Thursday, 18 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 18 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु आहे. सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशीव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना अशा ११ जागांसाठी मतदान सुरळीत होत आहे. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील एकूण १४ केंद्रांवर मतदान सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील एकूण १३ मतदान केंद्रांवर आज सकाळी आठ ते दहा या वेळेत एकूण ६३७ मतदारांपैकी १११ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात ५९ महिला आणि ५२ पुरुषांचा समावेश आहे. यानुसार, सुरुवातीच्या दोन तासांत एकूण १७.४३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

****

नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूकीत आज दुपारी १२ वाजेपर्यंत ६१९ पैकी ६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

****

झारखंडमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान सुरू आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा यांच्यात मुख्य लढत आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० च्या कार्यप्रणालीचा आढावा घेतला. सायबर गुन्हे, विशेषतः सायबर आर्थिक फसवणूक यापासून नागरिकांना तातडीनं दिलासा मिळावा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध नागरिक-केंद्रित यंत्रणांचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. यंत्रणा अधिक प्रभावी आणि जलद प्रतिसादक्षम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात दहा हजार टन क्षमतेच्या ॲल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसची पायाभरणी करतील. ही प्रस्तावित एक्सट्रूजन प्रेस संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक मोठी राष्ट्रीय संपत्ती ठरेल. ही प्रेस संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठं, उच्च-शक्तीचं आणि अचूक ॲल्युमिनियम मिश्रधातूचं एक्सट्रूजन तयार करण्याची देशाची क्षमता मजबूत करेल. हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ॲल्युमिनियम एक्सट्रूडेड घटकांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठिंबा देण्यास मदत करेल.

****

देशात एकूण ७ बुलेट ट्रेन मार्गिका उभारण्यात येणार आहे, यात मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद मार्गांचाही समावेश आहे. या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ केवळ ४८ मिनिटांवर येईल तसंच, पुणे–हैदराबाद हे सुमारे पाचशे किलोमीटरचा प्रवासही सुमारे २ तास ८ मिनिटांत पूर्ण होऊ शकेल.

****

पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्प आता नव्या मार्गाने राबवला जाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या थेट मार्ग शक्य नसल्याने हा प्रकल्प पुणे–अहिल्यानगर–शिर्डी–नाशिक अशा टप्प्यांमध्ये विकसित केला जाणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यात बोलताना सांगितलं. यासाठी मोठ्या प्रमाणावर कामांना मंजुरी देण्यात आली असून काम सुरु झाले आहे. याचबरोबर, जेएनपीटी आणि वाढवण बंदर यांना विदर्भ आणि मराठवाड्याशी जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ७५ टक्के  भागाला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून लॉजिस्टिक्स खर्चात सुमारे ८ टक्कके पात साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीग हॉकी सामन्यात भारतीय पुरुष संघानं काल गतविजेत्या जर्मनीला ३-१ ने पराभूत करून दणदणीत विजय नोंदवला. भारतासाठी मनदीप सिंग, शिलानंद लाक्रा आणि नीलाकांत शर्मा यांनी गोल केले. या सामन्यात मनप्रीत सिंगने आपला ४१३ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून भारतासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम प्रस्थापित केला. आज होणाऱ्या पुढील सामन्यात भारताचा सामना जर्मनीशी होईल.

****

मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनमोल खरब, इशारानी बरुआ, अश्मिता चालिहा आणि तरुण मन्नेपल्ली यांनी आपले सलामीचे सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीमध्ये श्रीयांशी वलिशेट्टी आणि रक्षिता श्री रामराज यांनीही पुढील फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीमध्ये रौनक चौहान आणि तरुण मन्नेपल्ली यांनी विजय मिळवला. मिश्र दुहेरीमध्ये, ईशान भटनागर आणि श्रुती मिश्रा यांच्या जोडीनेही दणदणीत विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments:

Post a Comment