Thursday, 11 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 11 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या ११ व्या नियामक परिषदेची बैठक सुरू आहे. या बैठकीत देशभरात उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासह, रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि परस्पर भागीदारी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या प्रभावी अंमलबजावणीची रूपरेषा तयार करण्यावरही बैठकीत चर्चा होत आहे. ‘विकसित भारत २०४७ साठी सर्वसमावेशक मानवी विकासही या वर्षीच्या या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल उपस्थित आहेत.

****

सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकांनुसार असलेल्या २२ टक्के, २५ टक्के, २७ टक्के आणि ३०टक्के इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थमंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

शाश्वत विकासासाठी समाजातला प्रत्येक घटक आरोग्य संपन्न होणं गरजेचे असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री चैत्राम पवार यांनी केलं. नाशिकमध्ये काल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु संजीव सोनवणे, पद्मश्री पोपटराव पवार यावेळी उपस्थित होते. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, स्वच्छता, पोषण, सुरक्षित पिण्याचं पाणी, पर्यावरण संरक्षण, मानसिक आरोग्य आणि जनजागृती या क्षेत्रांमध्ये मोठे काम करण्याची गरज, पेापटराव पवार यांनी यावेळी व्यक्त केली. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या ३४ विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

****

नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सहज उपलब्ध करून देण्यासाठी परभणीच्या तहसील कार्यालयाने महसूल विभागातले १९६१ पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. या उपक्रमांतर्गत सातबारा उतारे, फेरफार नोंदी, शेतपुस्तके, पाहणी पत्रके तसंच इतर महत्त्वपूर्ण महसुली दस्तावेजांचं स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आलं आहे.

****

अकोला महानगरपालिकेने २०२६ च्या जनगणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातल्या महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपाने नियोजित वेळेआधी काम पूर्ण करत हा मान मिळवला. १ मे ते १५ मे या कालावधीत स्वगणना मोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर १६ मे पासून प्रगणकांनी घरोघरी जाऊन माहिती संकलनाचं काम केलं जात आहे.

****

ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थांची तस्करी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. खारेगाव टोलनाक्याजवळ केलेल्या या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली. यापैकी एक जण गुजरातचा तर दोघं काश्मीरचे रहिवासी आहेत. या कारवाईत पथकानेतीन किलो २० ग्रॅम चरस आणि १२ हजार ९८४ ट्रामाडॉल कॅप्सूलसह एकूण तीन कोटी तीन लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

****

महाराष्ट्रात प्रतिबंधीत असणाऱ्या कापसाच्या एचटीबीटी वाणाला परवानगी द्यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं नंदुरबार-गुजरात सीमाभागात आज आंदोलन केलं. मुळातच हे वाण इतर राज्यात वापरलं जात असतांनाच महाराष्ट्रात या वाणावर असणारी बंदी ही शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. या एचटीबीटी वाणामुळे कापसाचं उत्पादन वाढत असून, शेतकऱ्यांना खर्च कमी येत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

****

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत तीने भारताच्याच इशाराणी बरुआचा २२-२०, २१-१२ अशा सरळ गेममध्ये पराभव केला.

****

फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. पहिला सामना यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात तब्बल ४८ संघ सहभागी होत असून, ही स्पर्धा फिफा विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे. संपूर्ण स्पर्धेत एकूण १०४ सामने खेळवले जाणार आहेत. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांना यजमान म्हणून थेट प्रवेश मिळाला आहे, तर उर्वरित ४५ संघांनी दोन वर्षांच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १९ जुलै रोजी खेळवला जाणार आहे.

****

No comments:

Post a Comment