Friday, 12 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      गेल्या १२ वर्षांत देशात आर्थिक, सामाजिक, पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक क्षेत्रांत व्यापक परिवर्तन-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्यटनविषयक तयारीचा उच्चस्तरीय बैठकीत आढावा

·      एसटी प्रवास सुविधांसाठी येत्या १ ऑगस्ट पासून NCMC कार्ड बंधनकारक

·      येत्या २१ जूनला नियोजित नीट फेरपरीक्षेच्या कालावधीत १५ मिनिटे वाढ

·      प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन

आणि

·      मराठवाड्यात तीन जिल्ह्यांना उष्णतेचा तर उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या १२ वर्षांत आर्थिक, सामाजिक, पायाभूत आणि सांस्कृतिक क्षेत्रांत व्यापक परिवर्तन झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या १२ वर्षपूर्ती निमित्त ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या काळात देशाच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाली, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. देशाचा विकासदर सात टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांमध्ये भारताने जागतिक नेतृत्व मिळवलं, तसंच विविध योजनांचे लाभ थेट नागरिकांच्या खात्यात जमा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनाने विशेष सहकार्य केले असून अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर, दिघी पोर्ट, अमरावती मेगा टेक्स्टाइल पार्क, छत्रपती संभाजीनगर इथली डीएमआयसी आणि ऑरिक सिटी, गडचिरोली स्टील सिटी; तसंच रायगड इथं एम्ससारखे महत्त्वाचे प्रकल्प केंद्र सरकारच्या सहकार्याने साकारल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

****

माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम २०२६ चा मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या २७ जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. टेलिव्हिजन आणि रेडियो क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे.

****

राज्यसभेच्या निवडणुकीत मध्यप्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं, असं न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ए एस चांदुरकर यांच्या पीठाने सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिलेली नाही, असा आक्षेप मध्यप्रदेश भाजपाने घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला आहे.

****

अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होत आहे.

****

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्यटनविषयक तयारीचा केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार आज शिर्डी इथं झालेल्या उचास्तरीय बैठकीत आढावा घेतला. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देश-विदेशात प्रसिद्धी यासंदर्भातील नियोजनावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. नाशिक विभागीय आयुक्त तथा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम हे बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या १ ऑगस्ट पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC-National Common Mobility Card हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे.

आजअखेर राज्यातल्या सुमारे ५१ लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत.

****

येत्या २१ जून रोजी होणाऱ्या नीट युजी फेरपरीक्षेचा कालावधी १५ मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. आता ही परीक्षा दुपारी २ ते संध्याकाळी सव्वा पाच या वेळेत होईल. ही परीक्षा सुरक्षित वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्याची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागाही देण्यात आली आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी ची सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या १४ जूनला होणार आहे. बीड जिल्हा केंद्रात २१ उपकेंद्रात ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. जिल्ह्यातून एकूण ५ हजार ८८१ उमेदवार परीक्षा देणार आहेत. सर्व केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथलं जलसंपदा कार्यालय नांदेडला स्थलांतरित करण्याच्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयाविरोधात आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते सहभागी झाले होते.

****

बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त भाविकांची होणारी अलोट गर्दी आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रशासनाने १० कलमी नियमावली जारी केली असून, संपूर्ण परिसरात २४ तास शोध आणि बचाव पथकं तैनात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या होडी चालकांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे. सर्व होडी चालकांकडे वैध परवाने असण्याची खात्री केली जाणार आहे.

****

जालना जिल्ह्यात टिप्पर आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक विद्यार्थीनी जागेवरच ठार झाली, तर दोघी गंभीर जखमी झाल्या. राजूर मार्गावर गुंडेवारी परिसरात आज सकाळी हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जमीन खोदून केबल चोरी करणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश करत, सहा जणांना अटक केली. हे सहा जण हिंगोली आणि परभणी इथले रहिवासी आहेत. या कारवाईत दोन वाहनांसह सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन झालं. ते ४९ वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, काल रात्री त्यांचं निधन झालं. २०२४च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनु भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं.

****

महिलांच्या टीट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत १२ संघ सहभागी होत आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिला सामना १४ जून रोजी बर्मिंगहॅम येथे पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

****

भारताच्या पी.व्ही.सिंधूने सिडनीमध्ये सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चीनी तैपैईच्या चेन स्यू यू हिला २१-६,२१-९ असं हरवलं.

****

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना केंद्र शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी ई - केवयसी पूर्ण करावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने केले आहे.

****

हवामान

विदर्भातल्या नागपूर, अकोला, अमरावती, आणि यवतमाळला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांसह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांना आज उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment