Wednesday, 17 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 17 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -7 शिखर परिषदेत पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नाविकांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही उपस्थित होते.

जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियातील शांतता प्रयत्नांमध्ये झालेल्या प्रगतीचे स्वागत केलं आहे. या संघर्षामुळे पश्चिम आशियातील मित्र राष्ट्रांचे मोठे नुकसान झाले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी व्यापारात अडथळे निर्माण झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक भारतीय नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.”

सागरी व्यापारातील नाविकांच्या भूमिकेचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी, “जागतिक सागरी व्यापाराद्वारे सर्व देशांना जोडणाऱ्या नाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असून सागरी मार्ग सुरक्षित राहतील आणि नाविकांना कोणत्याही भीतीशिवाय आपले काम करता येईल, याची आपण खात्री केली पाहिजे, असं नमूद केलं”

“नवीन भागीदारी संबंधांची उभारणी आणि आंतरराष्ट्रीय एकात्मतेचे पुनरुज्जीवन” या विषयावरील सत्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी परस्पर विश्वास हा जागतिक व्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे असल्याचे सांगितले.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील पिंपराळा गावात आढळलेल्या पोटदुखीच्या रुग्णांची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आली असून सर्व रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवल्यामुळे साथ आटोक्यात आणण्यात यश आले. १२ जून रोजी गावात काही नागरिकांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने वैद्यकीय पथकाने गावात गावात भेट देऊन सर्वेक्षण, तपासणी आणि उपचार मोहीम तातडीने सुरू केली. नागरिकांना आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात थॅलेसेमियामुक्त रुग्णांची संख्या आता चौदावर पोहोचली असल्याची माहिती थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी दिली. या आजाराशी तब्बल बारा वर्षे झुंज देणाऱ्या बारा वर्षीय निंसबा शेख हिने नुकतीच अत्याधुनिक ईसीपी उपचार आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या मदतीने थॅलेसेमियावर मात केली आहे. तिच्यावर पंतप्रधान सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच सीएसआर फंडाच्या माध्यमातून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

****

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत आजपासून नशामुक्त भारत सप्ताहाला सुरूवात होत आहे. या उपक्रमाद्वारे युवक, महिला, शैक्षणिक संस्था आणि समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून व्यसनमुक्त भारताचा संकल्प अधिक बळकट केला जाईल. हा सप्ताह २६ जूनपर्यंत चालणार आहे.

****

येत्या २१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट-युजी २०२६’ या परीक्षेच्या अनुषंगाने लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक पार पडली. या बैठकीत परीक्षेच्या नियोजनबद्ध आणि पारदर्शक आयोजनासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. लातूर जिल्ह्यात एकूण २६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी ‘कर्तव्य दंडाधिकारी आणि ‘राज्य निरीक्षक यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी विशेष वैद्यकीय पथके नियुक्ती करण्यात येणार आहेत.

****

बीड जिल्ह्यात ७ जून ते १६ जून दरम्यान एकूण ५३ पूर्णांक ४  मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र, जिल्ह्यातल्या १४३ प्रकल्पांपैकी १२ प्रकल्प कोरडे आहेत. सध्या जिल्ह्यात खंडित आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करावी, तसंच हवामानाचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

****

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज लखनौ इथं होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे.

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना यूके मधील लीड्स इथं खेळला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल.

****

एफ आय एच हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघाने सहा गुण मिळवून उपान्त्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमधे ऑकलंड इथं झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा दोन – एक असा पराभव केला.

****

No comments:

Post a Comment