Wednesday, 10 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 10 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जून २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक ऐतिहासिक टप्पा गाठत, भारताचे सलग सर्वाधिक काळ कार्यरत असलेले निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मान मिळवला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे. पंडित नेहरूंनी १३ मे १९५२ रोजी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती आणि २७ मे १९६४ पर्यंत ते या पदावर होते. निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचा कार्यकाळ चार हजार ३९८ दिवसांचा होता. २६ मे २०१४ पासून ते आज १० जून २०२६ पर्यंत, पंतप्रधान मोदींचा सलग कार्यकाळ आता चार हजार ३९९ दिवस झाला आहे.

गेल्या चार हजार ३९९ दिवसांत भारताने विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल अनुभवले आहेत. आर्थिक विकास आणि डिजिटल परिवर्तनापासून ते पायाभूत सुविधांचा विस्तार, सामाजिक सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर अधिक मजबूत स्थान निर्माण करण्यापर्यंतचा हा प्रवास विकास आणि नागरिक कल्याणावरील सातत्यपूर्ण लक्षामुळे साकार झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचं एक प्रमुख 'ग्रोथ इंजिन' म्हणून भारताचा उदय होणं, हे या काळाचं एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरलं आहे. विविध सुधारणा, आर्थिक समावेशन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्रातली वाढ आणि उद्योजकतेला मिळालेला पाठिंबा यामुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून, जागतिक मंचावर भारताचं स्थान अधिक बळकट झालं आहे.

****

भारताचे सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. हा केवळ कार्यकाळाचा टप्पा नसून, भारताच्या परिवर्तनशील विकासयात्रेचं प्रतीक आहे. सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून २५ कोटींहून अधिक नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्याचं ऐतिहासिक कार्य, तसंच भारताच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव, विस्मृतीत गेलेल्या नायकांचा सन्मान आणि ‘वसुधैव कुटुंबकम्चा संदेश जगभर पोहोचवण्याचं योगदान उल्लेखनीय असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विक्रम आणि रालोआ सरकारची १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे.

****

देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीत त्यांना आंतरराज्यीय नदीजोडणी उपक्रमांसह नदीजोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामि गंगे सह इतर प्रमुख कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली.

****

गेल्या १० वर्षांत देशाच्या एकूण निर्यातीत लक्षणीय वाढ झाली असून, ती ४६६ अब्ज डॉलर्सवरून तब्बल ८६६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव साकेत कुमार यांनी काल ही माहिती दिली. या कालावधीत निर्यातीने पाच पूर्णांक सात टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवली असून, यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा नऊ टक्के इतका आहे. गेल्या काही काळात भारताने विविध देशांशी केलेल्या मुक्त व्यापार करारांमुळे ही मोठी झेप घेणं शक्य झालं असून, भारतीय निर्यातदारांसाठी अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठा खुल्या झाल्या असल्याचं साकेत कुमार यांनी सांगितलं.

****

सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडीओ खोटा असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून, बनावट आणि दिशाभूल करणारा आहे. अशा व्हिडीओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीने केलं आहे.

****

विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्याने या सर्व उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिराने म्हणजे २२ जून रोजी सुरू होतील, असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या १५ जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात २२ ते ३० जूनपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भारावल्या जातील, आणि एक जुलैनंतर नियमित वेळेत भरतील, असं या आदेशात म्हटलं आहे.

****

नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या १२७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ काल पार पडला. या समारंभात एकूण पाचशे त्र्याऐंशी प्रशिक्षणार्थीं प्रशिक्षण पूर्ण करून पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात सामील झाले. यामध्ये चारशे वीस पुरुष आणि एकशे त्रेसष्ठ महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.

****

गुजरात मधल्या अहमदाबाद इथं पार पडलेल्या पहिल्या 'जागतिक योगासन स्पर्धेत' भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय संघाने या स्पर्धेत १०२ सुवर्ण, नऊ रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण ११४ पदलं जिंकून पहिला क्रमांक पटकावला.

****

No comments:

Post a Comment