Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 June
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १ जून
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत चार
प्रमुख शहरांमध्ये ४२ रुपयांपासून ते ५३ रुपये ५० पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ४२ रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता त्याची किंमत तीन हजार ११३ रुपये
५० पैसे इतकी असेल. मुंबईमध्ये ही वाढ ४३. रुपये ५० पैसे इतकी करण्यात आली असून, त्याचीकिंमत आता तीन हजार ६७ रुपये
५० पैसे होईल. कोलकाता इथं ५३ रुपये ५० पैसे, तर चेन्नईत ४२
रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठीच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांमध्ये
कोणताही बदल करण्यात आला नाही.
****
सर्वोच्च न्यायालयात पाच नवीन न्यायाधीशांची नियुक्ती
करण्यात आली आहे. यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या
३७ वर पोहोचली आहे. कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाज माध्यमावर
ही माहिती दिली. कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य
न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू –काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली, तसंच, वरिष्ठ वकील वेंकिटा सुब्रमणी मोहना यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून
नियुक्ती करण्यात आली आहे.
****
पाच दिवसांच्या भारत-दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष
यु मीन आँग ईयांग आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या
भेटीत भारत आणि म्यानमारमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामरिक संबंध
अधिक दृढ करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्राध्यक्ष ईयांग हे राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार असून, उद्या ते मुंबई
दौऱ्यावर जाणार आहेत. काल त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतही
महत्त्वपूर्ण चर्चा केली.
****
पथविक्रेत्यांना परवडणारं कर्ज आणि सामाजिक सुरक्षा
उपलब्ध करून देणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेला
आज सहा वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे लाखो पथविक्रेत्यांना आर्थिक बळ मिळालं असून, लाभार्थ्यांच्या सरासरी उत्पन्नात
दरवर्षी २० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.
****
राज्यसभेच्या २४ जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची
अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून
सुरू होत असून, आठ जूनपर्यंत अर्ज दाखल
करता येणार आहेत. मतदान आणि मतमोजणी १८ जून रोजी होणार आहे. माजी पंतप्रधान एच. डी.
देवेगौडा, केंद्रीय मंत्री आणि
भाजप नेते जॉर्ज कुरियन, रावनीत सिंग तसंच राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा कार्यकाळ
संपत असल्याने त्यांच्या जागांचाही या निवडणुकीत समावेश आहे. महाराष्ट्रात विद्यमान
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर निर्माण
झालेल्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
****
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मतदान आणि मतमोजणी २२ जून ला होणार
आहे. या निवडणुकीसाठी भाजप ११, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागांवर लढणार आहे. भाजपने छत्रपती संभाजीनगर–जालना
इथून सुहास शिरसाट यांना, नांदेडमधून अमर राजुरकर यांना, तर धाराशिव–लातूर–बीड मधून बसवराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परभणी –हिंगोली
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विवेक नावंदर यांना, तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून
सुरेंद्र उर्फ बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे.
****
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्याने
आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने याचा
तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून, तपासासाठी सीआयडीची पाच विशेष पथकं नियुक्त करण्यात आली
आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या
काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या बहाडोली गावासाठी वन विभागाकडून
“बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग” हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून
देत गावाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांकडून जांभूळाची थेट खरेदी करण्यात येणार असून, खरेदी प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता
राखली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची थकबाकी न ठेवता शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला
देण्यात येणार आहे.
****
भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग
शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावलं. काल
झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी इंडोनेशियाच्या जोडीचा १८-२१, २१-१७, २१-१६ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment