Saturday, 27 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 27 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी सेशेल्सने भारताच्या दाव्याचं समर्थन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स भेटीपूर्वी, सेशल्सचे परराष्ट्र मंत्री बॅरी फॉरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्याची जागतिक व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा होणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारताची मोठी लोकसंख्या, वाढता जागतिक प्रभाव आणि शांतता राखणे, सागरी सुरक्षा व बहुपक्षीय मुत्सद्देगिरीमधील योगदान पाहता भारत सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी पात्र असल्याचं ते म्हणाले.

****

हरियाणातील रेल्वे रुळांवरून आज देशातील पहिली 'हायड्रोजन रेल्वे' यशस्वीरित्या धावली आहे. भारतीय रेल्वेने आज देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान प्रामुख्याने रेल्वेच्या आपत्कालीन ब्रेक यंत्रणेचे अंतर आणि वेगातील संतुलन या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल दिल्लीतील राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधल्या ९६ आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “मोठी स्वप्नं पाहून शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा,” असा प्रेरक संदेश मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांना दिला. जिल्हा वार्षिक आदिवासी योजनेंतर्गत गडचिरोली, अहेरी आणि भामरागडच्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले.

****

ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबांना लग्न समारंभासाठी सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य परिवहन विभाग लवकरच घेणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत काल केली. तसंच मालवाहू वाहनांतून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करून संबंधित वाहनांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडी ट्रकला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे.

****

नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्रे, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे पुण्यात काल आयोजित विविध स्पर्धा परीक्षांत यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळं नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 'निपुण सेतू' उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य शासन उचलणार असल्याचं ते म्हणाले.

****

उद्या २८ तारखेला ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ’ लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन शून्य ते पाच वर्षे वयोगटातल्या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केलं आहे.

****

राज्यात मौसमी पाऊस दाखल झाला असला तरी काही भागात ‌अत्यल्प पाऊस झाल्याचं तर काही ठिकाणी पावसानं पाठ फिरवल्याची स्थिती आहे. खरिपाच्या पेरण्यांसाठी समाधानकारक पावसाची अजुनही आवश्यकता आहे. ‘अल निनो’चा प्रभाव लक्षात घेता कृषी प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध तालुक्यात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. दरम्यान काल धाराशीव शहर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. तसंच बुलढाणा-अकोला –रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही काल पावसानं हजेरी लावल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज २७ जूनपर्यंत सरासरी ७१ पुर्णांक १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६३ पुर्णांक १ टक्के इतकं आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सर्वाधिक ११५ पुर्णांक ९ मिलिमीटर, तर खुलताबाद तालुक्यात सर्वात कमी ५० पुर्णांक १ मिलिमीटर पाऊस झाला. संपूर्ण छत्रपती संभाजीनगर विभागाचा विचार करता, विभागात आतापर्यंत सरासरी ८१ पुर्णांक २ मिलिमीटर म्हणजेच ६७ पुर्णांक ३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

****

आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा भारोत्तोलन क्रिडा प्रकारासाठीचा संघ जाहीर झाला आहे. स्कॉटलंडच्या ग्लासगो इथं येत्या २३ जुलैपासून ही २३वी कॉमनवेल्थ स्पर्धा सुरु होत आहे. महिला संघात ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू या संघाचे नेतृत्व करत आहे. ज्ञानेश्वरी यादव, बिंद्याराणी देवी, हरजिंदर कौर, संजना, मार्टिना देवीचा तर, पुरुष संघात ऋषिकांत सिंग, एम राजा, अजय बाबू, दिलबाग सिंग, लवप्रीत सिंग यांचा समावेश आहे.

****

No comments:

Post a Comment