Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 24
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
राज्यात सर्व शंभर टक्के फिडर्सवर
स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त शून्य पूर्णांक तेरा टक्के
लोकांनाच ग्रीड सहाय्य शुल्क लावलं असल्याची
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात
दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हे शुल्क पूर्वलक्षी प्रभावाने
न लावता गेल्या १ फेब्रुवारीपासून लावण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं.
शेजारी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दर
कमी असून २०२९ ते ३० वर्षापर्यंत हे दर ७ रुपये ४३ पैसे इतके खाली येतील असं
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात बाल विवाहाचे प्रमाण
कमी करण्यासाठी लग्न पत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय
तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती
महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातल्या बालविवाहांचं
प्रमाण १० टक्क्यांच्या आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत; ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम
राबविण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्यावर्षी राज्यात सुमारे पंधराशे आणि
चालू वर्षात आतापर्यंत चौदशेहून अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बाल विवाहाचे
प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली आहे.
****
बोगस डॉक्टरांच्या समस्येवर
तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं वैद्यकीय शिक्षण
मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत सांगितलं. सध्या राज्यात १ लाख ४० हजार ‘एमबीबीएस’
डॉक्टर कार्यरत आहेत. दरवर्षी १२ हजारापेक्षा अधिक विद्यार्थी ‘एमबीबीएस’चं शिक्षण
पूर्ण करतात. त्यामुळे बोगस डॉक्टरांची समस्या कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
****
राज्य सरकार समान नागरी संहिता
अर्थात ‘युसीसी’ लागू करण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान
नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशांच्या
अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर
सरकार पुढील कार्यवाही सुरू करेल, असं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं.
****
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या
दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी
आज दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं
ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, सांगून चूक झाल्याचं त्यांनी
मान्य केलं. इतरांप्रमाणेच मलाही मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणे
मराठीत केली आहे याकडंही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं.
****
मरावाड्यासह विदर्भ आणि उर्वरित
महाराष्ट्राच्या वैधानिक विकास मंडळांचं अजूनही पुनर्गठन झालं नाही, ते तातडीनं करावं आणि प्रादेशिक
विकासातील असमतोल दूर करण्यासाठी ठोस पावलं उचलावी, अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत लेखी लक्षवेधीद्वारे
केली. राज्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या मंडळांचा
कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आला. मात्र, सहा वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही मंडळांचे पुनर्गठन
झालेले नाही असंही खोडके यांनी या लक्षवेधीत नमूद केलं.
****
धाराशिव शहराच्या पायाभूत
आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १८
कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून आठवडी बाजारासह शहरातील तीन प्रमुख
उद्यानांचे सुशोभीकरण आणि विकासकामं करण्यात येणार आहे, नगरविकास विभागाने काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी
केला.
****
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर
तालुक्यातल्या तीन कृषि केंद्रांवर कृषि विभागानं आज कारवाई केली. या केंद्रांची निरीक्षकांनी
तपासणी केली असता काही त्रुटी आढळून आल्या, त्यामुळे केंद्राचे बियाणे, खते आणि किटकनाशकांचे नऊ परवाने निलंबित करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन संशयित खतांचे नमुने काढून तात्काळ प्रयोगशाळेत तपासणीसाठी
पाठविण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
नवी मुंबईत पावसाची संततधार
सुरू असून रात्रभर पडलेल्या पावसामुळे ‘एपीएमसी’ बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ
पाणी साचलं आहे. दरम्यान, ट्रान्सहार्बर मार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास रुळांवर पाणी येऊन रेल्वे सेवा
बंद झाली. कोपरखैरणे ते घणसोली दरम्यान रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने रेल्वे
सेवा ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाच्या प्रयत्नाने तीन तासांनी सकाळी साडेसात वाजेच्या
सुमारास ठाणे-पनवेल आणि पनवेल-ठाणे अशी दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरू झाली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
आज २१ पूर्णांक ३ मिली मीटर पावसाची नोंद झाली. गेल्या १ जूनपासून जिल्ह्यात ३७ पूर्णांक
४ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस पैठण तालुक्यातल्या अडूळ महसूल मंडळात ९८ पूर्णांक
८ मिलीमीटर इतका झाला. सिल्लोड तालुक्यातल्या भराडी महसूल मंडळात ८४ पूर्णांक ३ मिलीमीटर, कचनेरमध्ये ८० मिलीमीटर, बालानगर इथं ७८ पूर्णांक ८
तर सिल्लोड तालुक्यातल्या बोरगाव महसूल मंडळात ६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
****
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच
तालुक्यात काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला असून रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने
विश्रांती घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment