Tuesday, 9 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता; प्रशासकीय विभागांची संख्या आता ४५

·      नीट यूजी पुनर्परिक्षेबाबत सर्व उपाय सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षणमंत्यांअसकडून ग्वाही

·      प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय

·      प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला दहा वर्षं पूर्ण

आणि

·      नांदेड परिक्षेत्रात अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत ४८ आरोपींविरुद्ध कारवाई

****

प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे.

राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी, यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७ मधल्या तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७ तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला, तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

****

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज इयत्ता पहिली ते सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन केलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री दादाजी भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

केंद्र सरकारनं या महिन्याच्या २१ तारखेला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परिक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले आहेत, असं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रीय चाचणी संस्था- एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. परीक्षेचं साहित्य परिक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहचण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनिषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अवेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याचप्रकरणी, १५ दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या २१ तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी, आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे.

****

नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तीन भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०चं उल्लंघन असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. १ जुलैपासून इयत्ता नववीसाठी तीन भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईने जारी केलं असून, यातल्या दोन भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे.

****

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात येणार असून, सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हास्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रं सुरू करण्यात येत असून मुंबईत तीन तर पुणे आणि नागपूर इथे प्रत्येकी दोन केंद्रं असतील. यापैकी २६ केंद्रांचं काम पूर्ण झालं असून सहा केंद्रं अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित आठ केंद्रंही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

****

जागतिक नेत्रदान दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातल्या सगळ्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं हे राज्यस्तरीय अभियान राबवण्यात येणार असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात मरणोत्तर नेत्रदान, वृक्षारोपण तसंच योगाभ्यास शिबिरांसह विविध जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत.

****

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज दहा वर्षं पूर्ण होत आहेत. या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे “१०वर्षे – एक दशकाची काळजी” हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

****

नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या १२७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज सकाळी झाला. या समारंभात एकूण पाचशे त्र्याऐंशी प्रशिक्षणार्थीं प्रशिक्षण पूर्ण करून पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात सामील झाले. यामध्ये चारशे वीस पुरुष आणि एकशे त्रेसष्ठ महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.

****

ग्रामीण भागात आजही शेतीसाठी बैलजोडीचा मोठा आधार असतो. मात्र ऐन हंगामात या बैलजोडीतला एक बैल आजारी पडला, किंवा दगावला, तर शेतकरी मोठ्या अडचणीत येतो. लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यात एका शेतमजुरावर ओढावलेल्या अशाच परिस्थितीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -

देवणी तालुक्यातील बोंबळी इथले शेतमजूर काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांचा एक बैल नुकताच वीज कोसळून ठार झाला. खरीप हंगामाच्या तोंडावरच ही दुर्घटना घडली. एक बैल नसल्याने, मशागतीची कामं होणं शक्य नव्हतं. हंगाम हातचा जाऊ नये, यासाठी काशिनाथ गायकवाड यांनी, दुसऱ्या बैलाच्या जागी आपल्या पत्नीला उभं केलं, आणि मशागतीची कामं सुरू केली. या दाम्पत्याचा संघर्ष पाहून ग्रामस्थही भावूक झाले. दरम्यान याविषयी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी काशिनाथ गायकवाड यांच्या वीज पडून मृत पावलेल्या बैलाचा पंचनामा झाला आहे. लवकरच त्यांच्या खात्यावर शासनाची नियमानुसार २० हजार रुपयांची मदत ट्रान्स्फर केली जाणार असल्याची माहिती दिली.

शशिकांत पाटील, आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर

****

बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी सुरू झाली आहे, मात्र महा डिबिटी पोर्टलद्वारे सोयाबीन बियाण्यांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित एजन्सीकडे बियाणे मागितल्यानंतर शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. कृषी विभाग आणि महाबीज यांनी तत्काळ पात्र शेतकऱ्यांना बियाणाचं वाटप करावं अन्यथा आंदोलन करावं लागेल, असा इशारा बीडचे शेतकरी आंदोलक धनंजय गुंदेकर यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात चार जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६७ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. याप्रकरणी नांदेड जिल्ह्यात ११, परभणीत ९, हिंगोलीत ३, तर लातूर जिल्ह्यात ७ गुन्ह्यांची नोंद झाली असून ४८ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. अर्ज बाद होण्यामागच्या कारणांची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments:

Post a Comment