Monday, 15 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      जिल्हा परिषद शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षण सुरु करणार- मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात

·      येत्या २२ जून ते १० जुलै दरम्यान विधिमंडळाचं मुंबईत पावसाळी अधिवेशन

·      राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी तसंच बारावीची उद्यापासून पुरवणी परीक्षा

आणि

·      नांदेड इथं एका औषधी दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

****

जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला, यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागाने केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं सांगितलं. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देतांना, डिजिटल शिक्षणाचं महत्त्व मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं, ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दरम्यान, राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबईतल्या भायखळा इथंल्या महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यपालांनी नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पहिल्यांदाच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत केलं.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत केलं.

 

दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव डॉ. माणिक गुरसाळ यांनी मुंबईत ताडदेव इथल्या व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या दृष्टिबाधित विद्यालयाला भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं.

 

सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.

 

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं.

 

जालना इथं जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला. सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक सजावटीसह रांगोळी, फुगे आणि स्वागत कमानी उभारून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं आणि गणवेशांचं वितरणही यावेळी करण्यात आलं.

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगरपरिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचं वाटप, पालक मेळावा, सेल्फी पॉईंट, या उपक्रमांसोबतच नवीन विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन, त्यांना ओवाळून, पेढे आणि फुल देऊन स्वागत करण्यात आलं.

 

लातूर जिल्ह्यात काटगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा झाला. बास्टेवाड यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं. विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं. या अंतर्गत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची प्रत पालकांना देण्याची 'पहिले पाऊल' ही अभिनव संकल्पनाही राबवली जात आहे.

****

राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन येत्या २२ जून ते १० जुलै दरम्यान मुंबईतील विधानभवन इथं होणार आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या तीन आठवड्यांच्या अधिवेशन काळात अनेक महत्त्वाच्या विधेयकांसह, महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडले जाणार आहे. तसंच राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

****

एकोणिसावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथे होणार आहे या वर्षीच्या स्पर्धा विभागात १४४ चित्रपटांचा समावेश आहे; यात १३ देशांतील चित्रपट निर्मात्यांच्या ५२ आंतरराष्ट्रीय आणि ९२ राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा-बाह्य विभागात ४६ सहभागी देशांतील एकूण २०२ चित्रपट दाखवले जातील.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेला उद्यापासून सुरूवात होत आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज पार पडली. जिल्ह्यात दहावीचे २ हजार ९२८ विद्यार्थी १४ केंद्रांवर तर बारावीचे २ हजार ८९१ विद्यार्थी दहा परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. दहावीची परीक्षा १६ जून ते ३० जून दरम्यान आणि बारावीची परीक्षा १६ जून ते ८ जूलै दरम्यान होणार आहे.

****

२१ जून रोजी साजरा होणाऱ्या बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. दिल्ली इथं आज झालेल्या योग दिनाच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या १०० प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात अडीच हजार ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. ते म्हणाले..

बाईट - केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव

****

मराठवाड्यातील मराठा समाज बांधवांना मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ०२४०-२९८८०७७ हा मदत क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या पात्र नागरिकांनी यासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा, तसंच समस्यासाठी मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

नांदेड शहरातल्या डॉक्टर लेन भागातील तोष्णीवाल औषधी दुकानावर आज अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधं देणं,  विक्री केलेल्या औषधांच्या बिल न देणं, तसंच मुदतबाह्य औषधाची विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. एका रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतलेली औषधी मुदतबाह्य असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज वाटपाला गती दिली आहे. २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी बँकेला ४९० कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचं उद्दिष्ट असून, आतापर्यंत २९१ कोटी ५८ लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आलं, बँकेचे व्यवस्थापक अजय मोटे यांनी ही माहिती दिली. उर्वरित उद्दिष्ट निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी बँकेच्या सर्व शाखांना विशेष सूचना दिल्या आहेत.

****

एसटी महामंडळाच्या बहुतांश गाड्यांना सध्या मोठी गर्दी दिसून येत आहे. नवीन शैक्षणित सत्र सुरू होत असल्याने, विद्यार्थी, पालक आणि नोकरदार वर्ग आपापल्या शहराकडे परतत आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या दोन्ही बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे.

****

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये, आज मेक्सिको इथं झालेल्या एफ गटातील सामन्यात स्वीडनने ट्युनिशियाचा ५-१ असा पराभव केला. स्वीडनच्या मॅटियास स्वानबर्गने ८८ व्या मिनिटाला केलेल्या पाचव्या निर्णायक गोलमुळे स्वीडनने विश्वचषक स्पर्धेची विजयी सुरुवात केली. आज एच गटात स्पेन आणि काबो वर्दे यांच्यात अमेरिकेतील अटलांटा इथं सामना होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता सुरू होईल.

****

हवामान

येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.

****

 

 

No comments:

Post a Comment