Monday, 15 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      फ्रान्समध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारत इनोव्हेट्स या गुंतवणूक उपक्रमाचं उदघाटन, पंतप्रधान आज जी-7 परिषदेत सहभागी होणार

·      ३१ ऑगस्टपर्यंत नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्या‍स सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सरकारचे निर्देश

·      शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान पुण्यात आयोजन

·      उन्हाळी सुट्टीनंतर शाळा आजपासून सुरु

आणि

·      मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट 

****

भारतात आज स्टार्टअप्सची मोठी क्रांती घडत असून, देशातले तरुण तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवतेच्या प्रश्नांवर उत्तरे शोधत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी यावेळी बोलताना, भारतीय तरुणांच्या आणि अभियंत्यांच्या कौशल्याचं कौतुक केलं. तसंच, २०३० पर्यंत ३० हजार भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी फ्रान्समध्ये आमंत्रित करण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट त्यांनी जाहीर केलं.

भारताबाहेर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात भारतातल्या १२० हून अधिक स्टार्टअप कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान आजपासून फ्रान्समधल्या एवियान शहरात सुरु होत असलेल्या जी-7 परिषदेत सहभागी होत आहेत. सध्याच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे.

****

रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं, असं आवाहन, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. काल जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं जारी केलेल्या संदेशात त्यांनी, रक्तदानाबाबतच्या गैरसमजूती दूर करून त्याचं महत्त्व जनमानसात रुजवायची गरज व्यक्त केली. ‘एक थेंब माणुसकीचा’ ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना आहे.

****

राज्‍यात अपुऱ्या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसंच धरणातला उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेवून ३१ ऑगस्‍टपर्यंत नागरीकांना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा सुनिश्चित करण्‍यास सर्वोच्‍च प्राधान्‍य देण्‍याचे निर्देश, जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीर पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी विभागाच्‍या आधिकाऱ्यांना दिल्‍या. पुण्यात कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्‍या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा, अगामी मान्‍सूनची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. मराठवाडा, अहिल्‍यानगर आणि नाशिक विभागातल्या जलसाठ्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. मराठवाडा विभागात २८ टक्‍के तर नाशिक विभागात सध्‍या २६ टक्‍के उपयुक्‍त जलसाठा उपलब्‍ध असून, दोन्‍हीही विभागातल्या प्रकल्‍पांमध्‍ये अपेक्षित प्रमाणात पावसाची नोंद झालेली नाही. विशेषत: मराठवाडा आणि अहिल्‍यानगर विभागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या गरजांना प्राधान्‍य देवून उपलब्‍ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश विखे पाटील यांनी दिले.

****

राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरता राज्य शासनाने एकूण १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मदत वाटप प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने होणार असून, मदतीचं वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

****

राष्ट्रीय परिक्षा संस्था – एनटीएने नीट युजी पुनर्परिक्षेसाठी प्रवेश पत्र जारी केले आहेत. संस्थेच्या neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरुन हे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील. नीट युजी पुनर्परिक्षा येत्या २१ जून रोजी दुपारी दोन ते सव्वा पाच या वेळात होणार आहे.

****

शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची काल पुण्यात बैठक झाल्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार असून, या संमेलनाची नांदी, याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या ४८ ठिकाणी ९९ साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम १५ ऑगस्ट ते १५ जानेवारी या दरम्यान होणार असल्याचं सोमण यांनी सांगितलं.

****

उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातल्या शाळा आजपासून सुरु होत आहेत. केवळ विदर्भात उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा येत्या २२ तारखेपासून सुरु होणार आहेत.  नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यासाठी शाळांनी विशेष तयारी केली आहे. शाळांची स्वच्छता, रंगरंगोटी, वर्गखोल्यांची सजावट तसंच परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदव्यूत्तर विभाग आणि संलग्नित महाविद्यालयं देखील उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून सुरु होत आहेत. बारावी आणि पदवी अभ्यासक्रमांचे निकाल लागल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे.

****

२१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा होतो. या निमित्ताने विविध योगासनांची माहिती आपण दररोज घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर इथले योग शिक्षक महावीर जैन यांनी दिलेली सेतूबंधासनाची माहिती आपण आज घेऊ..

बाईट – योग शिक्षक महावीर जैन

****

सोलापूर जिल्ह्यातल्या म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला. तर सहा जणांना वाचवण्यात यश आलं. मृतांमध्ये पाच महिला आणि एका सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवाशी असून ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे, मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहिर केली आहे.

****

लातूर-औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातले बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहेत. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकांच्या शाळांमध्ये १४ ते १५ वर्षे वयोगटातल्या मुलींसाठी एचपीव्हीपी लस देण्याचे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. काल मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी ही लस प्रभावी ठरत असल्याचं सांगून त्यांनी, या लसीचं महत्व अधोरेखित केलं. पुढच्या पंधरा दिवसांत प्रत्येक शाळेतल्या पात्र विद्यार्थिनींचं नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रामार्फत एचपीव्ही लसीकरण पूर्ण होईल, यासाठी पाठपुरावा करणं, विद्यार्थिनींच्या पालकांना या लसीकरणाचं महत्त्व समजावून सांगून त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन आयुक्तांनी यावेळी केलं.

****

महिला टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने काल विजयी सुरुवात करत पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. बर्मिंगहॅम इथं झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत १७१ धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ १७व्या षटकात १०६ धावांवर सर्वबाद झाला.

****

येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments:

Post a Comment