Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
विधानपरिषदेच्या उपसभापती
पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जे.एम.अभ्यंकर यांनी, तर महायुतीकडून सचिन अहिर
यांनी अर्ज दाखल केले. अहिर यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ
शिंदे यांच्या नेतृत्वाखाल्या शिवसेनेत प्रवेश करुन हा अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. या अर्जांची आता
छाननी होत असून, त्यानंतर आवश्यकता
भासल्यास उपसभापतीपदासाठी निवडणूक होईल.
दरम्यान, सदनात आपली संख्या कमी असली
तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं, ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं.
****
गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा
वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा
केली जाईल, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना लक्ष्य
करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्यं करवून घेतल्यासंदर्भातला मुद्दा आमदार अर्जुन
खोतकर यांनी उपस्थित केला होता. अल्पवयीन बालकांना फूस लावून, पैसे देऊन, शस्त्र दिलं असेल तर सदर व्यक्ती
घटनास्थळी नसली तरी त्यांनीच गुन्हा केला आहे असे समजून त्यांच्यावर कारवाईची तरतूद
असणारी सुधारणा कायद्यात केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रीय
विश्लेषणासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या
प्रश्नाच्या उत्तरात दिली.
**
२०२३ ते मे २०२६ या कालावधीत
राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर चार घटना घडल्या, तर सक्तीच्या धर्मांतराची
एक घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या
संचालकाने तिथं काम करणाऱ्या तरुणींशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ केल्याप्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते
बोलत होते. या प्रकरणातल्या दोषींवर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं.
**
महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत
परफॉर्मन्स परवाना घेऊन त्यावर डान्सबार चालत असल्याचं निदर्शनास आलं असून, हे थांबवण्यासाठी, डान्सबारच्या कायद्यानुसारच
हे परवाने घ्यावे लागतील, अशी दुरुस्ती यंदाच्याच अधिवेशनात महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत आणू, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केली.
**
राज्यात चाळीस टक्क्यांहून
अधिक वीज गळती अथवा चोरी असणाऱ्या शहरात खासगी वितरण व्यवस्था सुरू केल्यावर हे प्रमाण
निम्म्याहून कमी आलं आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. याबाबतचा प्रश्न रईस शेख यांनी
उपस्थित केला होता.
**
दरम्यान, राम मंदिर देणगी अपहार प्रकरणावरून
विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
****
संरक्षण दल प्रमुख जनरल उपेंद्र
द्विवेदी यांचा कार्यकाळ समाप्त झाला. आज नवी दिल्लीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा
दिला. चार दशकांहून अधिक काळ भारतीय सेनेत काम करणं हे आपलं सौभाग्य होतं, अशी भावना त्यांनी यावेळी
व्यक्त केली. आता जनरल धीरज सेठ यांच्याकडे संरक्षण दल प्रमुखपदाची सूत्रं सोपवण्यात
आली आहेत.
****
राज्याच्या टीईटी पेपरफुटी
प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्रकुमार गुप्ता याची पत्नी सुमनकुमारी हिला
बिहारच्या पटणा शेरपूर इथून अटक केली आहे. या परिक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या
गेल्या, त्या बिजेंद्रकुमार
गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत आणल्या आणि तिथे
त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे चार अन्य
आरोपी फरार असून,
ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
****
राज्यात मतदार याद्यांच्या
विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. याअंतर्गत येत्या २९ जुलै
पर्यंत मतदान-केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन
गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या पाच ऑगस्ट रोजी प्रारुप
मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात एक लाखाहून अधिक बीएलओ
नियुक्त करण्यात आले आहेत.
****
पोलीस आणि नागरिक यांच्यात
विश्वास, संवाद आणि
सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या
संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीस आपल्या सोसायटीमध्ये’ या उपक्रमाला नागरिकांकडून
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत लातूर शहर आणि परिसरातल्या दहा
पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ३२० ठिकाणी भेटी देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment