Wednesday, 3 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      मुंबई तसंच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ म्हणून घोषणा

·      विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या १७ उमेवारांची यादी जाहीर

·      मराठा आरक्षणासंदर्भात विशेष कक्ष;हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याचा निर्णय

·      माजलगाव इथे बकरी ईदला चारशेहून अधिक गोवंशाची हत्या

आणि

·      जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा

****

मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत देशातल्या अकरा राज्यांतून मालाची आवक होत असून, वार्षिक चार लाख मेट्रिक टन मालाची उलाढाल होते.

****

विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या १७ उमेवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोतदार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाठ, रविंद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, आणि विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही बंडखोर उमेदवारांनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी, अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

****

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणर आहे. या जागेसाठी निवडणूक लढवली गेल्यास १८ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. या साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव मेघना तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतील अंतर्गत वादाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही, असा आरोप त्यांनी केला.

सरकार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणार असलं तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची, हा मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं असंही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या मुद्यावरून सरकारवर टीका केली आहे. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. ही कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.

****

मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ही माहिती दिलर. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

न्यायमूर्ती शिंदे समितीला ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळा उपसमितीने घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील तीन महिन्यांमध्ये गृहभेटी, विशेष शिबिरं आयोजित करुन याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी आदी सूचनाही मंत्री विखे-पाटील यांनी दिल्या.

****

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांनी आज मुंबईत गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तूरचना, ऐतिहासिक महत्त्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने दहा हजार कोटी रुपयांच्या विमान इंधन किंमत स्थिरीकरण निधीला मंजुरी दिली आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून असलेल्या ७७ लाख नोकऱ्यांचं संरक्षण होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

नवी दिल्लीत एका रेस्टॉरन्टला लागलेल्या आगीत २१ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमधे बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

****

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्ह्यातल्या गोपीनाथ गडावर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बीड जिल्ह्यासह राज्यभरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

****

संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी विहिरी, हातपंप तसंच रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर भूगर्भात पाणीसंचयन होईल अशा पद्धतीने ‘जलतारा खड्डे’ तयार करावेत असे निर्देश धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी संबंधितांना दिले आहेत. संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत आज ते बोलत होते. पुढील वर्षासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

हिंगोली जिल्ह्यात १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत “शेत वाचवा अभियान” युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने हा सल्ला देण्यात आला आहे. शेत वाचवा अभियान या अभियानाची मुख्य संकल्पना “सुदृढ मृदा – समृद्ध पीक – आनंदी शेतकरी” ही असून कृषिविज्ञान केंद्र, हिंगोलीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यातील माजलगाव इथे बकरी ईदच्या दिवशी सुमारे चारशेहून अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. या घटनेच्या चित्रफिती सामाजिक प्रसार माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकाराची तातडीने दखल घेत दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या मातीत फॉस्फरसचं प्रमाण पुरेसं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद किंवा इतर पिकांसाठी ‘डीएपी’ खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीने थांबवावा. फॉस्फरसच्या रासायनिक डोसमध्ये २५ टक्क्यांपर्यंत कपात करून, त्याऐवजी पीएसबी आणि ५ टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर करावा असा सल्ला हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ पी. पी. शेळके यांनी दिला आहे.

****

जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल फेरी काढण्यात आली. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.

हिंगोली शहरात पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या वतीने आज भव्य सायकल रॅली काढण्यात आली. ‘सायकल चालवा, भविष्य घडवा’, ‘पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा’, अशा घोषणा रॅलीत दरम्यान देण्यात आल्या.

****

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या आरुष शेट्टीने चिनी खेळाडूला ८-२१, २२-२०, २१-१५ असं हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. उद्या उपउपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना हाँगकाँगच्या खेळाडूशी होईल. महिला एकेरीत आज सायंकाळी उन्नती हुडा चा सामना जपान ची विश्वविजेती नोजोमी ओकुहारा हिच्याशी होत आहे. दरम्यान, पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला आज मलेशियाच्या जोडीसोबतच्या सामन्यात दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. तर पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयचा पराभव झाला.

****

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत निवड झालेल्या युवकांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक तसंच पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळास भेट देऊन अर्ज करण्याचं आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या विभागीय उपायुक्त विद्या शितोळे यांनी केलं आहे.

****

रिझर्व्ह बँकेच्या प्रत्यक्ष सोन्याच्या साठ्यात कोणताही बदल झालेला नसून  तो ८८० पूर्णांक़ ५२ टन इतका स्थिर असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे रिझर्व्ह बँकेने अंदाजे १२ अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं विकलं असावं, असं वृत्त काही माध्यमांमधून प्रसारित झालं होतं, रिझर्व्ह बँकेनं त्या वृत्ताचं खंडन करत, हा खुलासा केला आहे.

****

हवामान

राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ३९ पूर्णांक पाच दशांश सेल्सियस, नांदेड ३७ पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक आठ, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

Post a Comment