Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मे २०२६ सायंकाळी
६.१०
****
· राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातले
पद्म पुरस्कार प्रदान; परभणी इथले कृषीसेवक
दादा लाड यांचा गौरव
· देशात एलपीजी, पीएनजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची
सरकारची माहिती
· पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ
· राज्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू
आणि
· मराठवाड्यात अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस
****
यावर्षीचे पहिल्या टप्प्यातले पद्म
पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रदान केले. अभिनेते धर्मेंद्र यांना
मरणोत्तर पद्मविभूषण यावेळी प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी
यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना
पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
परभणी इथले कृषीसेवक श्रीरंग देवबा
ऊर्फ दादा लाड यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. शेती, शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेल्या
अविरत कार्यासाठी त्यांना या पुरस्कारनं गौरवण्यात आलं.
अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे
सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.
याशिवाय समाजसेवेसाठी रामचंद्र आणि
सुनिता गोडबोले, तमाशा कलाकार रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर,
दिव्यांग ॲथलीट प्रवीण कुमार यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात
आला.
पहिल्या टप्प्यातले ६६ पद्म पुरस्कार
यावेळी प्रदान करण्यात आले.
****
देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर
मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय
स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट
बँक ऑफ इंडिया च्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या.
सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी
दिली. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी
यावेळी व्यक्त केला.
****
देशात एलपीजी, पीएनजी, पेट्रोल आणि डिझेलचा
पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून खरेदी करू नये, असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत पत्रकार
परिषदेत बोलत होत्या. नागरिकांनी ऊर्जा बचतीला प्राधान्य देत शक्य असल्यास पीएनजी,
इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक कुकटॉपचा वापर करावा, असंही आवाहन त्यांनी केलं. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी
सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं. परिस्थितीवर केंद्र आणि
राज्य सरकारकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, पेट्रोल-डिझेलचा
पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती शर्मा यांनी
दिली.
देशात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, खरीप हंगामासाठी कोणतीही टंचाई भासणार नाही,
असं खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं.
****
पेट्रोलच्या दरात आज दोन रुपये ६१ पैसे, तर डिझेलच्या दरात दोन रुपये ७१ पैशांची वाढ
झाली. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर १११ रुपये २१ पैसे प्रति लिटर तर डिझेलचे दर
९७ रुपये ८३ पैसे प्रति लिटर झाले आहेत. १५ मे पासून आजपर्यंत चार वेळा पेट्रोल आणि
डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सात रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली
आहे.
****
नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी
राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही
एनटीए नं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे, अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश
परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती
पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. नीट
परीक्षा रद्द झाल्यामुळे २२ लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी
केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.
****
नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या
प्राध्यापक मनिषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने सहा दिवसांची
सीबीआय कोठडी दिली आहे. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना
पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
उपस्थितीत राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनी यांच्यात आज सामंजस्य करार झाला. अग्रेको
इंडिया ही ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. या
करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातल्या फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी
आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. यामुळे पुण्यात ४०० कोटीं रुपयांच्या गुंतवणुकीसह
पुढील १० वर्षात एक हजार रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत
जवाहर बालभवनाच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण झालं. या आधुनिक बालभवनात लहान मुलांसाठी
कला, संस्कृती आणि वाद्य प्रशिक्षणाची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
करून देण्यात आली आहे. तसंच, लवकरच इथं सायन्स पार्क उभारण्यात
येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परिवहन
विभागाला संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप
सरनाईक यांनी दिले आहेत. गायींची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अमानुष अत्याचार रोखण्यासाठी हे पाऊल
उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. परिवहन आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार,
राज्यातले सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे
आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
****
राष्ट्रीय परीक्षा संस्था – एनटीएने या महिन्याच्या २८ तारखेला
नियोजित असलेली विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. सरकारने बकरी ईदची
सुटी २८ तारखेला जाहीर केली, त्यामुळे हा बदल केला आहे. या परीक्षेच्या
उमेदवारांसाठी सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती
संस्थेने दिली आहे.
****
राज्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात
तेरा जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे
एक चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झाले. काही मृतदेह हाती
लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले आठ
जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला.
दुसरा अपघात मुंबई-आग्रा राष्ट्रीय
महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरुन येणाऱ्या
ट्रकला धडकला त्याच वेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकले. या अपघातात पाच
जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पंचवीस जण जखमी
झाले.
****
कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य
करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात
प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर त्या आज बोलत होत्या. जिल्ह्यात कुपोषणाचं
प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करणं हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.
****
नांदेड इथं हमाल मापारी हातगाडा संघाच्या
वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आलं. कामाची मजुरी आणि त्यावरील
लेव्ही अदा न केल्यामुळे जिल्ह्यातील कामगारांना २६ कोटी ४५ लाख ३८ हजार रुपये मिळू
शकले नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, शासनाने काढलेल्या नव्या परिपत्रकामुळे जिल्ह्यातल्या जवळपास ३००
हून अधिक कामगार आणि त्यांचे कुटुंबीय बेरोजगार होतील, आदी प्रश्न
आंदोलनकर्त्यांनी मांडले.
****
लातूरमधला प्रसिद्ध ट्युशन एरिया बंद
करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षातर्फे आज जिल्हा उद्योग केंद्रासमोर बोंबाबोंब
आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी आदेशाची प्रतीकात्मक होळी करत प्रशासनाच्या
निर्णयाचा निषेध नोंदवला.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी
पूर्व मौसमी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात फुलंब्री शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी
पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.
लातूर जिल्ह्यातही अनेक भागांत आज मुसळधार
पाऊस झाला. निलंगा तालुक्यात जाऊ, नणंद, जेवरी, जवळगा आदी गावांमध्ये
जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या
घटना घडल्या. औसा तालुक्यातल्या खोरोसा, लामजना, किल्लारी तसेच परिसरातील इतर गावांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक
झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी वर्गात
पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या
स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उन्हाच्या कडाक्यात हैराण
झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा
मिळत आहे.
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथल्या लऊळ
परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वार्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले तसंच गारपीट आणि
मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं आडवी झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
****
छत्रपती संभाजीनगर विभागात कृषि निविष्ठांचं
वितरण, तपासणी आणि सनियंत्रण
अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हानिहाय पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. विभागात चांगल्या
प्रतीच्या कृषि निविष्ठांचं व्यवस्थित वितरण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभावी
नियोजन करावं, तसंच शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक होणार नाही याची
दक्षता घ्यावी, अशा सूचना विभागीय कृषि सहसंचालक सुनिल वानखेडे
यांनी दिल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment