Friday, 12 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताची प्रगतीपथावर वाटचाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नीती आयोगाच्या बैठकीत प्रतिपादन

·      एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्के; घरभाडे भत्त्यातही वाढीची घोषणा

·      कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कौलं निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी ७०० ब्रासपर्यंत माती आणि वाळू मोफत देण्याचा निर्णय

·      राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड; विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघ निवडणुकीतून गोकुळ गिते यांची माघार

आणि

·      मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट

****

जागतिक पातळीवर अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातही, भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची अकरावी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं आज वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, शेतकरी कल्याण हे केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही, शेतकरी हे देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

विकसित भारत घडवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख बाबींवर महाराष्ट्र शासन विशेष भर देत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्‍या बैठकीत सांगितलं. राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबतच समतोल आणि सर्वसमावेशक विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रात व्यापक प्रयत्न करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. 

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. काल मुंबईत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत घेतलेल्या एका बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. 

दरम्यान, प्रवाशांकडून अतिरिक्त रकमेची सक्ती करणाऱ्या आणि ती न मिळाल्यास प्रवास रद्द करणं अथवा मानसिक त्रास देणाऱ्या ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे निर्देशही सरनाईक यांनी दिले. संबंधित कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाईचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने विटा, कौलं निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी ७०० ब्रासपर्यंत माती आणि वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. राज्य सरकारने आता कुंभार समाजासाठी विशेष धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाअंतर्गत राज्यातल्या कुंभार समाजातल्या कुटुंबांची नोंदणी करण्यात येणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.

****

विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी ही घोषणा केली. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम ५३-२ नुसार जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. 

****

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच्या चर्चेनंतर गिते यांनी ही घोषणा केली. दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने गिते हे माघार घेत असल्याचं महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली सामाजिक माध्यमं आणि इतर माध्यमातून काही बोगस जाहिराती निघाल्या असून, अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर, अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. अर्जासाठी शुल्क भरण्याच्या सूचना, वैयक्तिक बँक खात्यावर पैसे जमा करण्याचं आवाहन किंवा संशयास्पद लिंकला बळी पडू नये, असं भरणे यांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिन काल मुंबईत पार पडला. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. आपली एकजूट, आपली एकनिष्ठा आणि आपले कष्ट याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नव्या जोमाने आत्मविश्वासाने आणि नव्या निर्धाराने कामाला लागुया, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पक्षाचे माजी अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांना जो विकसित महाराष्ट्र अभिप्रेत होता, तसाच महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहिल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

****

नागरी पूर्व सेवा परीक्षा प्रशिक्षण २०२६ साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. ही परीक्षा दोन ऑगस्ट २०२६ रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ४५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. आतापर्यंत समीर अब्दुल सत्तार, यांच्यासह चार जणांनी अपील दाखल केलं आहे. या निवडणूक प्रक्रियेत २३ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, चार जुलैला मतदान आणि पाच जुलैला मतमोजणी होणार आहे.

****

नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरात २० जूननंतर आंदोलन केलं जाणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती लातूर इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी दिली.

****

जालना महानगरपालिकेच्या विशेष संयुक्त भरारी पथकानं काल शहरात प्रतिबंधित प्लास्टिक बॅगचं उत्पादन आणि साठा करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे चार क्विंटलहून अधिक प्रतिबंधित कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या असून, दोन जणांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा, विक्री किंवा उत्पादन आढळल्यास कारवाईचा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

****

बीड जिल्ह्यात पावसाळ्यासाठी प्रशासनाने विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं असून, संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचं काटेकोर नियोजन करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. शालेय स्तरावर एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

****

महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहममध्ये एजबॅस्टन इथं होईल. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच १२ संघ सहभागी होत असून, सात मैदानांवर एकूण ३३ सामने खेळवले जाणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल.

****

फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेला काल मेक्सिको मध्ये शानदार सोहळ्याने प्रारंभ झाला. यंदाच्या विश्वचषकात तब्बल ४८ संघ सहभागी होत असून, ही स्पर्धा फिफा विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे. संपूर्ण स्पर्धेत एकूण १०४ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या सामन्यात मक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा दोन – शून्य असा पराभव केला.

****

नाशिक जिल्ह्यात आदिवासी मुलींचं अपहरण करून त्यांचा विवाह लावून देत विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी काल अटक केली. या कारवाईत दहा संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यात पाच जण नाशिक जिल्ह्यातले, तर पाच जण अहिल्यानगर जिल्ह्यातले आहेत.

****

हवामान

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विभागात पुढचे काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर, अहिल्यानगर तसंच नाशिकसह कोकण, विदर्भ तसंच पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

****

No comments:

Post a Comment