Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांकडून
आवाहन
· राजपत्रित पदांसाठी वर्षातून दोन किंवा अधिक परीक्षा घेण्याचा एमपीएससीचा
निर्णय
· छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काल विविध कार्यक्रमातून अभिवादन
· मोहर्रमनिमित्त ठिकठिकाणच्या मिरवणुकांमध्ये नागरिकांचा श्रद्धापूर्वक
सहभाग
आणि
· पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात आयर्लंडचा भारतावर ३४ धावांनी विजय
****
अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यातून उद्भवणाऱ्या
समस्यांविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं
आहे. ते काल नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या दहाव्या बैठकीला संबोधित करत
होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य,
आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही
त्यांनी नमूद केलं. आध्यात्मिक गुरु, युवक आणि महिलांनी या अभियानात
सहभागी होण्याचं आवाहनही शहा यांनी केलं. भारताला २०२९ पर्यंत नशामुक्त करण्याचा लढा
पुढील तीन वर्षांत निर्णायक टप्प्यावर पोहोचेल, असंही ते म्हणाले.
बाईट – केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा
****
आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध
तस्करी विरोधी दिन काल पाळण्यात आला. या अनुषंगाने युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने
'नशा मुक्त युवा' या संकल्पनेवर आधारित 'राष्ट्रीय नशा मुक्ती प्रश्नमंजुषा' कालपासून 'माय भारत' पोर्टलवर सुरू केली आहे. हे डिजिटल पोर्टल
युवकांसाठी १५ जुलै पर्यंत खुलं राहणार आहे.
****
याच अनुषंगानं नशा मुक्त भारत अभियान
सर्वत्र राबवण्यात आलं. नशा बंदी मंडळाचे मराठवाडा विभाग संघटक भाऊ पठाडे यांनी, युवकांना आणि पालकांना विशेष आवाहन केलं. ते म्हणाले,
बाईट – भाऊ पठाडे
****
आंतरराष्ट्रीय अंमली
पदार्थविरोधी दिनानिमित्त काल धुळे इथं २३ गुन्ह्यात जप्त केलेले २ कोटी रुपयांचे अंमली
पदार्थ नष्ट करण्यात आले. ९०१ किलो गांजा, १७३ किलो अफूची बोंडे यासह एमडी ड्रग्स, कोडीन सिरप आदींचा
यात समावेश आहे.
****
कृत्रिम बुद्धिमत्ता, अणु, अंतराळ आणि क्वांटम तंत्रज्ञान ही भविष्यातल्या
विकासाची आणि जागतिक स्पर्धेची दिशा ठरवणारी महत्त्वाची क्षेत्रं असल्याचं,
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
ते काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय क्वांटम अभियानाच्या पहिल्या
तीन वर्षांतच आपल्या निम्म्याहून अधिक उद्दिष्टांची पूर्तता झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र
न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी एफ आय आर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी
तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या
पदांचा राजीनामा दिला. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती
दिली.
दरम्यान, याप्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या आठ आरोपींना अटक करण्यात
आली आहे. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री राम जन्मभूमी पोलीस
ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता.
****
राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणारी
राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा
त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील.
आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी ही माहिती दिली.
दोन किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये
पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येईल. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच
होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीने म्हणजे ऑफ लाईन होणार आहे. हा निर्णय
२०२७ च्या पूर्वपरीक्षांपासून लागू होईल, असं त्यांनी सांगितलं.
तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार
खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क
करण्यात आला असल्याची माहितीही भिमनवार यांनी दिली.
****
छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त
काल सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक
न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईतल्या
लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन छत्रपती शाहू महाराजांच्या
पुतळ्याला अभिवादन केलं.
कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी
शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार
श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद तसंच
महानगरपालिकेच्या वतीने काल मिल कॉर्नर इथल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला
अभिवादन करण्यात आलं.
हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक
न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
नांदेड इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
विभागाअंतर्गत, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने समता
दिंडीसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते समता दिंडीचं
उद्घाटन झालं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन
यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर इथं
काल समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी आणि संविधान जनजागृती प्रभातफेरी काढण्यात
आली. या उपक्रमाला लातूर शहरातले नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं
उपस्थित होते.
****
देशभरात काल मुहर्रम पाळण्यात आला. प्रेषित
मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं
स्मरण करून देणारा हा दिवस आहे. मुहर्रमनिमित्त ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढण्यात
आल्या.
छत्रपती संभाजीनगर शहरात मोहरमनिमित्त
विविध भागांतून सवाऱ्या निघाल्या असून, मोठ्या संख्येनं मुस्लिम
बांधव त्यात सहभागी झाले होते. मुस्लिम बांधवांनी अत्यंत शांततेत धार्मिक परंपरांचं
पालन करत एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला.
****
पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण
जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून
नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी काल पुण्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच
मृताच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
उद्या २८ तारखेला राष्ट्रीय पल्स पोलिओ
लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन शून्य ते पाच वर्षे वयोगटातल्या
सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केलं आहे. ते म्हणाले,
बाईट – अभय धानोरकर
****
परभणी शहर महानगरपालिकेत कार्यरत तीन
मुकादम आणि तीन सफाई कामगारांची स्वच्छता निरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे, लाड-पागे समितीच्या शिफारशी नुसार हे आदेश देण्यात आले. महापौर सय्यद इक्बाल,
आयुक्त नितिन नार्वेकर, यांच्या हस्ते हे पदोन्नती
आदेश प्रदान करण्यात आले.
****
परभणी-जालना रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीमुळे
आजपासून येत्या २९ सप्टेंबर दरम्यान अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल झाला
आहे. हे काम दर आठवड्याला रविवार, सोमवार आणि शुक्रवार वगळून अन्य चार
दिवशी होईल. यानुसार धर्माबाद –मनमाड ही रेल्वे तीस सप्टेंबरपर्यंत, मनमाड ते नांदेडपर्यंतच धावणार असून इतर गाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल झाला
आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने जालन्याहून कर्नाटकात
येलहंका इथं विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर रविवारी जालना इथून
सायंकाळी सात वाजून २० मिनिटांनी निघेल, तर परतीच्या प्रवासात
येलहंका इथून प्रत्येक सोमवारी रात्री साडे अकरा वाजता निघेल.
****
भारत-आयर्लंड यांच्यात दोन टी ट्वेंटी
सामन्यांच्या मालिकेत काल पहिल्या सामन्यात आयर्लंडने ३४ धावांनी विजय मिळवला. आयर्लंडने
प्रथम फलंदाजी करत दिलेलं १८२ धावांचं आव्हान गाठतांना, भारतीय संघ १९ व्या षटकांत १४८ धावांवर सर्वबाद झाला. मालिकेतला दुसरा सामना
उद्या होणार आहे.
****
हवामान
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रसह विदर्भाच्या
काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देणयात आला आहे.
****
No comments:
Post a Comment