Sunday, 31 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      चांगल्या हेतूने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी समाजात मोठा बदल घडवता येतो; पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन

·      मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना सरकारकडून कोणतंही नवं आश्वासन नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

·      पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतिनिमित्त अभिवादनपर कार्यक्रम

·      नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून ८० तोळे सोनं लंपास केल्याचा प्रकार उघडकीस

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत

****

चांगल्या हेतूने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी समाजात मोठा बदल घडवता येतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा १३४वा भाग आज प्रसारित झाला. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते, तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो असं ते म्हणाले.

देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पीत राहावे असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. सध्याच्या वातावरणात गरज असेल तरच काळजी घेऊन घराबाहेर पडावं, असं आवाहन करताना ते म्हणाले,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

उन्हाळ्याच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या काळात कोकण आणि गोव्यातल्या कोकम सरबत आणि सोलकढी अशा पेयांसह, देशभरात प्यायली जाणाऱ्या विविध हंगामी पेयांचा उल्लेखही केला. यानिमित्तानं त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणाच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा देखील उल्लेख केला. आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचल्याचं म्हणत, आंबा उत्पादक शेतकऱ्यांची प्रशंसा त्यांनी केली.

आपल्या वेधशाळांचं महत्त्वही पंतप्रधानांनी मन की बात मधून अधोरेखित केलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

नेदरलँड्स भेटीत ‘चोल’ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आला, देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरु, क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी केलेली उल्लेखनीय कामगिरी, ‘नमामि गंगे’ अभियान अंतर्गतच्या ‘डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका’ ही मोहिम, आदी मुद्यांचाही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केला.

****

जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. ४० वर्षांपेक्षा दीर्घ कारकिर्दीत, जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय परिस्थितीत आणि भौगोलिक प्रदेशात सेवा बजावली, आणि भारतीय लष्करामध्ये महत्वाच्या पदांवर काम केलं.

****

ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांनी आज देशाचे २७ वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. देशाचं हित जपण्याप्रति, भारतीय नौदल सदैव सतर्क असून, प्रादेशिक सुरक्षेबाबत सध्याच्या आव्हानात्मक, जटिल, अनपेक्षित आणि अनिश्चित वातावरणात नौदल सक्रियपणे तैनात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

तंबाखूच्या सेवनापासून असलेल्या धोक्यांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज ‘जागतिक तंबाखू विरोधी दिवस’ पाळला जात आहे. तंबाखू सेवन पूर्णपणे थांबवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं हाती घेतलेला हा जागतिक कार्यक्रम आहे. ‘आकर्षणाचा मुखवटा उतरवू- निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनावर मात करू’, ही यंदाच्या या दिवसाची संकल्पना आहे.

****

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या ऑरेंज अलर्टनंतर भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. हवामानात सुधारणा होईपर्यंत भाविकांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.

****

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्या संदर्भात सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून, कोणतंही नवं आश्वासन सरकारने दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अहिल्यानगर इथं आज वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना १२ कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं.

****

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर जयंती महोत्सवात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, अहिल्याबाईंच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज असल्याचं मत व्यक्त केलं. अहिल्यादेवींनी अनेक वैयक्तिक आघात सहन केले; मात्र त्यातून खचून न जाता आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला, त्यांनी समाजाच्या रक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, असं शिंदे म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात येत आहे. महापौर समीर राजूरकर यांनीही अहिल्याबाईंना अभिवादन केलं. तसंच शोभायात्रा, धनगरी डफ आणि वाघ्या-मुरळी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे.

परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी अहिल्याबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

राज्यातल्या आगामी विधानपरिषद निवडणुकीत परभणी –हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नावंदर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाजमाध्यमावरून ही माहिती दिली. सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे.

औरंगाबाद – जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आतापर्यंत ३३ जणांनी ५५ अर्ज घेतले असून, अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही.

या निवडणुकीसाठी उद्या एक जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे, तर मतदान आणि मतमोजणी २२ जून ला होणार आहे.

****

नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेलं तब्बल ८० तोळे सोनं बँकेच्या कॅश इन्चार्ज आणि सर्विस मॅनेजरनेच लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी लॉकरमध्ये बनावट सोनं ठेवलं होतं. बँक कॅश इन्चार्ज आदित्य सेनगावकर आणि सर्विस मॅनेजर जीवन जगदाळे या दोघांविरुद्ध शाखेचे मुख्य शाखा व्यवस्थापक राजीव कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सेनगावकर याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

राज्यात हिंगोली, रायगड आणि वर्धा जिल्ह्यात घडलेल्या तीन घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला.

हिंगोली जिल्ह्यात सेनगाव शहराजवळ पिकअप वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला. शिक्षक संतोष देसाई आणि गजानन पत्की हे दोघे जनगणनेचं शासकीय कर्तव्य पार पाडून रिसोड इथं गेले होते, परतत असताना हा अपघात झाला. हे दोघे सेनगाव तालुक्यातल्या वरुड चक्रपाण इथले रहिवासी होते.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल.

****

No comments:

Post a Comment