Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
एसटी बस चार्जिंग स्टेशन
उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·
विधान परिषदेच्या १७
जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली, जवळपास सर्वच पक्षात
बंडखोरी
·
आयआयटी प्रवेशासाठीच्या
जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत मुलांची सरशी
·
मराठवाडा साहित्य परिषदेचे
२०२६ चे ग्रंथपुरस्कार जाहीर
आणि
·
पुढील दोन दिवसात
मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता
****
राज्य परिवहन महामंडळ एसटीचा शंभर टक्के ताफा ई-बसेसमध्ये
रूपांतरित करण्याचं उद्दिष्ट असून, बसेससाठी आवश्यक असलेले
चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल एसटी महामंडळाच्या ई-बसेस संदर्भातल्या बैठकीत
बोलत होते. विकसित महाराष्ट्र अंतर्गत एसटी महामंडळाच्या बसचा ताफा २०२९ पर्यंत ५०
टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के;
तर २०४७ पर्यंत शंभर टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत
करायचा आहे. महामंडळ सध्या पाच हजार एकशे पन्नास ई-बसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
राबवत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
दरम्यान, राज्यात सर्व बसस्थानकातली स्वच्छतागृहं
आता मोफत सुविधा पुरवणार आहेत. प्रवाशांसह बस स्थानकात येणाऱ्या नागरिकांना या
सुविधेसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान
व्यक्त होत आहे.
****
लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे ८० लाखांहून अधिक
लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई-केवायसीची
अनुपलब्धता,
कुटुंबातल्या सदस्याच्या नावे वाहन, इतर
सरकारी योजनांचा लाभ,
यासारख्या कारणामुळे ही नावं वगळल्याचं, महिला
बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. पात्र लाभार्थ्यांचा लाभ स्थगित
झाला असेल,
किंवा इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी
तातडीने महिला आणि बालविकास विभागाकडे संपर्क साधावा, या
सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल, असं
आश्वासनही तटकरे यांनी दिलं.
****
विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. छत्रपती संभाजीनगर इथं
औरंगाबाद–जालना मतदार संघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट तसंच महाविकास आघाडी कडून
देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सिल्लोड
नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज
दाखल केला.
नांदेड विधान परिषद मतदारसंघातून काल आठ उमेदवारांचे १७
अर्ज प्राप्त झाले. यात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे अमरनाथ राजूरकर यांनी
काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद मतदार संघातून महायुतीचे
बसवराज पाटील यांनी तर महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज
दाखल केला. यासोबतच सहा अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
दरम्यान, महायुतीचे १७ पैकी १७ उमेदवार विजयी
होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या
बंडखोरीविषयी विचारलं असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर
उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमधे कोणतेही मतभेद नसून
सर्व जागा महायुती जिंकेल,
असा विश्वास महसूलमंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे
यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतदान होणार असून
त्याचदिवशी मतमोजणी होईल.
****
व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली
आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. १९ किलो वजनाचा
व्यावसायिक सिलेंडर मुंबईत साडे ४३ रूपयांनी महागला असून, त्याची
किंमत तीन हजार ६७ रूपये ५० पैसे झाली आहे. पाच किलोग्रम वजनाच्या छोट्या गॅस
सिलेंडरच्या दरात ११ रूपये वाढ झाली आहे.
दरम्यान, केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल
आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या
निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून दीड रुपया प्रतिलीटर, तर
डिझेल साडे १३ रूपये प्रतिलीटर आणि एटीएफवरचा कर साडे नऊ रूपये प्रतिलीटर केला
आहे.
****
प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल
मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमन कल्याणपूर यांचं परवा निधन
झालं, त्या ८९ वर्षांच्या होत्या.
****
नीट युजी २०२६ ची पुनर्परीक्षा सध्याच्या 'पेन-अँड-पेपर' पद्धतीऐवजी
'संगणक आधारित घ्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल
फेटाळून लावली. राष्ट्रीय परिक्षा संस्था – आधीच अनेक आव्हानांचा सामना करत
असल्यामुळे,
ही पुनर्परीक्षा संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्याचा
प्रश्नच उद्भवत नाही,
असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी
२७ जुलैला होणार आहे.
****
आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत मुलांनी
बाजी मारली आहे. काल जाहीर झालेल्या या परीक्षेच्या निकालात यंदा ५६ हजार ८८०
विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले, यामध्ये ४६ हजार ७७३ मुलं
तर १० हजार १०७ मुलींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार ३६० पैकी ३३० गुण
मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे
पहिली आली आहे. तिला २८० गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती ७७व्या क्रमांकावर
आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे २०२६ चे ग्रंथपुरस्कार काल जाहीर
झाले. छत्रपती संभाजीनगर इथं परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि
कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी ही घोषणा केली. नरहर कुरुंदकर वाङ्गमय पुरस्कार
नांदेडचे डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर, यांच्या 'पुस्तके
: साद आणि दाद'
ह्या पुस्तकाला जाहीर झाला आहे, तर
प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्गमय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ. शिव कदम, यांच्या
'चित्रपटाचे शास्त्र - संहिता ते समीक्षा' या ग्रंथाला जाहीर झाला आहे.
बी. रघुनाथ कथा-कादंबरी पुरस्कारासाठी ठाण्याचे क्षितिज
देसाई, यांच्या 'शीतपेटीतून जेव्हा जाग येते' या कथासंग्रहाची तर नरेंद्र मोहरीर
वाङ्गमय पुरस्कारासाठी परभणीचे डॉ. साहेब खंदारे, यांच्या 'मराठवाडा
अमूर्त संस्कृती संचित'
या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. मराठी पुस्तक व्यवहारात
लक्षणीय कार्यासाठीचा रा. ज. देशमुख स्मृतिपुरस्कार मुंबईच्या उमा नाबर यांना
जाहीर झाला आहे. रोख रकमेच्या स्वरुपातले हे पाच पुरस्कार येत्या २१ जून रोजी
प्रदान केले जाणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प करून
विकसित भारत २०४७ चा पाया रचला असून, सर्वच क्षेत्रामध्ये
आमूलाग्र विकासाला गती देण्याचे काम केंद्र करत असल्याचं, छत्रपती
संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योजक विवेक देशपांडे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला
१२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आकाशवाणीशी बोलतांना देशपांडे यांनी हे विचार
मांडले. ते म्हणाले…
बाईट- ज्येष्ठ उद्योजक विवेक
देशपांडे
****
येत्या सहा जून रोजी शिवराज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगड
किल्ल्यावर बीडच्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दोन दिवस
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला
अभिषेक, राजमाता जिजाऊ यांच्या समाधीला अभिवादन, पारंपारिक वाद्यांच्या
गजरात ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात येणार आहे. समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे
पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काल देशभरात महागाई विरोधात
निदर्शनं केली. छत्रपती संभाजीनगर इथं पैठण गेट परिसरात भारतीय कम्युनिस्ट पक्ष
तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. इराण तसंच
रशियाकडून स्वस्तात इंधन घेतलंच पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव दिलाच
पाहिजे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
हिंगोली इथं काल विविध आंबेडकरी पक्ष आणि सामाजिक
संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जाती
प्रवर्गातील आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत ही प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची
मागणी करणारे निवेदन यावेळी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
****
लातूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात
गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही
खुलताबादसह काही भागात पाऊस झाला.
****
राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक पाच दशांश
सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४० पूर्णांक आठ दशांश सेल्सियस, बीड
४१ पूर्णांक दोन,
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव इथं सरासरी इथं ३९ अंश
सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
येत्या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा
आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment