपासणी अर्थात एसआयआर मोहिमेला सुरुवात होणार आहे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एसआयआर मोहिमेसाठी राज्यभरात १ लाख २०० हून अधिक बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांच्या नोंदी तपासतील. नावातील किंवा पत्त्यातील बदल, तसंच जुने फोटो बदलण्याची संधी या मोहिमेत मतदारांना मिळेल, दुबार नावे आणि एकसारखे असलेली छायाचित्र शोधून ती यादीतून कमी केली जातील, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार किंवा मृत मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात येतील, संही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना त्यांचे बूथ लेव्हल असिस्टंट नेमण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार, विविध राजकीय पक्षांनी राज्यभरात एकूण १ लाख १३ हजार सहायकांची नियुक्ती केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात टेक वीक २०२६ ची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई टेक वीकसारख्या उपक्रमांमुळे एआय मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि देशातील एआय नवोन्मेषाचे महाराष्ट्र हे अग्रगण्य केंद्र होई, असंही फडणवीस म्हणाले. शासन एआयचा विविध विभागांमध्ये वापर करत असून या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम आणि परिणामकारक होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई टेक वीक लोगोचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. टेक वीक हा कार्यक्रम २९ आणि ३० मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे.

****

नागपूर इथं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने इंधनासह दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतींचा निषेध म्हणून केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाविरोधात अनोखं आंदोलन केलं. शहरातील व्हरायटी चौकात कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेटचं वाटप करत सरकारचा निषेध केला. यावेळी पक्षाच्या पदाधिकारींनी फलक हातात घेऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

****

नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकार जबाबदार असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे. ते नागपूर इथं बोलत होते. डिझेल-पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे, मात्र सरकार तरूणांचे ट्वीटर हँडल बंद करण्यात गुंतल्याची टीका वड्डेटीवार यांनी केली आहे.

****

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दलची टिपण्णी म्हणजे संसदीय लोकशाही बद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचं विधान करून फडणवीस यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे.

****

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर-जालना, बीड-लातूर-धाराशिव, नांदेड-हिंगोली-परभणी या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीची रणनीती, संघटनबांधणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

****

NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने लातूर इथल्या दोन डॉक्टरांची कसून चौकशी केली. डॉ. मनोज देशमुख आणि डॉ. विनोद स्वामी अशी त्यांची नावं असून, या दोन्ही डॉक्टरांनी आपल्या पाल्यांसाठी या प्रकरणातला मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या पी. व्ही. कुलकर्णीकडून प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा संशय आहे.

****

नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये, असं आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल-डिझेलची सुमारे २० टक्के अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं आहे.

****

चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वनविभागाकडून ही माहिती देण्यात आली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पंचानामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे.

****

जनगणना २०२७ अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या कामात जिल्ह्याने ९४ पूर्णांक ५९ शतांश टक्के प्रगती नोंदवली आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे घरगणना मोहिमेला वेग मिळाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

****

आयुष्मान भारत योजनेचं काम अधिक समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने करून त्याचा लाभ तळागळातील नागरिकांना होईल, असं नियोजन करण्याच्या सूचना महाराष्ट्र आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिल्या आहेत. ते आज बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं एका आढावा बैठकीत बोलत होते. विविध आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

****

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद द्वैवार्षिक निवडणुकीबाबत धाराशिव जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ आहे. २ जून रोजी अर्जांची छाननी होईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून असेल. १८ जून  रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या १७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने आज निलंबित केले आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने राबवलेल्या तपासणी मोहिमेत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदींमधील त्रुटी तसच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आली. याप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या, मात्र समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने कृषी विभागाने ही कारवाई केली. जिल्ह्यात १ एप्रिल पासून आतापर्यंत ८६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

****

बीड जिल्ह्यात लग्न समारंभात होणारी अवैध फटाक्यांची आतषबाजी थांबवण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे केली आहे. मागील काही दिवसात अनेक लग्न समारंभात चुकीच्या पद्धतीने फटाके फोडण्यात येत असून, त्यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

****

नांदेड शहरातील नालेसफाईचं काम कोणत्याही परिस्थितीत ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पुरामुळे २ हजार ७७३ घरे बाधित होतात. या सर्व घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

****

सैन्यभरतीसाठी येत्या एक ते बारा जूनदरम्यान सामायिक प्रवेश पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. विविध २२ संवर्गातल्या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरात २०६ शहरांमध्ये ४०३ परीक्षा केंद्रं निर्धारित करण्यात आले आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या छावणी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

राज्यात आज ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४४ अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक आठ, तर धाराशिव इथं ४० पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

 

विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या २४ तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातही बीड आणि धाराशिव जिल्ह्यांना आज तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना उद्या उष्णतेचा यलो अलर्ट जारी केलेला आहे.

****

No comments:

Post a Comment