Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 04
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडास्पर्धेला आभासी
पद्धतीनं संबोधित करणार आहेत. जगभरात योगाभ्यासाला प्रचंड लोकप्रियता मिळत असून, या
व्यासपीठाने जगभरातल्या योगप्रेमींना एकत्र आणल्याचं पंतप्रधानांनी यासंदर्भात समाजमाध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे. योगासनासाठीच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला हा एक महत्त्वपूर्ण
टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं. या स्पर्धेत आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि
ओशियानीया मधल्या सुमारे ७० ते ७५ देशांतले ५०० हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.
****
दरम्यान,
पंतप्रधान मोदी उद्या गुजरात आणि दमनच्या दौर्यावर जाणार आहेत. गुजरातमध्ये ते रस्ते,
वीज आणि उद्योग क्षेत्राशी निगडीत १८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन
करतील. त्यानंतर सायंकाळी दमनमध्ये आरोग्य सेवा, नागरी उड्डाण, पर्यटन, पायाभूत संरचना,
संपर्क आणि लोक कल्याणाच्या जवळपास दोन हजार ९७० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची
पायाभरणी करणार आहेत. यामध्ये नमो विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत आणि नमो रुग्णालय
यांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष
डेलसी रॉड्रिग्ज यांचं स्वागत केलं. दोन्ही नेत्यांमध्ये देशांतर्गत संबंध, तसंच विविध
मुद्यावर चर्चा सुरु आहे.
परराष्ट्र
मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही राष्ट्राध्यक्ष डेलसी रॉड्रिग्ज यांची भेट घेतली. भारत-व्हेनेझुएला
संबंध दृढ करण्यासाठी त्यांच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचं जयशंकर यांनी कौतुक केलं. राष्ट्राध्यक्ष
डेलसी रॉड्रिग्ज यांचं काल पाच दिवसांच्या भारत दौर्यावर आगमन झालं.
****
मिझोराम-म्यानमार
सीमेवरील चम्फाई या सीमावर्ती शहरात बर्मी सुपारीच्या अवैध तस्करी प्रकरणी अंमलबजावणी
संचालनालय – ईडी आज नऊ ठिकाणी मोठी शोधमोहीम राबवत आहे. प्रामुख्याने तस्करी जाळ्याच्या
प्रमुख स्थानिक सूत्रधारांच्या निवासस्थानांवर आणि व्यावसायिक जागांवर हे छापे टाकले
जात असल्याचं ईडीनं सांगितलं. टियू नदीमार्गे अवैधपणे म्यानमारमधून भारतात ही सुपारी
आणून ती स्थानिक गोदामांमध्ये साठवली जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रतिबंधित
पानमसाला, गुटखा, भेसळ अन्नपदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभर २५ मे
ते ३१ मे या कालावधीत धडक मोहीम राबवली. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम
मुंढे यांच्या निर्देशानुसार केलेल्या या सात दिवसांच्या कारवाईत एकूण एक कोटी ५८ लाख
२८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर १०२ आरोपींना अटक करण्यात आली. एकूण
२०३ आस्थापनांवर कारवाई करत ८६ आस्थापना सील करण्यात आल्या, तर ३४ लाख पाच हजार ४८
रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात छत्रपती संभाजीनगर विभागात आठ ठिकाणी
कारवाया करत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘Safe Food, Safe Drug, Safe
Maharashtra’ या संकल्पनेअंतर्गत राज्यभर भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या
अन्न व्यवसायिकांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका
असल्यास नागरिकांनी अन्न आणि औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे
माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते.
****
जळगाव शहरातल्या
मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने १३
कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी
सोपवलेली कामं निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं,
त्यामुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचं यासंदर्भातल्या
फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
****
जागतिक
पर्यावरण दिनानिमित्त उद्या पाच जून रोजी लातूर जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपण मोहिमेसह
विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
यांनी दिली. या मोहिमेत शासकीय यंत्रणांसोबत स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या
संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन त्यांनी केले आहे. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन,
अवैध वृक्षतोड रोखणं आणि ‘एकल वापराच्या प्लास्टिक विरोधी मोहिम अधिक प्रभावीपणे राबवण्यावर
भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
शिवराज्याभिषेक
सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर लाखो शिवभक्त येतात त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी
जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत काही बदल केले आहेत. उद्या पाच तारखेला सायंकाळी
चार वाजेपासून सहा जून रात्री दहा वाजेपर्यंत मुंबई - गोवा महामार्गावर जड आणि अवजड
वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. किल्ल्यावर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून किल्ल्यावर
गँस, स्टोव्ह, चूल वापरासही बंदी घालण्यात आली आहे.
****
इंडोनेशिया
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या आरुष शेट्टीचं आव्हान संपुष्टात आलं.
आज झालेल्या उप–उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या
ली सी वाय याने आरुषचा २१–१६, १३–२१, १४–२१ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment