Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ मे २०२६ सायंकाळी
६.१०
****
· भारत आणि अमेरिकेत जागतिक सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी
असल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं प्रतिपादन
· यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांकडून सहली आणि
परदेश प्रवासावर कमी खर्च
· नागपूरमध्ये गोदाम मालवाहतुक आणि साठवणुक केंद्राचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
· शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं आवाहन
आणि
· वीजखर्च कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेची
बहुतांश कार्यालयं तसंच मोठे प्रकल्प सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय
****
भारत - अमेरिका भागीदारी अतिशय सखोल
आणि व्यापक सहकार्यावर आधारित जागतिक सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी असल्याचं, परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी म्हटलं
आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि जयशंकर यांच्यात आज नवी दिल्लीत विविध
जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली, त्यानंतर
ते बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर
देत, सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण यासह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा
झाली. दोन्ही देशांतली जागतिक सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक आणि सखोल
सहकार्यावर आधारित असल्याचं जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. दोन्ही देशांतल्या
व्यापार कराराला लवकर अंतिम स्वरूप देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं. भारताच्या ऊर्जा
सुरक्षिततेसाठी विविध आणि विश्वासार्ह स्रोत आवश्यक असल्याचं सांगत, भारत परवडणाऱ्या दरात ऊर्जा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचं जयशंकर यांनी
स्पष्ट केलं.
भारत अमेरिकेसाठी महत्त्वाचा धोरणात्मक
भागीदार असल्याचं सांगत, मार्को रुबियो यांनी,
भारताचं महत्त्व अधोरेखित केलं.
****
यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी
सहली आणि परदेश प्रवासावर, फेब्रुवारी महिन्याच्या
तुलनेत कमी खर्च केल्याचं, भारतीय रिझर्व बँकेनं जारी केलेल्या
आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर एक अब्ज
३० कोटी डॉलर्स खर्च केले, तर मार्च महिन्यात हा खर्च एक अब्ज
नऊ कोटी होता, असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे
तेलाच्या किमतीत झालेली वाढ, आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण,
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
****
देशातली ‘वजने आणि मापे’ तपासणी यंत्रणा
बळकट करण्यासाठी, ग्राहक व्यवहार विभागानं,
शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून,
त्यासाठी, सरकारने वैध मापनशास्त्र नियम,
२०१३ मध्ये सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन
आणि मापांच्या २३ श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. सुधारित नियमांनुसार, या केंद्रांच्या माध्यमातून, पेट्रोल, डिझेल, CNG, LPG, LNG आणि हायड्रोजन डिस्पेंसर,
याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल,
कार्यक्षमता वाढेल, आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या
वापराला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
****
इबोला या विषाणुजन्य संसर्ग प्रभावित
देशांतली बदलती परिस्थिती आणि जागतिक आरोग्य संघटना- डब्ल्यूएचओ च्या शिफारशी लक्षात
घेऊन केंद्र सरकारनं सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत, काँगो, युगांडा आणि दक्षिण
सुदान इथं अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या देशांमध्ये हा आजार पसरण्याचा
सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आलं आहे.
****
पश्चिम बंगालमधल्या फल्ता मतदारसंघात
२१ मे रोजी झालेल्या पुनर्मतदानात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवांशू पांडा यांनी
विजय मिळवला. त्यांनी एक लाख आठ हजार मतांच्या फरकाने हा विजय संपादन केला.
****
जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग
बनायचं असेल, तर आपल्याला जागतिक
स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूरच्या निमजी गोंडखैरी परिसरात, १०० एकरावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर ते बोलत होते. या
सुविधेमुळे उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा
फायदा होणार असून, मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर
असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं, ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सध्याची स्थिती पाहता आणखी कितीतरी
प्रमाणात लॉजिस्टीक्सच्या व्यवस्थेत वाढ होण्यास वाव दिसत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या
प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, गोदाम लॉजिस्टिक्स पार्क, हा नागपूरच्या आर्थिक विकासाच्या
दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त
केला.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मालवाहतुकीत ईलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात
वापर झाल्यास इंधन खर्चात बचतीसह पर्यावरणालाही मदत होईल आणि पर्यायाने लॉजिस्टिक्सवर
होणारा खर्चही कमी करता येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ – सीबीएसईने
इयत्ता बारावीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक अडचणींबाबत मोठी कबुली
दिली आहे. या प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून चुकीने जास्त आणि चुकीची फी
कपात झाली असल्याचं मंडळाने मान्य केलं असून, अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त घेतलेली फी परत केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं
आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुढील प्रक्रिया
पूर्ण करून दिली जाईल असंही सीबीएसईने याबाबत आज जारी केलेल्या परिपत्रकात सांगितलं
आहे.
****
मराठवाड्यासह राज्यातल्या शेतकऱ्यांनी
खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं आवाहन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आलं आहे. एल निनोच्या
प्रभावामुळे यंदा पावसामध्ये अनियमितता निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली
असून, राज्यात सर्वसाधारण ते कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत येवून कमी पाण्यावर तग धरणारी पिकांची निवड,
पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य बीजप्रक्रिया, मिश्रपीक
आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब, ठिबक आणि तुषार सिंचनासह शेततळे,
पाणी साठवण आणि संरक्षित सिंचन व्यवस्थापनावर भर देणं यासह पावसाचं पाणी
अडवणं, जिरवणं आणि मृद – जलसंधारण उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचं
आवाहन, विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर इंद्र मणि यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठ आणि कृषि विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन वैज्ञानिक
पद्धतीने शेती करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीजखर्च
कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालयं आणि मोठे प्रकल्प सौरऊर्जेवर आणले जाणार आहेत.
राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनाने किमान
३० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी, प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे
यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणीपुरवठा
प्रकल्पांचा यात समावेश असेल.
****
प्रस्थापितांकडून इतर मागास प्रवर्ग
– ओबीसींना भयभीत केलं जात असून, सरकार ओबीसींची बाजू ऐकून घ्यायला तयार नसल्याचा आरोप, ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. ते आज सोलापूर इथं
वार्ताहरांशी बोलत होते. इतर समाजांना आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे ओबीसींमध्ये नाराजी
पसरली असून, सरकारने वेळीच सावध होण्याचा इशारा त्यांनी दिला.
आमदार प्रसाद लाड, आमदार रोहित पवार यांच्यासह मराठा आंदोलक मनोज
जरांगे यांच्यावरही हाके यांनी जोरदार टीका केली.
****
छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथल्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. व. ल. देशपांडे यांचं
आज निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.
****
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार
समितीमध्ये सुरु असलेल्या आंबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात दोन
हजार २०३ क्विंटल आंबा दाखल झाला असल्याचं बाजार समितीकडून सांगण्यात आलं. ही या हंगामातली
आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली असून, दर्जानुसार आंब्याला प्रतिक्विंटल
साडेचार ते साडेसात हजार रुपयांचा भाव मिळाला.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग – यूपीएससी नागरी
सेवा पूर्व परीक्षा २०२६ आज घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या २० केंद्रांवर
ही परीक्षा पार पडली. तीन हजार ९०४ उमेदवारांनी ही परीक्षा दिली, तर एक हजार ९३८ उमेदवार अनुपस्थित होते.
****
बिहारमधे रांची इथं आयोजित ‘फेडरेशन
चषक ॲथलेटिक्स’ स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत
राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्ण पदक जिंकलं.
****
No comments:
Post a Comment