▼

Saturday, 23 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      भारताच्या विकासयात्रेत सहभागासाठी जग उत्सुक; १९ व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      अहिल्यानगर जिल्ह्यात तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते राष्ट्रार्पण

·      पेट्रोल डीझेलच्या दरात लीटरमागे सुमारे ९० पैसे वाढ

·      छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात ४० एमएलडी पाणी देण्याची प्रशासनाकडून ग्वाही

आणि

·      नवी मुंबईत पलावा सिटीतून २१ नायजेरियन नागरिकांना अटक

****

भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज १९ व्या रोजगार मेळाव्याला दूरदृष्य संवाद पद्धतीने संबोधित करत होते. हा रोजगार मेळावा देशभरातल्या ४७ ठिकाणी भरवण्यात आला. ५१ हजार युवकांना आज नियुक्तीपत्रं देण्यात आली. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या १८ रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे १२ लाख युवकांना विविध सरकारी विभागांमधे नियुक्ती मिळाली आहे.

****

केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं रोजगार मेळाव्यात बोलत होते. यावेळी गडकरी यांच्या हस्ते ३०८ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित आहेत. या डिफेन्स क्लस्टरमध्ये क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक MSME उद्योगांना मोठी चालना मिळणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

तत्पुर्वी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यांनी आज शिर्डी इथं श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थावनचे मुख्यी कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे यावेळी उपस्थित होते.

****

सार्वजिनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर ८७ पैशांनी, तर डिझेल प्रति लिटर ९१ पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर १०८ रुपये ४९ पैसे प्रति लिटर, तर डिझेलचा दर ९५ रुपये २ पैसे प्रति लीटर झाला आहे. गेल्या ९ दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे.

पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरु झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. 

****

देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑईल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या १ ते २२ तारखेपर्यंत पेट्रोल विक्रीत १४ टक्के तर डिझेल विक्रीत १८ टक्के वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. 

****

राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक,  आर्थिक,  शैक्षणिक,  आरोग्यविषयक आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा, यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितलं आहे. राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसंच एकल महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती, यासाठी महिला आणि बाल विकास विभागाने मसुदा समिती गठीत केली असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं.

****

कर्करोग विरोधी लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी कर्करोग रुग्णालये,  कर्करोग तज्ज्ञ, सेवाभावी संस्था यांचा सहभाग महत्वाचा असल्याचं प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी केलं आहे. आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई इथं आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्करोग तपासणीसाठी राज्यातील आठ परिमंडळात प्रत्येक एक कर्करोग निदान व्हॅनद्वारे तपासणी सुरू असून, आतापर्यंत तीन कोटीपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. कर्करुग्णांच्या उपचारासाठी राज्यात २७ ठिकाणी डे केअर युनिट सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती अबिटकर यांनी दिली.

****

सिंधी समाजाचे संत साई साधराम यांच्या पार्थिव देहावर आज पाकिस्तानात सिंध प्रांतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगाचं जळगाव इथल्या संत बाबा हरदासराम समाज मंदिर इथं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. मोठ्या संख्येने उपस्थित सिंधी बांधवांनी अंतिम दर्शन घेत संत साई साधराम यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. येत्या सोमवार पासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, प्रमाणपत्रे आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येईल, असं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळवलं आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत २४ मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत २३ मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावर गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात ४० एमएलडीपर्यंत पाणी मिळेल, असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं आहे. त्या आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. नव्या २ हजार ७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेतून शहराला वाढीव पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी सांगितलं. वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.

****

ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवत पलावा सिटी परिसरातून २१ नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी दोन सराईत गुन्हेगार आहेत. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते.

****

नांदेड शहरातील देना बँक परिसरातल्या एका दुकानातून स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल १४ लाख ४ हजार रुपयांचे ७०३ धारदार शस्त्र जप्त केले. याआधी ७ मे रोजीही नांदेड शहरातून पोलिसांनी ४ हजारांहून अधिक शस्त्र जप्त केले होते. याप्रकरणी दुकान मालक रणजीतसिंग रामसिंग सरदार याच्या विरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

देशात लागू झालेल्या नवीन चार कामगार संहिताबाबत महाराष्ट्र शासनाने संबंधित नियमांचा मसुदा अधिसूचना जारी करून प्रसिद्ध केला आहे. या मसुद्यावर संबंधित घटकांनी आपल्या हरकती आणि सूचना १२ जूनपर्यंत नोंदवाव्यात, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात खरात आडगाव इथं एका बोरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी दोन मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या अपघातात १६ वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

****

उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी येत्या ११ जून रोजी लातूर इथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे. यासाठी नव उद्योजकांनी लातूर जिल्हा उद्योग केंद्र इथे आपल्या उद्योग तथा व्यवसायाची माहिती द्यावी, असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी केलं आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथे लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल.

****

राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४१ पूर्णांक तीन दशांश, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक चार, बीड इथं ४० पूर्णांक पाच तर धाराशिव इथं ३८ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस उष्णतेचा रेड अलर्ट, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातही धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना आज उष्णतेचा यलो अलर्ट जारी केलेला आहे.

****

No comments:

Post a Comment