Wednesday, 1 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विधान परिषद उपसभापतिपदाचा आज निर्णय, महाविकास आघाडीकडून जे.एम.अभ्यंकर तर महायुतीकडून सचिन अहीर यांना उमेदवारी

·      बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा १६ वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची माहिती

·      अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं सरकारचं आश्वासन

·      ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन

आणि

·      राज्याच्या अनेक भागात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

****

विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी आज निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जे.एम.अभ्यंकर यांनी, तर महायुतीकडून सचिन अहीर यांनी काल अर्ज दाखल केला. अहीर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत, सचिन अहीर यांचं पक्षात स्वागत केलं.

**

दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी मात्र पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर कठोर टीका केली आहे. जे लोक पक्षाचे सर्वात जवळचे होते आणि ज्यांना पक्षानं सर्व काही दिलं, ते लोक पक्ष सोडून जात असल्याचं सांगत त्यांनी खेद व्यक्त केला.

****

गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल, तसंच बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काल विधानसभेत, आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्यं करवून घेतल्यासंदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता. त्यासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले.

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, मात्र यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या विषयावर अधिक चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली, मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

**

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे.

**

राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावी, यासाठी या परीक्षांसाठी संगणक आधारित परीक्षा अर्थात CBT पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी काल विधानपरिषदेत दिली. या परीक्षांचं खाजगीकरण होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

**

बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर मकोका लावला जाईल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अशा आरोपींवर सध्या लावलेली कलमं सुधारित करून सध्या जामिनावर सुटलेल्या आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी कारवाई करू, असंही ते म्हणाले.

**

'बाई' या नावाने प्रेमळपणे ओळखल्या जाणाऱ्या, चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातलं प्रख्यात व्यक्तिमत्त्व विजया मेहता यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या ९२ वर्षांच्या होत्या. विजया मेहता या प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी एक होत्या. ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि जागतिक दर्जाची समज मिळवून दिली. ‘बॅरिस्टर’, ‘सखाराम बाईंडर’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘महानिर्वाण’, ‘पुरुष’, आणि ‘वाडा चिरेबंदी’ यांसारख्या त्यांच्या गाजलेल्या नाटकांनी आधुनिक भारतीय रंगभूमीची व्याप्ती वाढवण्यास मोलाची मदत केली.

रंगभूमीपलीकडे, विजया मेहता यांनी ‘रावसाहेब’, ‘पेस्तनजी’, ‘शकुंतलम’ आणि ‘स्मृतिचित्रे’ यांसारख्या कलाकृतींद्वारे चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातही आपला महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. विजया मेहता यांना १९७५ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, १९८६ मध्ये ‘रावसाहेब’ चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा राष्ट्रीय पुरस्कार, ‘पार्टी’ चित्रपटासाठी ‘आशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार आणि २०१२ मध्ये कला क्षेत्रातल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘संगीत नाटक अकादमी टागोर रत्न’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विजया मेहता यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

****

राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला कालपासून सुरूवात झाली.

बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड शहरातल्या मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन या मोहिमेला प्रारंभ केला. नागरिकांना गणना प्रपत्राचं महत्त्व समजावून सांगत त्यांनी घरोघरी अर्ज वितरण आणि पडताळणी प्रक्रियेचा आढावा घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

**

नांदेड जिल्ह्यातल्या २७ लाख ७७ हजार मतदारांच्या विशेष सखोल पुनरिक्षणास कालपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली, या मोहिमेसाठी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओना सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास एक हजार शेतकरी खातेधारक पात्र आहेत. राष्ट्रीयकृत तसंच इतर बँकांमधल्या पात्र शेतकऱ्यांची यादी अद्ययावत करण्याचं काम वेगाने सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करणं अनिवार्य असून, संबंधितांनी तातडीने नोंदणी करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. ते म्हणाले…

बाईट- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

****

जालना इथल्या मृदा आणि जलसंधारण विभागातल्या एका कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. रमेश खरे असं त्याचं नाव असून, कार्यालयातूनच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या अर्जित रजेच्या फरकाचं बील काढण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

अन्य एका कारवाईत जिल्हा परिषदेतला उपविभागीय जलसंधारण अधिकारी संदीप राऊत याला १३०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरीचं अकुशल मस्टर मंजूर करून देण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.

****

नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाऱ्याच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत १९५६ च्या जुन्या कायद्यात प्रस्तावित सुधारणांविषयी शीख समाजात असलेल्या भावना लक्षात घेऊन, राज्य सरकारनं हा कायदा तूर्तास स्थगित केला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एका उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून शीख समाजाचे मत ऐकून घेतल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

शीख धर्माचे सहावे गुरू गुरू हरगोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं विविध कार्यक्रम घेण्यात आले. पहाटेपासूनच शहरातल्या विविध गुरुद्वारांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कीर्तन, अखंड पाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमधून शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

****

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सर्व प्रकल्पग्रस्त लाभार्थीना नोकर भरती मध्ये पात्र ठरवण्यात यावं असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव पाठवला होता.

****

छत्रपती संभाजीनगर इथं नियोजित अतिरिक्त वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्रात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात येतील, असं आश्वासन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिलं आहे. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या नियोजित औद्योगिक क्षेत्रासाठी गंगापूर तालुक्यातल्या आरापूर, सुलतानाबाद आणि गवळी शिवरा या गावातली सुमारे ७६२ हेक्टर जमिनी संपादित करावी लागणार आहेत.

****

हवामान

राज्याच्या अनेक भागात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यासाठी आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment