Thursday, 28 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मे २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

देशाच्या काही भागात ईद–उल–अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. हा सण समाजात बंधुभाव आणि आनंदाची भावना अधिक दृढ करो. सर्वांच्या यशस्वी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दोमोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय, असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  

****

भारताकडे असलेल्या अतिरिक्त रिफायनिंग क्षमतेमुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा पुरवठा कायम आहे. किरकोळ ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्या तोटा सहन करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना इंधनाची अनधिकृत साठेबाजी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रसरकाने दिले आहेत. नागरिकांनी इंधन वितरण व्यवस्थेचा जबाबदारीने आणि शिस्तीत वापर करावा, असं आवाहनही सरकारने केलं आहे.  

****

आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह-इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये, राज्यातल्या सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे.

****

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातल्या ७५ टक्केपेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना, तसंच ५० ते ७५ टक्केदरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याच्या बाजारभावाबाबत स्थिर आणि दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यात यावं, अशी मागणी नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. नाफेड आणि एनसीसीएफतर्फे सुरू असलेली कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून करण्यात यावी, तातडीने कांदा खरेदी केंद्र सुरू करावं, आदी मागण्याही त्यांनी काल दिल्ली इथं शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केल्या.  

****

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्यांतर्गत आय एफ एम एस आणि ॲग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी एफ एस ए एस हे मोबाईल अॅ्प विकसित करण्यात आलं असून, QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर तीन दिवसांत निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळं रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे.

****

वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे, असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅणडवोकेट संजय पुराणिक केलं. रत्नागिरी इथं काल आयोगाच्या अर्ध न्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते.

प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा, असंही बैठकीत सांगण्यात आलं.

****

बीड जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा करावा अशा मागणीचं निवेदन आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना दिलं आहे. पेट्रोल पंप चालकांकडून होत असलेला इंधन विक्रीचा कथित काळाबाजार तात्काळ थांबवावा, असं क्षीरसागर यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

****

भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. २१ वर्षीय ईशानं अंतिम फेरीत ५० पैकी ४३ गुण मिळवत, दक्षिण कोरियाच्या किम येजीच्या नावावर असलेला ४२ गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

****

No comments:

Post a Comment