Saturday, 20 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      पीएम किसान सन्मान निधीचा २३वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी

·      उद्या ‘जागतिक योग दिवस’;कोलकाता इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम

·      नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर एनटीएकडून देशभरात मॉक ड्रील

·      कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसराचा सहा महिन्यात विकास

·      काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील निर्दोष

आणि

·      छत्रपती संभाजीनगरचे पाच तरुण गणपती पुळेच्या समुद्रात बुडाले;परभणीत मंदीर कोसळून चार भाविकांचा मृत्यू

****

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २३ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. यावेळी राज्यातील ९० लाख ८५ हजार शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे १ हजार ८१७ कोटी रुपये जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपये इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.

****

१२ वाआंतरराष्ट्रीय योग दिवसउद्या साजरा हो आहे.निरोगी जीवनासाठी योगअशी यंदाच्या योगदिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे अडीच हजार ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योगदिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी साडे सहा वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं ‘प्रादेशिक बातमीपत्रया कार्यक्रमानंतर प्रसारित करण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या औचित्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं उद्या सकाळी ७ वाजता महानगर पालिकेच्या गरवारे क्रीडा संकुल इथे योग दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा उद्या होणार आहे. या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून आज राष्ट्रीय चाचणी संस्था- एनटीएनं देशभरात मॉक ड्रील घेतली. देशातल्या ५५१ आणि परदेशातल्या १४ शहरांमधे ही परीक्षा होणार आहे. २२ लाख ७९ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दुपारी दोन ते सव्वा पाच दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास हजर व्हावं, असं एनटीएने सांगितलं आहे.

****

कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा परिसर, शासनाच्या तब्बल १ हजार ५०० कोटी रुपयांच्या निधीतून विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूर इथं पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. ७व्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे ४१ छोट्या-मोठ्या मंदिराचे संवर्धन करून हा परिसर पुढील सहा महिन्याच्या आत विकसित करण्यात येणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

****

येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाने पाच हजार ५०० विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं. 

****

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि ७ इतर आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. २००६ मध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले पाच युवक रत्नागिरीतील गणपतीपुळे इथल्या समुद्रात बुडाल्याची घटना आज घडली. पैठण तालुक्यातील बिडकीन इथले १९ पर्यटक गणपतीपुळे इथं आले होते. यापैकी ८ जण आज सकाळी समुद्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने, हे आठही बुडाले, यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं, मात्र पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत. हे सर्व युवक १९ ते २२ वर्ष वयोगटातले असून, अदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने, आणि यश कांबळे अशी या पाच जणांची नावं आहेत. या सर्वांचा शोध सुरू असल्याचं रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले.

****

परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील यशवाडी इथल्या त्रिमूर्ती हनुमान मंदिरातील सभामंडप कोसळला असून या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक भाविक जखमी झाले आहेत. आज शनिवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली असतांना, या निर्माणाधीन मंदिराचा सभामंडप कोसळल्याचं वृत्त आहे. नागरिकांच्या मदतीनं जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्कारांचे वितरण आज करण्यात ये आहे. मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात हा सोहळा हो आहे. डॉ. साहेबराव खंदारे यांना नरेंद्र मोहरीर वाङ्ममय पुरस्कार, डॉ. अनुराग लव्हेकर यांना नरहर कुरुंदकर वाङ्ममय पुरस्कार, डॉ. शिव कदम यांना म. भि. चिटणीस वाङ्ममय पुरस्कार तर क्षितीज देसाई यांना बी. रघुनाथ वाङ्ममय पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे.

****

बीडच्या गेवराई तालुक्यात विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेचे अपहरण करून तिला काठ्यांनी बेदम मारहाण करत रात्रभर एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.

****

परभणी शहरात आज, दहशतवाद विरोधी पथकानं १५ ठिकाणी धाडी टाकल्या या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. यावेळी बाहेरील जिल्ह्यातील तपास अधिकारी मोठ्या संख्येनं दाखल झाल्यानं या परिसराला छावणीचं स्वरुप आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील नोकरभरती प्रकरणी उद्भवलेला पेच दूर करण्यासाठी येत्या सोमवारी २२ जून रोजी कृषी आणि महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली. प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या बाबत ३ सप्टेंबर २०२५ रोजी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीच्या अनुषंगानं समिती गठीत करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे.

****

क्रिकेट

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरु झाला आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी २१९ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार षटकांत बिनबाद ३७ धावा झाल्या होत्या.

****

हवामान

येत्या ४८ तासांत विदर्भ तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यां उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment