Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
ग्राम सडक योजनेच्या
तिसऱ्या टप्प्यातल्या कामासह राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची
मंजुरी
·
लाडकी बहीण योजनेतून
वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार नाही- मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा; पुरुष लाभार्थींकडून मात्र पैसे परत घेतले जाणार
·
प्रधानमंत्री सूर्यघर
मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या पाच राज्यांमध्ये समावेश
·
छत्रपती संभाजीनगरच्या
नवीन पाणीपुरवठा योजनेची कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश
आणि
·
नैऋत्य मोसमी पाऊस
उद्यापर्यंत केरलम् मध्ये दाखल होण्याची शक्यता
****
ग्राम सडक योजना
टप्पा-३ मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ५० कोटी
अमेरिकी डॉलरच्या कर्जाला, तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला
राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट
बँक, या दोन्ही बँकांकडून राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी
आठ हजार ७०० कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
राज्य रस्ते सुधारणा
प्रकल्प राबवण्यासही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय रस्ता काँग्रेस- IRC च्या मानकांनुसार राज्यातल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी
तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
परशुराम आर्थिक
विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक
विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी, विविध पदांची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
****
मुख्यमंत्री लाडकी
बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या योजनेसाठीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी
पाच लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच
दहा लाख जणींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं, त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या, असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. ज्यांनी केवायसी केलं अशा एक कोटी ७० लाख महिला योजनेसाठी पात्र ठरल्या,
ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या, त्यांना आता
पैसे दिले जाणार नाहीत, असं ते म्हणाले. १४ हजार पुरुषांनी या
योजनेचा लाभ घेण्याचा प्रकार उघड झाला, या पुरुषांकडून मात्र,
त्यांनी मिळवलेले पैसे परत घेतले जातील, असंही
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकरी कर्जमाफीविषयी
निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा होती, मात्र निवडणूक आचारसंहिता
लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही, असंही
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान
मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर
नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं
पत्र जारी केलं आहे.
****
कांद्याला तीन हजार
रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीने काल
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे - नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन
केलं. कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली.
नांदेड जिल्ह्याच्या
हदगाव इथं तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षाने काल गाढव मोर्चा नेला. पक्षाचे कार्यकर्ते
मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले.
****
मुंबईत आझाद मैदानावर
राज्यभरातले अंगणवाडी, आशा, राष्ट्रीय
आरोग्य अभियान आणि असंघटित क्षेत्रातल्या हजारो कामगारांचं आंदोलन काल दुसऱ्या दिवशीही
सुरू राहिलं. या पार्श्वभूमीवर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स – सीटू च्या शिष्टमंडळाने
राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं.
सर्व क्षेत्रांतल्या कामगारांचं नियमितीकरण आणि किमान ३० हजार रुपये मासिक वेतनाचा
समावेश, तसंच भविष्यनिर्वाह निधी, कर्मचारी
राज्य विमा योजना आणि पेन्शन योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी
या कामगारांनी केली आहे.
****
दिल्लीतल्या एका
न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पाच आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत १५
जूनपर्यंत वाढवली आहे. मांगिलाल खाटिक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव
आणि धनंजय लोखंडे यांचा यात समावेश आहे. मनिषा हवालदार, डॉक्टर
मनोज शिरुरे आणि तेजस शाह या आरोपींना न्यायालयानं चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत
पाठवलं आहे.
****
मुंबई-अहमदाबाद
बुलेट ट्रेन प्रकल्पात पालघर जिल्ह्यात आंबेसरी गावाजवळचा एमटी-०७ या पर्वतीय बोगद्याचं
काम यशस्वीपणे पूर्ण झालं आहे. या कामात अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि भू-तांत्रिक
उपकरणांचा वापर करण्यात आला असून, सुरक्षिततेच्या
सर्व मानकांचं काटेकोर पालन करण्यात आलं आहे.
****
प्रधानमंत्री सूर्यघर
मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या पाच राज्यांमध्ये समावेश
झाला आहे. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबद्दल महाराष्ट्राचं
अभिनंदन केलं. २९ मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे १५ हजार
घरांवर प्रकल्प बसवण्यात आले असून, त्यापैकी चार हजार ७०० प्रकल्प महाराष्ट्रातले आहेत. राज्याने मे महिन्यात
या योजनेसाठी सादर अर्जांमध्ये देशात प्रथम क्रमांक, प्रकल्प
बसवलेल्या एकूण घरांमध्ये दुसरा क्रमांक, प्रकल्पांच्या तपासणीमध्ये
पहिला क्रमांक आणि पुरवठादारांच्या नोंदणीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे.
****
नाशिकच्या कॉम्बॅट
आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा पदवीप्रदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला.
लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं १८ आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या २५ प्रशिक्षणार्थी
वैमानिकांसह १० प्रशिक्षकांची तुकडी यावेळी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये दोन महिला
वैमानिकांचाही समावेश आहे.
****
एसटी बस उशिरा सुटल्यास
संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सगळ्या बस नियोजित वेळेपूर्वी फलाटावर असाव्यात, त्यांचं तिकीट वितरण वेळेत व्हावं, विशेषत:
पहाटे ५ ते सकाळी १० या कालावधीतल्या सर्व बस फेऱ्या नियोजित वेळेवर होतील,
याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश सरनाईक
यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत दिले.
****
केंद्र सरकारला
बारा वर्ष पूर्ण झाली आहेत. या बारा वर्षामध्ये सरकारने एक देश एक कर प्रणाली म्हणजेच
जीएसटी सुधारणा करून अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी दिल्याचं माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री
डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
बाईट- डॉ. भागवत
कराड
****
छत्रपती संभाजीनगर
शहराला नियोजित वेळेत पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलद गतीनं पूर्ण
करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. येत्या १२ जूनपर्यंत
वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगानं काल नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची
पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
****
अन्न आणि औषध प्रशासनाने
काल छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल
करणाऱ्या नावाने हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या
एका खासगी गोदामातून प्रत्येकी चारशे मिलीलीटरच्या ३६ हजार ४६८ बाटल्या जप्त करण्यात
आल्या. बाजारभावानुसार या पेयाची किंमत सुमारे २० लाख ७८ हजार रुपये आहे.
****
छत्रपती संभाजीनगर
इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कालपासून सुरू झाली.
ही प्रक्रिया २८ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात
पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर आणि संदलापूर इथं,
"युवा जल दिंडी २०२६" अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये,
गावोगावी जाऊन भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत
संरक्षणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवला जाणार आहे.
****
उन्हाच्या वाढलेल्या
तीव्रतेमुळे धाराशिव जिल्ह्यात अकरा गावात १६ टँकर्सनं तर ६५ गावांमध्ये ९९ विहिरी
अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. यात धाराशिव तालुक्यातल्या सात गावांसाठी
सर्वाधिक अकरा टँकर्समधून तर भूम तालुक्यातल्या चार गावांसाठी पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा
केला जात आहे.
****
नैऋत्य मोसमी पाऊस
उद्यापर्यंत केरलम् मध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. लक्षद्वीप, केरलम्, तमिळनाडू आणि बंगालच्या उपसागर
परिसरात उद्यापासून मोसमी पाऊस पुढे वाटचाल करेल, असा अंदाज हवामान
विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४३
पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी आणि बीड इथं सरासरी
४०, तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि धाराशिव
इथं सरासरी ३९ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना
आज वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment