Friday, 26 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांची मदत जाहीर

·      गौणखनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूलमंत्र्यांची घोषणा

·      नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खाजगी कंपनीकडे हस्तांतरण

·      एलपीजी पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले

·      शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात ६०० किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त

आणि

·      महिला टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांग्लादेशवर पाच खेळाडू राखून विजय

****

राज्यात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. या मदतीमध्ये कोकण विभागातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी १० लाख रुपयांच्या विशेष मदतीचा समावेश आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या दोन महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी १०६ कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. ९५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, ही मदत पुढील १५ दिवसांच्या आत वितरित केली जाईल, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. एनडीआरएफच्या निकषांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सुमारे २२ हजार ५०० रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार असून, निधीचं वितरण जलदगतीने करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

****

राज्यात गौणखनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात, गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले,

बाईट – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

राज्यात गेल्या पाच वर्षांत दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांकशुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

**

मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानपरिषदेत ही घोषणा केली. ****

नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खाजगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता सुमारे १० लाखांनी वाढली असून, जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी ६० लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं, केंद्रीय मंत्री नायडू यावेळी म्हणाले. एम आर ओ, कार्गो हब आणि इतर आधुनिक सुविधांमुळे नागपूर ‘एअरोट्रोपोलिस’ अर्थात विमानतळ आधारित महानगर म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी यांनी विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्त्व अधोरेखित केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल, असं सांगितलं. कार्गो प्रकल्प, संरक्षण क्षेत्रातली गुंतवणूक आणि आधुनिक सुविधा यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी नागपूर विमानतळाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण तसंच विमानतळाच्या नव्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं.

****

पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या पॅक्ड एलपीजी पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच, संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. संकटपूर्व काळातील वापराच्या तुलनेत घाऊक एलपीजी पुरवठ्याचे निर्बंध ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले असून, त्यामुळे उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.

****

मोहरम आज पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या सहकार्यांनी मानवतेच्या, न्यायाच्या आणि हक्काच्या रक्षणासाठी करबला इथं दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. यानिमित्त ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढण्यात येतात. 

****

पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं घडलेल्या बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय येत्या २९ तारखेला जाहीर केला जाणार आहे. न्यायालयाने आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र, गुन्ह्याबाबत सबबी सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचं नमूद करत त्याला दोषी ठरवलं.

****

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्रे आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन  विभागानं ६०० किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा तसंच संशयित पेढा जप्त केला. या पेढ्याची किंमत जवळपास दोन लाख रुपये असून, १५ दिवसांतली ही दुसरी मोठी कारवाई असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या पार्डी टोल नाका इथंही अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत निकृष्ट दर्जाच्या २९ हजार ६७६ किलो सुपारीचा साठा जप्त केला. त्याची अंदाजे किंमत ८६ लाख ३६ हजार ५८६ रुपये इतकी आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षीय राजकारणाशी संबंधित नसून सहकार क्षेत्रातल्या विकासासाठी नितीन पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घेतल्याचं दानवे यांनी सांगितलं. जिल्हा बँकेच्या १२ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे.

****

मराठा आरक्षण उपसमितीने दिलेल्या विविध सूचनांनुसार मराठवाड्यातल्या सर्व  जिल्ह्यांमध्ये मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र तसंच जात पडताळणी प्रमाणपत्रं निर्धारित मुदतीत वितरित करण्याची कार्यवाही पूर्ण करुन, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कोणताही अर्ज ९० दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश परदेशी यांनी दिले.

****

महिला टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल मँचेस्टर इथं झालेल्या साखळी सामन्यात भारताने बांग्लादेशचा पाच खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांग्लादेशच्या संघाने निर्धारित षटकात आठ बाद १३६ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या भारतीय महिलांनी १७व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. ५३ धावा करणारी शेफाली वर्मा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली. भारताचा पुढचा सामना येत्या रविवारी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.

****

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांत समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतीकामांना वेग आला आहे.

जालना जिल्ह्यात बहुतांश भागात काल पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. या पावसामुळे कपाशी लागवडीसह खरिपातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

बुलढाणा जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव, कंचनपुर, बोरी अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. मांडणी, बोथा कोळी आणि ज्ञानगंगा प्रकल्प परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा आहे.

हवामान विभागाने आज मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. लातूर, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment