Wednesday, 10 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      सर्वात प्रदीर्घ काळ लोकनियुक्त प्रमुख पदावर राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अभिनंदन;देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांकडून शुभेच्छा

·      राज्यात मे आणि जून महिन्यात गारपिटीमुळे बाधित फळपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश

·      मेटा कंपनी भारतात पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम डेटा सेंटर स्थापन करणार

·      दहावी - बारावीची पुरवणी तसंच श्रेणीसुधार परीक्षेचं १६ जून ते ८ जुलै दरम्यान आयोजन

आणि

·      मराठवाड्यात बीड लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट

****

सर्वात प्रदीर्घ काळ लोकनियुक्त प्रमुख पदावर राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय मंत्रिमंडळाने आज एका विशेष ठरावाद्वारे अभिनंदन केलं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मोदी यांनी पंतप्रधानपदी तब्बल ४ हजार ३९९ दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे ४ हजार ३९८ दिवस या पदावर होते.

दरम्यान, सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.

सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा हा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला, असं राष्ट्रपती म्हणाल्या.

 

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संवैधानिक मूल्यं, संसदीय लोकशाही, आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला यांनी नमूद केलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान यांच्यासह अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, ऑस्ट्रेलिया, मलेशिया नायजेरिया मालदीव श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही परंतु नवभारताच्या निर्माणामधे नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस यांनी नमूद केलं, ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नुकसानभरपाईची प्रक्रिया गतीमान करावी, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात एका आढावा बैठकीत बोलत होते. मे आणि जून या कालावधीत राज्यात २७ जिल्ह्यांमध्ये एकूण ६१ हजार ४ हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून त्यापैकी १८ हजार १२१ हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील आहे. बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.

****

विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांना त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. आज पुणे इथं एका आढावा बैठकीत ते बोलत होते. एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळण्यात येणार नाही, तसच कोणत्याही परिस्थितीत अपात्र नागरिक मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, मतदार यादीतील नावे खात्री करुनच कमी करावी, असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. एसआयआर मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील, घरोघरी भेट देऊन पूर्वमुद्रित फॉर्मद्वारे मतदारांच्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे.

****

सामाजिक माध्यम क्षेत्रातली मेटा ही कंपनी भारतात आपलं पहिलं एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम डेटा सेंटर स्थापन करणार आहे. कंपनीने आज यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. या महत्त्वपूर्ण करारांतर्गत, मेटा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज संयुक्तपणे गुजरातच्या जामनगरमध्ये १६८ मेगावाट क्षमतेचं भव्य डेटा सेंटर उभारणार आहेत. हे डेटा सेंटर भारताप्रती मेटाची वचनबद्धता दर्शवणारे असून, झपाट्याने वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था यामुळे भारत गुंतवणुकीसाठी एक महत्वाचं स्थान ठरत असल्याचं, कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे.

****

जागतिक नेत्रदान दिन आज पाळला जात आहे. या निमित्ताने नेत्रदानाविषयी जनजागृतीपर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या तीन युवकांनी मात्र दृष्टिबाधितांना डिजिटल दृष्टी देणारं लेट सी नावाचं एक मोबाईल ॲप विकसित केलं आहे. शौनक सावरगावकर, श्रीनिवास खिस्ते आणि डॉ ओजस मुंदडा अशी या तीन युवकांची नावं असून, त्यांची सविस्तर मुलाखत आपण आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी या कार्यक्रमात परवा १२ जून सायंकाळी साडे पाच वाजता ऐकू शकता.

****

देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमधे रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केली आहे, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी

****

राज्य शिक्षण मंडळाची दहावी-बारावीची पुरवणी तसंच श्रेणीसुधार परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४ परीक्षा केंद्रांवर ५ हजार ८१९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात इयत्ता १० वीचे २ हजार ९२८ विद्यार्थी हे १४ केंद्रांवर तर इयत्ता १२ वीचे २ हजार ८९१ विद्यार्थी १० परीक्षा केंद्रांवर आपली परीक्षा देतील. इयत्ता १० वीची परीक्षा ही दि.१६ ते ३० जून दरम्यान होणार आहे तर इयत्ता १२ वीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै दरम्यान होणार आहे.

****

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उद्या ११ जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथं शिक्षण हक्क परिषद आणि राज्यस्तरीय महामंडळ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सभेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि पोपटराव पवार मार्गदर्शन करणार आहेत. टीईटी, पदोन्नती, संचमान्यता, रिक्त पदे, बदल्या आणि शिक्षणविरोधी धोरणांसह विविध प्रश्नांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.

****

बीड जिल्ह्यात १५ जूनपासून शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून विशेष शिबिरांचं आयोजन करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. आज बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आधार नोंदणी समितीची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. शाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक तालुकानिहाय आणि शाळानिहाय आधार शिबिरांचा एक ठोस मास्टर प्लॅन तयार करावा, ज्या शाळा १५ जूनपासून नियमित सुरू होत आहेत, त्याच ठिकाणी या विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात यावं, असं जॉन्सन म्हणाले.

****

वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, अन् या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासात बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटीची रक्कम मिळाली. यामुळे खरीप हंगामासाठी मिळालेली कामे पूर्ण करण्याची चिंता दूर झाली, असून मिळालेली कामे देखील चांगली होतील, असं या कुटुंबाने म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत १४० प्रतिबंधात्मक कारवाया करून १० लाख ७२ हजार ८८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. कदम यांनी आज नांदेड इथं ही माहिती दिली. दरम्यान, २९ मे पासूनच्या कारवाईत आत्तापर्यंत १४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment