▼

Monday, 8 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 08 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०८ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      महाराष्ट्रात रेल्वे विकासाच्या ६५ कामांना ‘महारेल’च्या बैठकीत मान्यता

·      नीट फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर - प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला

·      ऑल इंडिया रेडियो अर्थात आकाशवाणीला नव्वद वर्ष पूर्ण

·      राज्यात नैऋत्य मोसमी पावसाची वेगानं आगेकूच

आणि

·      न्यू चंदीगड क्रिकेट कसोटीत भारताचा अफगाणिस्तानवर एक डाव आणि ३०० धावांनी विजय

****

‘महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळा’मार्फत करण्यात येणाऱ्या एकूण १३१ पैकी, पहिल्या टप्प्यातील ६५ कामांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘महारेल’च्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामे महारेलमार्फत करण्यात येणार आहेत. त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

****

सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हा प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

****

येत्या २१ जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी २०२६ च्या फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. परदेशातल्या १४ शहरांसह देशातल्या ५५१ केंद्रांवर दुपारी २ ते सव्वा पाच या वेळात लेखी पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे.

दरम्यान, या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा, एनटीएनं फेटाळला आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून, उमेदवारांना सुरक्षित आणि निःपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सीबीएसईने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू केलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सीबीएसई ला नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १२ जूनला होणार आहे.

****

महाराष्रायातून राज्यसभेच्या एका जागेसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जैन यांच्या उमेदवारीमुळे गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

****

सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार शाळांमध्ये विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. याबाबत कोल्हापुरात झालेल्या बैठकीनंतर राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी ही माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत समाजमाध्यमांच्या सुरक्षित वापराबाबत व्यापक जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.

****

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. आज सोलापूर इथं झालेल्या राज्यस्तरीय निर्धार बैठकीतून हा इशारा देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. अनेक राज्यांनी या दिशेने पावले उचलली असताना महाराष्ट्र सरकारकडून मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, असं संघटनेनं म्हटलं आहे.

****

बीड इथला मोटार वाहन विभाग - आरटीओ कर्मचारी संघटना उद्या प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसाच्या संपावर जाणार आहे. आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या भूमिकेवर संघटना ठाम असून, १६ जून पासून बेमुदत संपाचा इशारा संघटनेनं दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार आज जाहीर झाले. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयंत माईणकर, वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम, माजी मुद्रितशोधक दिगंबर सावंत, वृत्तछायाचित्रकार संदीप पागडे यांच्यासह सहा जणांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २२ जूनला मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांचं हे ३६ वं वर्ष आहे.

****

ऑल इंडिया रेडियो अर्थात आकाशवाणीला आज नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी, ८ जून १९३६ रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. सुमारे दोन दशकांनंतर आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आकाशवाणीच्या कार्यविस्ताराचा हा संक्षिप्त आढावा -

देशाच्या ९८ टक्के लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली ही संस्था २३ भाषा आणि १४६ बोलीभाषांमधून देशभरातल्या ५९१ केंद्रावरून आपले कार्यक्रम प्रसारित करते. आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग १०० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणीचा वृत्तविभाग, व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करत देशातल्या सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांच्या प्रसारणासाठी सदैव कार्यरत आहे.

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षात गरीबांच्या कल्याणासाठी केंद्रसरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. गेल्या १२ वर्षांत भारताने अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं सांगितलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज मध्ये शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका सोहळ्यात या सैनिकांना गौरवण्यात आलं.

****

राज्यात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्रज्ञ एस. डी. सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले -

बाईट – एस डी सानप

****

लातूर जिल्ह्यातही मागील चोवीस तासांत सरासरी साडे तेरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, औसा तालुक्यात सर्वाधिक ३७ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पाऊस झाला असून आगामी काही दिवसांत जिल्ह्यात मान्सूनची सक्रियता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात आज सकाळपर्यंत आठ तालुक्यात मिळून सरासरी ६६ पूर्णांक ४ शतांश मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक जवळजवळ १२२ मिलीमीटर पाऊस कळंब तालुक्यात झाला. या तालुक्यातील तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद असून, लातूर कळंब मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या पावसामुळे धाराशिव तालुक्यातील तेरणा नदीसह अनेक ओढे तसंच नाले प्रवाहित झाले आहेत.

****

न्यू चंदीगड इथं झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतानं अफगाणिस्तानला एक डाव आणि ३०० धावांनी पराभूत केलं. यापर्वी भारतानं आपला पहिला डाव ८ गडी बाद ५६४ धावांवर घोषित केला. अफगाणिस्तानचा पहिला डाव १५२ धावांवर संपुष्टात आल्यावर भारताने त्यांना फॉलोऑन दिला. अफगाणिस्तानचा दुसरा डावही ११२ धावांवर आटोपला. दोन्ही डावात मिळून अफगाणिस्तानचा संघ २६४ धावाच करू शकला. भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने तीस धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. पहिल्या डावात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथारने अवघ्या ३३ धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या सहा फलंदाजांना बाद केलं. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात पाच बळी घेणारा दहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे २२ हजार हेक्टर शासकीय पडिक जमीनीवर दोन कोटी ४४ लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 'ग्रीन महाराष्ट्र मिशन' अंतर्गत आगामी १० वर्षांत हे अभियान राबवण्याचं उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केलं आहे. विविध विभागांच्या समन्वयातून हे काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी दिले. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस विविध विभागांच्या आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने ‘वनराई बंधाऱ्यांची’ निर्मिती आणि दुरुस्तीचं नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

****

लातूर शहरात ॲबेट मोहीमेची पहिली फेरी आजपासून सुरू झाली. २० जूनपर्यंत ही फेरी चालणार असून, शहरातील जवळजवळ ७७ हजार ५९७ घरामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत घर भेटीस येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करावं असं आवाहन, लातूर महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्थानिक भाजीमंडई परिसरात नागरिकांना कापडी पिशव्यांचं मोफत वाटप करण्यात आलं.

****

No comments:

Post a Comment