Thursday, 28 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      सीबीएसईच्या बारावी परीक्षेचं पुनर्मूल्यांकन-केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

·      कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून सिद्धारमैया पायउतार

·      सत्तेत सहभागापासून वंचित असल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची खंत

·      प्रख्यात शायर डॉ. बशीर बद्र यांचं भोपाळ इथं निधन

·      स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत २९ महाविद्यालयांना प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश

आणि

·      सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच

****

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल. तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले -

होल्ड.. बाईट - धर्मेंद्र प्रधान

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते, अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली.

****

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. मे २०२३ मध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सिद्धरामैया दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते. यापूर्वीही त्यांनी २०१३ ते २०१८ या कालावधीत मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. कॉग्रेस पक्षाला कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे नामनिर्देशित मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावं, अशी विनंती सिद्धरामैया त्यांनी राज्यपालांकडे केली आहे. काँग्रसचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे.

****

भाजप-शिवसेनेना युतीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस सहभागी झाल्याने रिपाईचं महत्त्व कमी झालं, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज यवतमाळ इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. रिपाइला सत्तेत सहभाग मिळत नसून, एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता, अशी नाराजी आठवले यांनी व्यक्त केली. भाजपच्या कोट्यातून आम्हाला विधान परिषद किंवा महामंडळ मिळायला हवं, असं सांगतानाच, महायुतीत रिपाईला दुर्लक्षित करू नये, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ३० जूनपासून बेमुदत उपोषणाचा मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा इशारा दिला आहे. या आंदोलनादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या २९ मे पर्यंत पूर्ण कराव्यात, अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे.

****

मुंबई महानगर प्रदेशात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो ५ या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रोमार्गाची एकूण लांबी ३४ किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून तिचा विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे.

****

प्रख्यात शायर डॉ. बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. बद्र यांना बऱ्याच काळापासून स्मृतिभ्रंशाचा आजार होता, गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावली होती, आज त्यांचं निधन झालं, बशीर यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत -

जिंदगी तूने मुझे कब्र में कम दी है ज़मी।।

पांव फैलाऊं तो दीवार से सर लगता हैं

आयुष्याकडे अशी तक्रार करणारे बशीर बद्र यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या इथं झाला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी मेरठ इथल्या महाविद्यालयात कॉलेजमध्ये उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं.

बशीर यांचे हिंदीत १२ हून अधिक तर उर्दूत सात काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

खुदा हम को ऐसी खुदाई न दे।।

कि अपने सिवा कुछ दिखाई न दे

अशा साध्या सोप्या शब्दांचा नेमका वापर, हे बशीर यांच्या रचनांचं सौंदर्य मानलं जातं. त्यांच्या रचनांमधून स्नेह, विरह, वेदनेसह जीवनातलं प्रतिबिंब उमटतं, म्हणूनच त्यांच्या रचना जनमानसात प्रिय ठरल्या..

आपल्या एका रचनेत ते म्हणतात,

सात संदूकों में भर कर दफ्न कर दो नफरतें।।

आज इंसा को मोहब्बत की जरूरत हैं।

- आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर

साहित्यातील योगदानाबद्दल डॉ. बशीर बद्र यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बद्र यांना श्रद्धांजली वाहिली. बद्र यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या त्यांच्या जन्मगावी नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सवाद्य शोभा यात्रा काढण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सर्व पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, नेते तसेच स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. 

धाराशिव इथं जयोस्तु प्रतिष्ठानच्या वतीने सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सावरकर चौकात सावरकरांचा पुतळा बसवून चौकाचं सुशोभीकरण करण्यात यावं, अशी अपेक्षा यावेळी जयोस्तु प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

****

बीड इथल्या सावरकर महाविद्यालयात सावरकर जयंती साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं समग्र जीवन आणि साहित्य सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे, असं भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य यावेळी म्हणाले.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण म्हणजेच ‘F’ ग्रेड मिळाला आहे, अशा तब्बल २९ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सर्वाधिक ठरा, लातूर जिल्ह्यातल्या सात आणि परभणी जिल्ह्यातल्या चार महाविद्यालयांचा समावेश आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षणात एकूण ७२ महाविद्यालयांच्या यादीमध्ये केवळ पाच महाविद्यालयांना ‘O’ ग्रेड आणि ११ महाविद्यालयांना ‘A’ ग्रेड मिळवता आला आहे. १३ महाविद्यालयांना B ग्रेड, चार महाविद्यालयांना C ग्रेड, पाच महाविद्यालयांना D ग्रेड मिळाला आहे.

****

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरीद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदागहमधे नमाज अदा करण्यात आली. 

छत्रपती संभाजीनगर इथं बकरीद निमित्त छावणी ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करुन, एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 

हिंगोलीतल्या  ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना  शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. 

****

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पी. व्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा २१-९, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या ॲन से यंग हिच्याशी होईल.

पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

****

राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४१ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस, छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक सहा, बीड ३९ पूर्णांक एक तर धाराशिव इथं ३८ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment