Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
भारताच्या शक्तीची ओळख त्याच्या आत्मनिर्भारतेमध्ये असल्याचं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतीय नौदलातील तीन स्वदेशी युध्द
नौकांचं लोकार्पण कोलकाता इथं आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय नौदलाला नवी शक्ती प्राप्त झाल्याचं सांगून भारतात संरक्षण संसाधन उत्पादनात
वाढ झाल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
****
आज १२वा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ सर्वत्र योग अभ्यासाद्वारे
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशभरात यानिमित्त मंत्री, लोकप्रतिनिधी, सरकारी कार्यालयं, सामाजिक-खासगी संस्था, शैक्षणिक संस्था, आस्थापनांनी सामुहिक योगसन सादरीकरणातून योगाचं महत्व अधोरेखीत
केलं. विशेष म्हणजे इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस – आई.टी.बी.पी.च्या ४७व्या बटालियनच्या
हिमवीर जवानांनी १४ हजार फूट ऊंचीवर लेह-लद्दाखच्या पैंगोंग त्सो किनाऱ्यावर योगासनं
सादर केली. तर, भारतीय नौदलाच्या पानबुडीतील योध्दांनी
योगाभ्यास करत शिस्त, आत्मबल आणि भारतीय संस्कृतीचा
अद्भुत संदेश दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्य प्रदेशातील
जबलपूर इथं योग दिनाचा कार्यक्रम झाला. कोलकाता इथल्या ऐतिहासिक लाल रस्त्यावर योगाभ्यास
मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये योगाभ्यास करण्यात आला.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं भारतीय तटरक्षक दलाच्या
अधिकाऱ्यांसोबत योगाभ्यास सत्रात सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना; शतकानुशतकं योगाभ्यास घरांमध्ये, आश्रम आणि योग संस्थांमध्ये केला जात असे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित
करण्याचं आवाहन केल्यानंतर आज जगातील दीडशेहून जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग
दिन साजरा केला जात आहे, ही अभिमानाची बाब असल्याचं राज्यपाल वर्मा म्हणाले. मुंबईत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा झाला. यावेळी ते म्हणाले -
बाईट - मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा प्रशासनातर्फे सामुहिक योगासनांचा
सराव बिबी का मकबरा आणि विभागीय क्रीडा संकूल इथं आयोजित मुख्य कार्यक्रमांमधून करण्यात
आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा प्रशासन, छत्रपती संभाजीनगर व भारतीय योग संस्थान (दिल्ली), विभाग-छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे एन आठ इथल्या वनस्पतीशास्त्र
उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. मंत्री अतुल सावे, माजी मंत्री डॉ.भागवत कराड, उद्योजक विवेक देशपांडे यावेळी प्रमुख उपस्थित होते. छत्रपती
संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेतही उत्साहात योगासनं करुन योगदिन साजरा झाला. मान्यवरांच्या
हस्ते वृक्षारोपणही यावेळी करण्यात आले. धाराशिव इथं पतंजली योग समिती, मेरा युवा भारत कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त
विद्यमाने श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात योगाभ्यास करण्यात आला. परभणी शहरातील प्रियदर्शनी
इंदिरा गांधी क्रीडा संकुलनात आज जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकं साजरा करून
उत्साहात योग दिवस करण्यात आला. लातूर इथं भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात
विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला.
****
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे.
आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा
पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते, तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी
निमंत्रित केलं आहे.
****
भारतीय अ आणि श्रीलंका अ क्रिकेट संघांदरम्यान श्रीलंकेतील
दंबोला इथं सुरू तिरंगी एकदिवीसीय क्रिकेट मालिकेतल्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीनं
केवळ २९ चेंडुंमध्ये ९४ धावा केल्या आहेत. यात आठ षटकार आणि दहा चौकारांचा समावेश होता.
भारतीय अ संघानं फलंदाजी लादण्यात आल्यानंतर ३९ षटकांत तीन बाद २८२ धावा केल्या आहेत.
वैभवनं झंझावती फलंदाजी करताना केवळ ११ चेंडुंमध्ये अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रमही
नोंदवला.
****
बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरजवळा गाव
आदर्श गाव ठरलं आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या संकल्पनेवर आधारित “आयुष
ग्राम” उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून या गावाने “आरोग्यदायी गाव” घडवण्याचे शाश्वत
मॉडेल तयार केले आहे. जागतिक योग दिनी गावातील मुलांनी सामूहिक सूर्यनमस्कार करून या
संकल्पनेचा प्रसार केला.
****
No comments:
Post a Comment