Friday, 5 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 05 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत झालेल्या बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर सव्वा पाच टक्क्यांवर कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज सहा पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांवरुन घटवून, सहा पूर्णांक सहा दशांश टक्के केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता मल्होत्रा यांनी वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशाकांवर आधारित चलनवाढीचा दर यंदाच्या आर्थिक वर्षात पाच पूर्णांक एक दशांश टक्के राहील, असंही त्यांनी सांगितलं. इंधनाच्या वाढलेल्या किंमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल, असं मल्होत्रा म्हणाले.

अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली आहे. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा बँकेनं दिली आहे.

****

जागतिक पर्यावरण दिन आज साजरा केला जात आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच जागतिक तापमान यांसारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. "हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा" अशी यंदाची या दिनाची संकल्पना आहे.

पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. निसर्गापासून प्रेरणा घेऊन हवामान बदलाशी लढा देण्यासाठी आणि भविष्यासाठी काम करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यांनी सर्व नागरिकांना एकत्र येऊन हरित, स्वच्छ आणि सक्षम भारत घडवण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून पुढील पिढ्यांसाठी निरोगी आणि सुदृढ पर्यावरण निर्माण होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत, निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून, भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं.

****

पर्यावरण दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत.

मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉनहा उपक्रम राबवण्यात आला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक यात सहभागी झाले होते.

ठाणे जिल्ह्यात डोंबिवली क्रीडा संकुल इथं भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.

कोल्हापूर इथं भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, जिल्हा प्रशासन यांच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली.

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातल्या माहुली इथले निखिल चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी हजारो सीड बॉल्स तयार करून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.

सांगली इथं महानगरपालिका तसंच विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वीच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेअंतर्गत, विद्यार्थ्यांकडून एकूण ७० हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये गुणांच्या पडताळणीसाठी सात हजार ३१४ अर्ज, तर पुनर्मूल्यांकनासाठी ६३ हजारांहून अधिक अर्जांचा समावेश आहे. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींची पडताळणी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने मंगळवारी ऑनलाइन पोर्टल सुरू केलं होतं. या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्रालयाने ओएसएम प्रणालीची अंमलबजावणी आणि खरेदी प्रक्रिया, तसंच संबंधित कंत्राटदार कंपन्यांची कामगिरी, कराराच्या अटी आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व तयारीला लागले आहेत, मात्र, यंदा अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं स्वरूप अनिश्चित राहण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment