Friday, 5 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      योगाभ्यास हा भारताने मानवतेला दिलेली अनमोल भेट- पंतप्रधानाचं प्रतिपादन, अहमदाबाद इथं जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात

·      विधानपरिषद निवडणुकीत बहुतांश जागांवर शिष्टाई यशस्वी, औरंगाबाद - जालना मतदार संघात सुहास शिरसाट आणि गणेश लोखंडे यांच्यात लढत

·      पेट्रोलऐवजी इथेनॉलचा वापर वाढल्यास, वायु प्रदुषणाला प्रतिबंध-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास

आणि

·      नैऋत्य मोसमी पावसाचं केरलम् मध्ये आगमन, राज्यात चारही विभागात पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता

****

योगाभ्यास हा भारताने मानवतेला दिलेली अनमोल भेट असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल अहमदाबाद इथं जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते. योगाभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा एकजूट होत असल्याचं, त्यांनी नमूद केल. या स्पर्धेमुळे योगासनाला जागतिक पातळीवर ओळख मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला, ते म्हणाले…

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

येत्या आठ जून पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ७५ देशातले ५०० पेक्षा जास्त योगपटू सहभागी झाले आहेत.

****

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. यानंतर आता बहुतांश जागांचं चित्र स्पष्ट झालं आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांची मनधरणी करण्यात राजकीय पक्षांना यश आलं, काही ठिकाणी मात्र शिष्टाईचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हं दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या सहा उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, चंद्रपूर आणि अहिल्यानगर इथले महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या १७ पैकी ११ जागांसाठी लढत होणार आहे.

****

औरंगाबाद - जालना मतदार संघाच्या निवडणुकीतून आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज काल मागे घेतला. त्यामुळे आता महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत.

****

नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह पाच उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.

****

परभणी–हिंगोली विधान परिषद मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. महायुती पक्षातील तीनही बंडखोर उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर, विजय जामकर आणि भाजपचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने, आता महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

****

दरम्यान, अर्ज मागे घेऊन पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, बाळ माने, कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

****

पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर वाढल्यास, वायु प्रदुषणाला आळा बसेल, असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. काल नवी दिल्लीत फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या चारचाकी गाडीचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. देशात जुन्या चारचाकी मोडीत काढण्यासाठी देशभरात सुमारे पावणे दोनशे स्क्रपिंग युनीट सुरू असल्याची माहिती गडकरी यांनी दिली, ते म्हणाले…

बाईट- केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी

 

पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यावेळी उपस्थित होते. देशात इथेनॉल पंपांची संख्या वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पायाभूत सुविधांचे निर्मिती प्रकल्प गतीनं पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विलंबाने काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलेही नवीन काम देऊ नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

****

जागतिक पर्यावरण दिवस आज साजरा होत आहे. पृथ्वीवर जीवसृष्टीचं रक्षण करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाअंतर्गत, पाच जून १९७३ पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त ठिकठिकाणी पर्यावरण रक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

पर्यावरण दिनानिमित्त बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी येत्या सोमवारी सहा जूनपासून सुरू होत आहे. राज्यभरात साडे नऊ हजारावर कनिष्ठ महाविद्यालयात ही प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेशासाठी साडे बारा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी पहिल्या फेरीत साडे चार लाखावर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती, शिक्षण संचालनालयाच्या पत्रकातून देण्यात आली.

****

मोबाईल ॲपद्वारे खत नोंदणी आणि वितरण करण्यासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’, हा पथदर्शी प्रकल्प आजपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यान्वित होत आहे. याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

****

यंदा खरीप हंगामात बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असं आवाहन बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केलं आहे. बीजप्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

धाराशिव तालुक्यातल्या अंबेजवळगा इथं ग्रामस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी कार्यशाळा काल पार पडली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढवावं असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यावेळी केलं. या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना बीज उगवण प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. पेरणीपूर्वी बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रिया करण्याची सामूहिक शपथ यावेळी घेण्यात आली.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी इथल्या एका आस्थापनेवर कारवाई करत जवळपास १३ लाख रुपयांचा भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त करण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार तीर्थपुरी इथल्या मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. यावेळी तुपामध्ये रिफाइंड सोयाबीन तेल आणि इसेन्स मिसळलं जात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान विविध ब्रँडच्या तुपाचे, खुल्या साठ्यातील तुपाचे, रिफाइंड सोयाबीन तेलाचे आणि इसेन्सचे असे एकूण आठ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत कंपनीला सील ठोकण्यात आलं आहे.

****

दरम्यान, घनसावंगी तालुक्यातल्या भुतेगाव शिवारातल्या दुधना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर पोलिसांनी काल मोठी कारवाई केली. यावेळी आठ हायवा टिपर, तीन जेसीबी मशीन आणि १२ ब्रास वाळूसह सुमारे तीन कोटी ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यातही जवळ पास साडे तीन लाख रुपये किमतीचे खाद्य तेल आणि निकृष्ट साहित्य जप्त करण्यात आलं आहे. शहरातील गंजगोलाई परिसरातील दुकानं, उदगीर मधील ऑईल मिल तसंच हाकनाकवाडी इथल्या तेल कारखान्यावर धाड टाकून प्रशासनानं ही कारवाई केली.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत परवा झालेल्या अग्नीकांडाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी काल एक बैठक घेतली. शहरातले सर्व हॉटेल्स, खाजगी रुग्णालयं, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका, जिम, खासगी शाळा, मॉल्स आणि व्यावसायिक आस्थापनांची सखोल तपासणी करण्याचे आदेश मकरिये यांनी दिले.

****

नैऋत्य मोसमी पावसाचं काल केरलम् मध्ये आगमन झालं. यंदा मोसमी पावसाच्या आगमनाला नेहमीपेक्षा तीन दिवस उशीर झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांतल्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment