Tuesday, 23 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 23 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या प्रत्येक पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पथकाची स्थापना केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. २०२३ मध्ये सरकारने या कृती दलाची स्थापना केली होती आणि या मार्फत गेल्यावर्षी सव्वा पाचशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले होते, ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलिस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला.

****

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला नार्वेकर यांनी आक्षेपाला उत्तर दिले, मात्र विरोधकांचे उत्तराने समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला.

****

येत्या पाच वर्षात ‘महावितरण’ची स्थापित क्षमता ७८ हजार मेगावॅटच्या पलीकडे नेण्याचे नियोजन आहे. पुढच्या वर्षी ही क्षमता ४५ हजार मेगावॅटपर्यंत नेण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साडे एकोणवीस टक्के अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचे ते म्हणाले. वीज निर्मितीसाठी राज्याला खराब कोळसा पुरवण्यात आल्याची तक्रार केंद्रीय कोळसा मंत्र्याकडे केली होती, असंही त्यांनी सांगितलं.

****

एसटी कडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आगामी गणेशोत्सवात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील, असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली. खासगी बसच्या माध्यमातून मालवाहतूक करणाऱ्या पाच हजार ७२८ दोषी वाहनांवर गेल्या आर्थिक वर्षात कारवाई झाली आणि त्यात चार कोटी ६१ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केल्याचे सरकारने लेखी उत्तरात सांगितले.

****

पावसाळी अधिवेशन काळात योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील आणि हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, यासंदर्भातली घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली.

****

राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूधभेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार सहा महिने ते आजन्म तुरुंगवास आणि दहा लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली.

****

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नवीन सुरक्षा धोके आणि आव्हानांविरोधात सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्लीत ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या १६ व्या बैठकीत ते बोलत होते. परकीय धोके आता राष्ट्रीय सीमा ओलांडत असल्याचं सांगत त्यांनी नवीन तंत्रज्ञान, दहशतवादाची गुप्त रूपे आणि सायबर धोके अधिकाधिक डिजिटल होत असल्याचं म्हटलं.

****

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिक्षण संचालनालयाने केलं आहे. ऑनलाइन अर्जासाठी “नॅशनल अवॉर्ड्स टू टीचर्स डॉट एज्युकेशन डॉट जीओव्ही डॉट इन” या संकेतस्थळावर १० जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

****

आज जागतिक ऑलिम्पिक दिन. यानिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी देशातील युवकांनी ऑलिम्पिकच्या उच्च आदर्शांचा स्वीकार करावा आणि तंदुरुस्तीला आपली दैनंदिन सवय बनवावी, तसंच अधिक सामर्थ्यवान आणि निरोगी भारत घडवण्यासाठी प्रयत्न करावे. असं असं आवाहन केलं.

****

महिला बचतगटांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून समन्वयाने काम करावं, अशा सूचना लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.

मनरेगा’ अंतर्गत रोपवाटिका निर्मिती तसंच कृषि विभागाच्या पोकरा प्रकल्पातील अवजारे बँक यांसारख्या उपक्रमांमध्ये महिला बचतगटांना प्राधान्य देण्यात येत आहे. तसंच कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारख्या उपजीविकेच्या व्यवसायांसाठी बँकांच्या सहकार्याने अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

****

आषाढी वारीकरिता पंढरपूरला जाण्यासाठी शेगाव इथुन प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आज अकोला जिल्ह्यातल्या डाबकी इथं पोहचली. दिवसभर शहर परिक्रमेनंतर दुपारी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात पालखी दर्शनासाठी ठेवली जाईल. या दिंडीत सुमारे सातशे वारकरी सहभागी झाले आहेत.

****

नैऋत्य मोसमी पाऊस १४ दिवसांच्या विलंबानंतर सक्रिय झाला असून आज सकाळी मुंबईत रिमझिम पाऊस झाला. मोसमी पाऊस सध्या पुणे, धाराशिव, सोलापूर आणि अलिबागपर्यंत पोहोचला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आणि परवा राज्यातील अनेक भागांत चांगल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी दमदार पाऊस झाला.

****

No comments:

Post a Comment