Sunday, 28 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      देशात रोजगाराच्या संधी वाढण्यासह आत्मनिर्भर भारताचा संकल्पही अधिक दृढ होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

·      नांदेडमधल्या पेटकर कुटुंबाच्या विवाहातल्या आदर्श उपक्रमाचं पंतप्रधानांकडून कौतुक

·      संपूर्ण लक्ष विकासकामांवर केंद्रित असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

आणि

·      सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची उद्धव ठाकरे यांची टीका

****

देशात रोजगाराच्या संधी वाढण्यासह आत्मनिर्भर भारताचा संकल्पही अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ‘मन की बात’ या आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या १३५व्या भागातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत असतांना बोलत होते.

प्रत्येक नागरिकाच्या अभिमानाचं हे यश राष्ट्र सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेशी जोडलेलं आहे. कारण, आयएनएस दूनागिरीसोबतच संशोधक आणि अग्रय ही तीन जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहेत. त्यांच्या आरेखन ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे असं मोदी म्हणाले. याचसोबत देशानं हवाई वाहतूक क्षेत्रातही मोठं यश मिळवत ‘मेड इन इंडिया’ असलेल्या सी-295 विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे. भारतात अशी ४० विमानं तयार केली जात असल्यानं सुक्ष्म आणि लघु उद्योग-एम.एस.एम.ई. आणि विमान-अंतराळ क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे असं ते म्हणाले. लांब पल्ल्याच्या स्वयंचलीत क्षेपणास्रांची नुकतीच यशस्वी चाचणी झाल्याचं नमूद करत, आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे असं पंतप्रधानांनी अधोरेखीत केलं.

नुकत्याच साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं बोलतांना मोदी यांनी, देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित योगविद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचं सांगून अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं एकूण १०२ सुवर्णपदकांसह ११४ पदकं जिंकत स्पर्धेच्या पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावल्याचं नमूद केलं.

पश्चिम आशियातली युद्ध परिस्थितीत देशवासियांना आपण केलेलं आवाहन अर्थात काही काळ सोनं खरेदी करणं टाळणं, परदेशात सुट्टयांसाठी न जाणं, तसंच चारचाकी वाहनं सामायिक करणं यांसह शेतकऱ्यांनी रासायनिक खतमुक्त शेती करत, शेतजमिनी वाचवणं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं सांगितलं होतं. आपल्या आवाहनाला केवळ पाठिंबाच नाही तर सर्व बाजूंनी जनता सहकार्यही करत असल्याचं मोदी म्हणाले.

आपल्या देशात वाढदिवस – लग्नसोहळे, कौटुंबिक कार्यक्रम न राहता समाजाचे उत्सव बनतात. कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटायचा असल्यानं पाहुण्यांना भेटवस्तूही देल्या जातात. मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या बहाद्दरपुरा गावातल्या कुटुंबानं या संदर्भात आदर्श घालून दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

यासंदर्भानं पुढं बोलतांना मोदी यांनी, नागरिकांसाठी ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने’अंतर्गत एका वर्षाच्या फक्त वीस रुपयांच्या हप्त्यात दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळत असल्याचं सांगून, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेद्वारे एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांचं विमा संरक्षण प्रदान केलं जातं. याचा वार्षिक हप्ता फक्त ४३६ रुपये म्हणजेच दिवसाला जेमतेम दीड रुपया असल्याचं त्यांनी सांगितलं.

अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेतात. त्यामुळं मोठं नुकसान होतं असं सांगून विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देत अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही असं त्यांनी नमूद केलं.

जो खेळतो, त्याचाच विकास होतो असं सांगून आज देशात खेळणाऱ्या तरुणांची संख्या वेगानं वाढत असून आता तरुण मोठ्या संख्येनं खेळाला कारकिर्द म्हणून स्वीकारत असल्याचं मोदी म्हणाले.

कत्रिम बुध्दीमत्ता –ए.आय.च्या जगात लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची, यासाठी नालंदा विद्यापीठानं शास्त्रार्थ परंपरा राबवल्याचं सांगितलं. ही वाद-संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया ज्यात तर्कासहित, पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते असं ते म्हणाले.

आपलं संगीत - अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून दूर आपली परंपरा शिकण्याचा हा प्रयत्न आपली संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठीचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलं. गणेशोत्सवात मातीच्या मूर्तीच खरेदी करा, असं आवाहन त्यांनी केलं. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं अभियान मिळून राबवायचा खास आग्रहही पंतप्रधान मोदी यांनी केला.

****

नांदेड जिल्ह्यातल्या बहाद्दरपुरा इथं सिद्धेश्वर आणि मंजुषा यांच्या विवाह सोहळ्यातल्या समाजोपयोगी उपक्रमाचा पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये उल्लेख केल्यानं पेटकर कुटुंबाला मोठा आनंद झाला आहे. अनुप पेटकर यावर आकाशवाणीला प्रतिक्रिया देताना म्हणाले -

बाईट - अनुप पेटकर

****

लोकांचं भलं केवळ विकासातूनच होणार असून, आपलं संपूर्ण लक्ष विकासकामांवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आज मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. बोईसर मधले बुलेट ट्रेन स्टेशन, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी हे प्रकल्प महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.

****

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज सर्वत्र उत्साहात सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मनपा एन-८ रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याचं उद्‍घाटन झालं. लातूर जिल्ह्यात आज राबविण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ५२६ बालकांना पोलिओची लस पाजण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं निश्चित केलं आहे.

****

समृद्धी महामार्गावर वाशीम नजिक शिवनी टोल नाक्याजवळ आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भीषण मोटार अपघातात एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरहून अकोल्याकडे जाणारी मोटार मागील बाजूने ट्रकवर आदळल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****

या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज परभणीत पत्रकार परिषदेत केली. केवळ जातीवाद निर्माण करून हे सरकार सत्ता चालवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यांच्या पक्षाचे सहा खासदार शिवसेनेसोबत गेल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज परभणीत सभा घेतली. फुटलेल्या खासदारांना शासकीय निधी कमी पडत नव्हता, मिळालेला निधी खर्चही ते करू शकत नव्हते. वैयक्तिक निधी कमी पडत असल्यानं राज्यातले खासदार फुटत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. ठाकरे यांची आज संध्याकाळी धाराशीव इथंही सभा होणार असून त्या नंतर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामासाठी येणार आहेत.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे उद्या छत्रपती संभाजीनगर इथं शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात येणार असून त्यासाठी आमदार रोहित पवार आज संध्याकाळी शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी यानिमित्त पत्रकारांशी बोलताना आता आमदार फुटणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.

****

भारतानं आयर्लंडविरुद्ध बेलफास्ट इथं सुरू दुसऱ्या टीट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी पत्करली आहे. पहिला सामना गमावला असल्यानं हा सामना जिंकून दोन सामन्यांची ही मालिका बरोबरीत सोडवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

****

जालना शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या एक हजार ८० बटन गोळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी औषध विक्री करणाऱ्या दुकानदारासह दोघांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या चार ते पाच दिवसांत मराठवाड्याच्या संपूर्ण भागात बहुतांशी ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. लातूर शहर आणि परिसरात आज दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

****

No comments:

Post a Comment